देवत्व

प्रज्ञा देशमुख
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

देव कुठे असतो? कुठे शोधायचा त्याला? जेथे मानवता धर्म असतो, तेथे त्या माणसांत देव दिसतो.

देव कुठे असतो? कुठे शोधायचा त्याला? जेथे मानवता धर्म असतो, तेथे त्या माणसांत देव दिसतो.

आस्तिक का नास्तिक या भानगडीत पडायला मला कधीच आवडत नाही. तो व्यक्तिसापेक्ष भावनेचा विषय आहे. देवासमोर दिवा लावण्याव्यतिरिक्त उपास-तापास, व्रत-वैकल्य करण्यात माझे मन कधीच रमले नाही. अमुक एक देव नवसाला पावतो म्हणून तासन्‌तास रांगेत उभे राहून, ढकलाढकली करून देवाचे उगाच पुसटसे दर्शन घेऊन बाहेर पडणे, मनाला कधी रुचलेच नाही. त्यापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात राहून मनःशांती, समाधान अनुभवणे जास्त भावले. मंदिरातील दानपेटीत पैसे टाकण्यापेक्षा एखाद्या गरजवंताला मदत केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे ते हास्य जास्त समाधान देऊन जाते. नाही म्हणायला, माणसाच्या रूपात देवासारखी माणसे बरीच भेटली. त्यांना मनापासून नमस्कार करायला नक्कीच आवडते. परवाचीच गोष्ट, कंपनीतून निहार मोटारसायकलने येत होता. संध्याकाळचे साडेसात वाजले असतील. रस्त्याने वाहने भरभरून वाहत होती. पुढच्या टेंपोवाल्याने ब्रेक लावल्याने निहारलाही ब्रेक लावावे लागले. रस्त्यावर खडी-वाळू असल्याने मोटारसायकल घसरली आणि निहार डाव्या हातावर पडला. मागेच असलेल्या कॅबमध्ये बसलेल्या शालिनीने ते पाहिले आणि कॅब थांबवून त्याला ड्राइव्हरच्या मदतीने उचलून पाणी पाजले. मोटारसायकल रस्त्याच्या कडेला लावली. लॉक केली आणि निहारला रुग्णालयात नेले. तिथे अर्ज भरणे, मला फोन करून माहिती देणे हे सगळे जातीने केले. निहारच्या डाव्या हाताची हाडे, कोपर आणि मनगटाच्या मधोमध तुटली होती. त्या हाताला उजव्या हाताने त्याने आधार दिला होता. त्यामुळे त्याला फोन करणेसुद्धा अशक्‍य होते. शालिनीने मला फोन करून अपघाताविषयी सांगितले. "जास्त लागलेले नाही. काळजी करू नका, आन्टी', असे सांगून निहारला माझ्याशी बोलायला लावले, तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला!

कोण कुठली सिमल्याची तीस-बत्तीस वर्षांची शालिनी, ना माझ्या नात्यातील-ना गोत्यातील! माझ्या मुलाला अशा अवघड प्रसंगी मदत करते काय आणि वर "काही लागले तर नक्की सांगा आन्टी', असे हक्काने सांगते काय! मला तर त्या क्षणी तिच्यातच देवत्वाचा अंश दिसला! अपघातात जखमी झालेल्याला पाहून न पहिल्यासारखे करून पुढे जाणारी मुर्दाड मनोवृत्ती बघितली की, माणुसकीचा झरा जिवंत ठेवणारी शालिनी खूपच उजवी वाटते!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pradnya deshmukh write article in muktapeeth