आणखी एक दुकान बंद

प्रसन्न प्रकाश हळबे
शुक्रवार, 16 मार्च 2018

पुस्तकाचे एक दुकान बंद होत नाही, तर आपल्या संस्कृतीचे एक दार बंद होते. आपल्या सांस्कृतिक वैभवाची शान उणावते. समाजाला हे कधी तरी आतून जाणवेल का?

मुंबईचे स्ट्रॅंड बुक शॉप बंद होत असल्याची बातमी नुकतीच आली, मनाला चटका लागला. परवा ही बातमी येईपर्यंत आपल्या पुण्यातले पॉप्युलर बुक हाऊसही याच मार्गावर चालले असेल, अशी शंकाही मनात आली नाही.

पुस्तकाचे एक दुकान बंद होत नाही, तर आपल्या संस्कृतीचे एक दार बंद होते. आपल्या सांस्कृतिक वैभवाची शान उणावते. समाजाला हे कधी तरी आतून जाणवेल का?

मुंबईचे स्ट्रॅंड बुक शॉप बंद होत असल्याची बातमी नुकतीच आली, मनाला चटका लागला. परवा ही बातमी येईपर्यंत आपल्या पुण्यातले पॉप्युलर बुक हाऊसही याच मार्गावर चालले असेल, अशी शंकाही मनात आली नाही.

मन काही वर्षे मागे गेले. पहिल्यांदा या दुकानात कधी गेलो ते नक्की आठवत नाही, पण वडिलांनीच या दुकानाची ओळख करून दिलेली आठवते. 1988-89 च्या सुमाराला इंजिनिअरिंगला असताना मात्र अगदी नियमितपणे इथे जात असू. कारण त्याकाळी आम्हाला लागणारी काही परदेशी पुस्तके पॉप्युलरमध्ये मिळायची. तेव्हापासून आम्ही प्रेमाने याला "वोक्‍स पॉप्युली' म्हणायचो.

एक तर छोट्या जागेत अतिशय व्यवस्थितपणे केलेली दुकानाची रचना, पुस्तकांची वर्गवारी आणि त्यानुसार केलेली त्यांची स्वच्छ मांडणी यामुळे पॉप्युलर बुक हाऊस आकर्षक वाटायचे. त्या काळी कुठल्या बाजूला कुठली पुस्तक असायची, ते आजही पक्के आठवतेय. त्याकाळी सीनियर गाडगीळ दुकानात असायचे. तेही येणाऱ्या लोकांना वेगवेगळी पुस्तके सुचवताना दिसायचे. अनेकदा मोठमोठ्या व्यक्ती दुकानात आलेल्या असायच्या. एखादा अभिनेता, अभिनेत्री, एखादा कवी, साहित्यिक अशा लोकांचा इथे वावर असायचा. त्यामुळे आम्ही असे थोडे दबलेलेच असायचो. असेच मागच्या बाजूला वावरायचो. पण ही मुले नेहमी येतात आणि कधी ना कधी अधूनमधून एखादे तरी पुस्तक विकत घेतात, हे त्यांना माहीत असायचे.
शिक्षण संपले. नोकरी लागली. सुरवातीच्या काळात फारशा जबाबदाऱ्या नसल्याने काही पुस्तके अशीच खरेदी केली गेली. त्यानिमित्ताने पॉप्युलरला येणे-जाणे चालूच होते.

माझा एक मित्र आशुतोष आणि मी तर दर गुरुवारी (त्याकाळी कंपनीला गुरुवारी सुट्टी असायची.) किंवा कधी कधी तर रोज संध्याकाळी पॉप्युलरमध्ये पडीक असायचो. फार पैसे खुळखुळत नसल्याने त्या वेळी पुस्तक खरेदी फारशी व्हायची नाही. क्वचित कधी तरी एखादे पुस्तक घेतले जायचे. जास्तीत जास्त कार्यक्रम असायचा तो नवीन आलेली पुस्तके पाहण्याचा आणि त्यांच्याकडे टुकत बसण्याचा.

