जोडले नाते नवे

प्रिया श्रीकांत
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

या वास्तूची किंमत करोडो रुपयांमध्ये होती. आसपास बरेचसे बंगले आणि फ्लॅट्‌स होते. पण बहुतांशी मुले परदेशात असल्याने बंगले, फ्लॅट्‌स रिकामे असतात. आई-बाबा असतात राखणदारासारखे, इस्टेटी सांभाळत.

या वास्तूची किंमत करोडो रुपयांमध्ये होती. आसपास बरेचसे बंगले आणि फ्लॅट्‌स होते. पण बहुतांशी मुले परदेशात असल्याने बंगले, फ्लॅट्‌स रिकामे असतात. आई-बाबा असतात राखणदारासारखे, इस्टेटी सांभाळत.

पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाडीने आता वेग पकडला होता. सुधीरराव व जयाताई यांनी सहप्रवाशांवर नजर टाकली; बरेचसे प्रवासी काही न काही कामात मग्न झाले होते. समोरच्याच जागेत एक तिशीतले जोडपे त्यांच्या तीन वर्षांच्या मुलाबरोबर पुण्यालाच निघाले होते. त्यांच्यामधील संवादाने सुधीररावांचे लक्ष वेधले.
""विनीता, आता तूच सांग, काय करावे? आपला मुलगा अजून लहान आहे. दोन रूमचा फ्लॅट भाड्याने बघितला तरी पंधरा-वीस हजार लागतात.''

""हो ना!'' त्याची बायको मुलाला थापटत म्हणाली, ""काहीही करू; पण आपल्या दोघांचे आई-बाबा आपल्याजवळ हवेत. पैशाची अडचण तर होणारच. ''
"हूं' म्हणत तिचा नवरा विचारात पडलेला दिसला. काही वेळाने सुधीररावांनीच आपण होऊन गप्पांना सुरवात केली. त्या दोघांना या तरुण जोडप्याच्या संसाराची हकीकत आपलीशी वाटू लागली होती.
""मग? पुण्यातच स्थायिक होण्याचा विचार दिसतोय?'' सुधीररावांनी मिस्कीलपणे विचारले. ""काका, खरे सांगू? आमच्या नोकऱ्या पुण्यात म्हणून एवढा विचार करावा लागतोय. आमच्या दोघांचेही आई-बाबा एकटे राहतात. त्यांनी आमच्याबरोबर असावे, या वयात आता आम्ही त्यांच्याकडे बघायला हवे असे वाटते; पण एवढे सोपे नाही ते.''
""अरे, पण मग तुम्हाला परदेशी संधी मिळाली तर काय कराल?''

""इथे काय किंवा परदेशात काय, आम्ही कुठेही काम करू; पण आई-बाबा जवळ हवेत.'' ईशानच्या बोलण्यात कळकळ होती.
""पण सुनेला चालतील का सासू-सासरे?'' जया वहिनींनी मुद्दाम खडा टाकला. ""काकू, अहो पटेल... पटणार नाही; थोडी कुरकूर, भांडण चालणारंच की... तरीपण आमच्या दोघांचे आई-बाबा जवळ असावेत, असे आम्हा दोघांना वाटते.'' विनीता ठामपणे म्हणाली. ""चांगलेय हो चांगलेय! सुखी व्हा,'' जयाताई न राहवून भावनेच्या भरात पटकन बोलल्या. पुणे आले. एकमेकांचा निरोप घेतला गेला.
000

