टाटा मोटर्स नावाचे विद्यापीठ

प्रकाश तांबे
शुक्रवार, 8 जून 2018

आपण कार्यरत असलेल्या ठिकाणी आपले ऋणानुबंध जुळलेले असतात. या ठिकाणी आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्या भावी आयुष्यात उपयोगी पडतात.

आपण कार्यरत असलेल्या ठिकाणी आपले ऋणानुबंध जुळलेले असतात. या ठिकाणी आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्या भावी आयुष्यात उपयोगी पडतात.

भारतरत्न जे. आर. डी. टाटा व दिवंगत सुमंत मूळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या पिंपरी-चिंचवड या औद्योगिक उपनगरात सुमारे 400 एकर जागेत गेले 50 वर्षे कार्यरत असलेल्या टाटा मोटर्स कंपनीला गेले दोन दशकाहून अधिक काळात रतन टाटा यांच्या सक्षम नेतृत्वाने उत्तरोत्तर प्रगतिपथावर नेऊन ठेवले आहे. सुमारे साडेतीन दशके या कंपनीत सेवाव्रत असताना टाटा उद्योग समूहाच्या समाज व कामगारप्रणीत विचारसरणीचा मला पदोपदी अनुभव घेता आला. हजारो लोकांसाठी रोजगार प्राप्त करून देत देश-विदेशांत दर्जेदार उत्पादने पुरवत असतानाच सामाजिक जाणिवेचे भान ठेवत समाजविकासावरही या कंपनीतर्फे भर दिला जातो. कंपनीने काही खेडेगावे दत्तक घेतली असून त्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी सेवाभावे पार पाडली जात असते. प्राथमिक शिक्षण व मोफत आरोग्य तपासणी वगैरे उपक्रमही राबवले जातात.

टाटा मोटर्स या प्रकल्पामुळे सुमारे 15000 कायम व हंगामी कामगारांना तर रोजगार मिळालाच, परंतु कंपनीला सुट्टे भाग पुरविणारे शेकडो कारखाने उदयास आले आहेत. तेथील कामगारांनाही रोजगार मिळाला. कायद्यानुसार आवश्‍यक तेवढ्या प्रशिक्षणार्थींना (Apprentices) भरती करून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी खास "प्रशिक्षण विभाग' नावाचा वेगळा विभाग कार्यरत आहे व या सर्व प्रशिक्षणार्थींची राहण्यासाठीची उत्तम व्यवस्थाही हॉस्टेलमध्ये केलेली आहे. या प्रशिक्षित उमेदवारांतूनच कंपनीला उच्च दर्जाचे निपुण कामगार वर्षानुवर्षे मिळत असतात.
कामगार कल्याणावर भर देणाऱ्या अनेकविध योजनाही येथे राबविल्या जात असून, त्यातूनच कामगारबंधू व त्यांच्या कुटुंबीयांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झालेले दिसतात. कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या विरंगुळ्यासाठी समाज कल्याण केंद्रे चालवली जातात. तसेच कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी कंपनीतील कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी कंपनी भेटीची व्यवस्था केली जाते. "परिवार'सारख्या अंतर्गत मासिकाद्वारे कंपनीशी निगडित सर्व प्रमुख घडामोडी छोट्या कामगारापासून सर्वोच्च अधिकाऱ्यापर्यंत पोचवल्या जातात.

कंपनीतील कलाप्रेमी कामगार दरवर्षी एकत्र येऊन दर्जेदार दिवाळी अंक काढतात व साहित्य, राजकीय वा इतर मान्यवर क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती त्या अंकाच्या उद्‌घाटनास येतात. या उपक्रमासही कंपनी आवश्‍यक ते अर्थसाहाय्य करते.
कंपनीत कार्यरत असणाऱ्या सर्व कामगारांची घरापासून कामावर येण्या-जाण्याची सोय तसेच अत्यंत चविष्ट व सात्त्विक जेवण, न्याहारी व चहाची व्यवस्था अत्यल्प वा नगण्य मोबदल्यात केली जाते व मुख्य म्हणजे कामगारांपासून सर्वोच्च अधिकाऱ्याला येथे एकाच प्रकारचे जेवण मिळते. कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वास्थ्यसंबंधित वैद्यकीय खर्चातही कंपनी हातभार लावते. शिवाय सेवेत असताना मृत झाल्यास, मृत कामगाराच्या कुटुंबीयांना आर्थिक साहाय्य दिले जाते. कार्यकाळात कामामुळे अपंगत्व आल्यास काहींना कंपनीने पर्यायी कामही दिले आहे. निवृत्तीपूर्वी 25 वा 35 वर्षे कंपनीत सेवा केलेल्या कामगारांचा वरिष्ठांकडून (सपत्निक वा पतीसह) यथोचित सत्कार होतो. या सर्वांमुळेच असंख्य आजी वा माजी कामगारांना टाटा मोटर्सशी निगडित असल्याचा अभिमान वाटतो; अर्थात मीही त्यातलाच.

या एकरातच पिंपरी प्लॅंटच्या जवळ रतन टाटा व तत्सम विशेष अधिकारी व अतिथींची पंचतारांकित हॉटेलला लाजवेल अशी निवासाची व्यवस्था असून अतिमहत्त्वाच्या मीटिंग येथील सुमंत लेकच्या रम्य वातावरणात होत असतात. सर्व अधिकारी वर्गही दर वर्षी 1 एप्रिलला येथील मीटिंगला उपस्थित असतो. व्यवसाय धंद्यात चढउतार वा व्यवस्थापनातील बदल होतच असतात; परंतु सचोटी, निष्ठा, सामाजिक कर्तव्यांची जाण, वरिष्ठांच्या आदेशाची पूर्तता, वक्तशीरपणा, कामाच्या जागेची स्वच्छता, टापटीप, नेतृत्व गुण, टीमवर्क वगैरे गुणांची जोपासना करणारी टाटा मोटर्स कंपनी ही खरोखर एक विद्यापीठच आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prakash tambe write article in muktapeeth