एक तर अगदी पक्की आठवण आहे. त्याकाळी मार्केटिंगच बायबल असलेले कोटलरचे पुस्तक पॉप्युलरमधूनच घेऊन झाले होते. पण, अजून एका नव्या लेखकाचे अगदी आकर्षक छपाई असलेले आणि रंगीत फोटो वगैरे असलेले एक पुस्तक पॉप्युलरमध्ये पाहिले. तत्क्षणी घेण्याचे मनात आले. पण, किंमत पाहून डोळे पांढरे झाले. दोघांनी मिळून घ्यायचा विचार केला, तरीही ते परवडत नव्हते. मग काय, अनेक संध्याकाळी तिथे येऊन त्या पुस्तकाकडे आशाळभूत नजरेने पाहत राहायचो आणि अचानक एके दिवशी ते पुस्तक तिथून गायब झाले. कुणी तरी ते विकत घेतले होते. आपल्या ग्रुपमधल्या एखाद्या सुंदर मुलीला कुणी तरी मागणी घालून तिच्याशी लग्न करून तिला आपल्यातून घेऊन जावे, या इतपत ठसठसणारे ते दुःख होते. आजच्या भाषेत आमचं "हार्ट ब्रेक' झाले होते.

काही काळानंतर पगार आणि घरच्या जबाबदाऱ्या यांची सांगड घालता घालता कुठेतरी पॉप्युलरचा हात हातातून सुटला. काळ पुढे सरकत गेला. व्याप वाढले, संदर्भ बदलले, आवडी-निवडी बदलल्या. त्यामुळे मनात असूनसुद्धा पॉप्युलरमध्ये जाणे जमेनासे झाले. आणि आयुष्यातली ही काही वर्षे वोक्‍स पॉप्युलीशिवायच गेली.
नंतर नंतर डेक्कनकडे जाताना-येताना पॉप्युलर उघडे दिसले तरी बरे वाटायचे. आता पुस्तके घेण्याची क्षमता आहे, तर कधी तरी चक्कर मारू आणि काही खरेदी करू असे वाटायचे. पण, ते काही झाले नाही.

शेवटी दोन वर्षांपूर्वी आशुतोष आणि मी एका संध्याकाळी खास पॉप्युलरसाठी वेळ काढायचे ठरवले. दोघे गेलो, बराच वेळ घालवला. पण, आपल्या आवडत्या दुकानाची गेलेली रया अस्वस्थ करणारी होती. पुस्तकांची संख्या अगदीच कमी, खेळणी आणि सी.डी. विभाग वाढलेला दिसत होता. अनेक वर्षांनी सुनील गाडगीळ यांना पाहत होतो. आमची ही पॉप्युलरवारी नॉस्टॅल्जिक होती खरी, पण त्याचबरोबर ती जास्त करून क्‍लेशदायक होती. एखाद्या अत्यवस्थ रुग्णाच्या बाबतीत डॉक्‍टर जसे निर्वाणीचे सांगतात, की "आता काही थोडे दिवसच आपल्या हातात आहेत.' त्याप्रमाणे आमच्या लाडक्‍या वोक्‍स पॉप्युलीबद्दल आम्हाला जाणवले. एकमेकाशी जास्त काही न बोलता आम्ही बाहेर पडलो. पुण्यात पुस्तकांच्या दुकानांची होणारी ही पडझड अस्वस्थ करणारी होती. मॉडर्न, मॅनीज, क्रॉसवर्ड, लॅंडमार्क आणि पाथफाइंडरचे बुरुज जसे ढासळले त्या मालिकेत आपले पॉप्युलरसुद्धा जाणार, हे मनाला पटत नव्हते.
ठीक आहे, ज्याला त्याला शेवटी प्रॅक्‍टिकल विचार करावाच लागतो. पण आपल्या मनात घर केलेल्या आणि आपले आयुष्य समृद्ध करणाऱ्या अशा वास्तू डोळ्यांदेखत उद्‌ध्वस्त होताना पाहण्यासारखे दुसरे दुःख ते काय?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prasanna halbe write article in muktapeeth