वंदन तुज!

प्रतिभा गुंडी
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

तिच्यापुढचा काळ सोपा नव्हता, तरीही तिने नवऱ्याच्या माघारी त्याची आठवण जपायची ठरवले. जिद्दीने रोपटे वाढवले.

तिच्यापुढचा काळ सोपा नव्हता, तरीही तिने नवऱ्याच्या माघारी त्याची आठवण जपायची ठरवले. जिद्दीने रोपटे वाढवले.

तिचे वय अवघे एकवीस वर्षांचे. नुकतेच लग्न झालेले. नवरा सैन्यात. लग्न झाले आणि नवरा लगेच सीमेवर गेला. त्या कामाच्या ठिकाणी कुटुंबाची निवासव्यवस्था नव्हती. त्यामुळे तिला सुरवातीचे काही महिने नवऱ्याकडे जाता आले नाही. हिमाचल प्रदेशात नवऱ्याचे पोस्टिंग झाल्यावर ती नवऱ्याकडे गेली. तिथे सहा महिन्यांचा सहवास मिळाला. त्यातून पाच महिन्यांच्या बाळाच्या आगमनाची चाहूल लागली! दोघेही अतिशय आनंदात होते! बाळाची चाहूल रोज ऐकत होते. स्वप्न पाहत होते, पण... हा "पण' फार वाईट! नवऱ्याला तातडीने सीमेवर हजर राहण्याचा संदेश आला आणि नवरा तिकडे गेला, तो परतलाच नाही. आली ती त्याची वाईट बातमी. अक्षरशः आभाळ कोसळले तिच्यावर. परतली माहेरी... तिचे नाव दीपाली विजय मोरे.
माहेरी सात बहिणी व आई यांचे कुटुंब. दीपालीचा नंबर पाचवा. सगळ्यांनी तिला गर्भपाताचा सल्ला दिला. पुनर्विवाहाचा प्रस्ताव ठेवला. पण दीपालीने सगळे सल्ले नाकारले. बाळाला जन्म देण्याच्या निर्णयावर ती ठाम होती. विजयच्या आठवणींचे ते रोपटे रुजवायचा तिने निर्णय घेतला होता, पुन्हा लग्न न करता! वीरपत्नी म्हणून जगायचे ठरवले तिने. पुढचा काळ तिच्यासाठी सोपा जाणार नव्हता, याची जाणीव असूनही ती ठाम होती. दीपालीने योग्य ते शिक्षण घेतले आणि माहेरच्या आधारावर नोकरीची सुरवात केली. हा प्रवास तिच्यासाठी खूप अवघड व परीक्षा घेणारा होता. पण मानसिक ताकद आणि जिद्द यांच्या जोरावर एखादी बाई कसे यश संपादन करते, याचे जितेजागते उदाहरण म्हणून दीपालीचा निर्देश करावा लागेल. आज तिचा मुलगा विश्‍वजित विजय मोरे दहावीत शिकत आहे. त्याची आईला मोलाची साथ आहे. ती खूप समाधानी आहे.

अशा कितीतरी दीपाली समाजात आहेत, असणार आणि पुढेही होतील! हे एक केवळ उदाहरण! निराशेला कवटाळणाऱ्या लोकांना खंबीरपणे सकारात्मकतेने कसे जगायचे, हे दाखविणारे दीपाली हे एक उदाहरण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pratibha gundi write article in muktapeeth