काही कामानिमित्त सुधीरराव सोसायटीच्या ऑफिसमध्ये गेले. आपल्या घराचे व्यवहार व त्या संबंधित सगळे काही चोख ठेवण्याचा त्यांचा नियमच होता. अध्यक्षांनी नेहमीप्रमाणे पुन्हा त्यांना विचारले, ""तुमच्या बंगल्याचा विचार केला असेल तर सांगा. मनासारखे डील मिळवून देईन, तुम्ही फक्त ठरवा, मग बघाच!''
""नको, नको. तो विचार नाही.'' सुधीररावांचं नेहमीचं उत्तर! ते उठायला लागले, तेवढ्यात... ""अहो, सुधीरराव! बघा, मी सांगायलाच विसरलो. तुमच्या मुलाचा फोन आला होता. हल्लीची मुले पुढचा विचार आधीच करून ठेवतात बरे! त्यांनी कळवलेय की, देव न करो पण, तुम्हा-दोघांपैकी कुणाचे कमी-जास्त झाल्यास वेळ न दवडता पुढचे सोपस्कार आटपून घ्या. आम्हाला कळवा; पण आमच्यासाठी थांबू नका. एवढे दूरचे अंतर, खूप कष्टदायक जगणे, सांगत होता तो. विभासने सोसायटीच्या खात्यात पैसेही जमा केलेत. उगाच खोळंबा होऊ नये. सगळ्यांकरिता सोईचे होणार.. असे त्याचे म्हणणे!''

सुधीरराव काहीही न बोलता घरी आले. मनाला धक्‍का बसला होता. झोपायला गेले; पण डोळा लागेना. विभासच्या आजोबांनी रत्नागिरीची शेती विकून पुण्याच्या आदर्श कॉलनीत ही वास्तू विकत घेतली होती. आज तिची किंमत करोडो रुपयांमध्ये होती. आसपास बरेचसे बंगले आणि फ्लॅट्‌स होते. पण बहुतांशी मुले परदेशात असल्याने बंगले, फ्लॅट्‌स रिकामे असतात. आई-बाबा असतात राखणदारासारखे, इस्टेटी सांभाळत. विभास बायको मुलांना घेऊन येतो, पण त्यांच्या सुटीचा कार्यक्रम आधीच ठरलेला असतो. मनेही कोरडी होत चाललीत. आज अध्यक्षांचे बोलणे तर फारच खोलवर जखम करून गेले होते. नात्यातले प्रेम, माया इतकी आटू शकते?..की, आपण गेल्यावरची तजवीजही करून ठेवलेली? ""झोपलीस का?''
""तुम्ही तरी झोपलात का?'' दोघेही उठून बसली... सगळ्या गोष्टींबद्दल सगळ्या बाजूंनी बोलणी झाली. निर्णय घेता घेता पहाट झाली. दोघेही झोपले शांतपणे!
000

ईशानला कुरियरने अनपेक्षित पत्र मिळाले. रविवारी विनीता व मुलासह सुधीररावांच्या बंगल्यावर तो हजर झाला. सुधीररावांनी प्रस्ताव मांडला. रखरखत्या वाळवंटात, भर उन्हात अनवाणी चालत असताना अचानक कडुनिंबाची सावली मिळावी अन्‌ प्राजक्ताचा भरभरून सडा अंगावर पडावा तसे झाले. ईशान-विनीताची आपल्या आई-वडिलांना सोबत घेऊन राहण्याची तळमळ... पैशाची अडचण असतानाही मने संपन्न होती. नात्यांमधली साय जपणारी तरुण पिढी होती ती. सुधीरराव व जयाताईंनी त्यांना आपल्या कुटुंबीयात सामावून घेतले. अगदी नाममात्र भाडे... तेही ईशानने आग्रह धरला म्हणून.

ईशानचे कुटुंबीय, विनीताचे आई-वडील... एक एक करून सगळे आले राहायला. स्नेहाची वीण घट्ट होत गेली. आता त्या घरात सकाळपासून कपबशांचा खणखणाट असतो; स्वयंपाकघरात खमंग फोडणीचा वास... देव्हाऱ्यातल्या धुपदीचा सुगंध आसमंतात असतो. गप्पागोष्टी व एकंदरच वर्दळीने घर आता जागलेले, जिवंत व उत्साही असते.
विभासला ई-मेल मिळाली. "शुभाशीर्वाद! देवाने तुला आता भरभरून दिले आहे. सुखी राहा. इथे आम्ही आमची "सोय' करून घेतलेली आहे!'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: priya shrikant write article in muktapeeth