दर्यावर्दी माणसे विविध विषयांत दर्दी

कॅप्टन प्रफुल्ल हुडेकर 
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

जहाजावरील कॅप्टनचे जीवन कसे असते असा प्रश्‍न अनेकांना असतो. आम्ही दर्यावर्दी अनेक विषयांत दर्दीदेखील असतो. यावर कोणाचा विश्‍वास बसत नाही. कुटुंब, समाज यांपासून दूर समुद्रामध्ये महिनोन्‌ महिने राहायचे. एका जहाजावर जेमतेम वीस लोक. बाहेर अथांग समुद्र आणि त्यामध्ये एका छोट्याशा शिंपल्याप्रमाणे भासणारी बोट या विश्‍वात ही माणसे कशी राहू शकतात हा अनेकांच्या उत्सुकतेचा विषय असतो. 
 
गेली 23 वर्षे मी अँग्लो इस्टर्नशिप मॅनेजमेंट कंपनीमध्ये काम करत आहे. जहाजात असतानाचा काळ नक्कीच ताणतणावाचा असतो. पण अशा वेळी चित्रकला मला तणाव हलका करायला छान मदत करते. जलरंग चित्रकला आणि इतरही प्रकार मी हाताळले आहेत. एखादा फोटो आवडला की त्याचे अगदी हुबेहूब चित्र काढण्याचा मी प्रयत्न करतो. यातील काही चित्रांचे प्रदर्शनही ठिकठिकाणी झाले आहे. या वर्षी मेमध्ये इटली इंटरनॅशनल वॉटल कलर बीनालेमध्ये मी डेमो केला होता. आता राजस्थानमधील कोटा येथे मास्टर आर्टिस्ट म्हणून निवड झाली. अनेकांनी माझ्या या कलेचा सन्मानही केला. ही कला मी चित्रकार मिलिंद मुळीक यांच्याकडे शिकलो. माझ्या चित्रांच्या विक्रीतून जो निधी मिळतो तो मी माझ्या मातृ-पितृ संस्थेमार्फत गरजवंतांना देतो. 
महिनोन्‌ महिने समुद्रात असल्यामुळे आणि जोडीला ही कला जोपासल्यामुळे मला चित्र काढायला विषय कमी पडत नाहीत. अचूक निरीक्षणाच्या जोरावर पाण्याचे रंग, सूर्योदय, सूर्यास्त, ढगांचे अनोखे रंग, मानवी आकृत्या, उसळलेला दर्या, शिडाची जहाजे कमीत कमी वेळात कागदावर उतरवतो. तेदेखील बोटीवरची अत्यंत जबाबदारीची कामे पार पाडत. जगात कुठेही असलो तरी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी माझ्या बोटीवर आठवणीने तिरंगा फडकवतो. सहकाऱ्यांना गोडधोड खाऊ घालतो. एवढेच नव्हे तर आम्ही बोटीवर गणेशोत्सवसुद्धा साजरा करतो. मी काढलेल्या चित्रांच्या विक्रीतून आलेले उत्पन्न समाजसेवेसाठी, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य घेऊन देण्यासाठी देऊ केले. यामध्ये रोटरीसारख्या संस्थांचे सहकार्य लाभले. माझ्या प्रत्येक कार्यात माझी पत्नी रूपा नेहमीच सोबत असते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prafull Hudekar talking about his experience