केरळमधील महिलाराज

प्रा. मुक्ता गरसोळे-कुलकर्णी
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

पर्यटन म्हणजे केवळ सृष्टीसौंदर्य टिपणे नव्हे. त्या त्या भागातील संस्कृतीही समजून घ्यायला हवी. सांस्कृतिक भूगोल किंवा मानवी भूगोल म्हणतो, तो टिपता आला पाहिजे.

कौटुंबिक सहलीच्या निमित्ताने नुकतीच आम्ही केरळ व तमिळनाडूला भेट दिली. या आमच्या सहलीदरम्यान तिथला निसर्ग, भूगोल तर जाणून घेता आलाच; पण त्याहूनही अधिक तिथली संस्कृती, चालीरिती, मानवी स्वभाव वैशिष्ट्ये जास्त प्रकर्षाने जाणवली.

पर्यटन म्हणजे केवळ सृष्टीसौंदर्य टिपणे नव्हे. त्या त्या भागातील संस्कृतीही समजून घ्यायला हवी. सांस्कृतिक भूगोल किंवा मानवी भूगोल म्हणतो, तो टिपता आला पाहिजे.

कौटुंबिक सहलीच्या निमित्ताने नुकतीच आम्ही केरळ व तमिळनाडूला भेट दिली. या आमच्या सहलीदरम्यान तिथला निसर्ग, भूगोल तर जाणून घेता आलाच; पण त्याहूनही अधिक तिथली संस्कृती, चालीरिती, मानवी स्वभाव वैशिष्ट्ये जास्त प्रकर्षाने जाणवली.

सर्वांत महत्त्वाची गोष्ट केरळ व तमिळनाडू दोन्ही राज्यांत जाणवली ती म्हणजे तिथले "महिलाराज'. महिलाराज हा शब्द इथे मी राजकीय अर्थाने वापरत नाही. सर्वच क्षेत्रांत महिलांचा मोठ्या प्रमाणात आणि मुक्त वावर या अर्थी वापरत आहे. सतत कार्यमग्न असणे, हे या महिलांचे वैशिष्ट्य. आम्ही ज्या ज्या हॉटेल्समध्ये खायला किंवा जेवायला गेलो, त्या सर्व हॉटेल्समध्ये मुख्य गल्ल्यावर हिशेब करणाऱ्या महिला तर होत्याच; पण वेटर म्हणून मेनू सांगणाऱ्या आणि ऑर्डर घेणाऱ्या, खाद्यपदार्थ आणून देणाऱ्याही महिलाच होत्या, हे बघून मला आश्‍चर्यच वाटले. आपल्या महाराष्ट्रातील हॉटेल्समध्ये महिला सहसा स्वयंपाकघरातील कामे करताना दिसतात. त्याही बहुतेकदा खरकटी भांडी धुताना दिसतात. हॉटेलच्या गल्ल्यावर, वेटर म्हणून, खरकटे उचलून टेबल साफ करण्याच्या कामात सगळीकडे महिलाच होत्या तिथे. छानपैकी साडी नेसून, त्यावर हॉटेलचे नाव असणारा ऍप्रन घालून, वेणीत फुले माळून सुहास्य करत या महिला आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि पूर्णवेळ उभ्या राहून करत होत्या.

कोईमतूरमध्ये एका पाच मजली साड्यांच्या दुकानात साडी खरेदीसाठी गेलेलो असताना तर अगदी बोटावर मोजण्याइतपत अपवाद सोडले, तर पुरुषांची संख्या नगण्यच दिसली. कॅश काउंटरपासून ते गिऱ्हाईक महिलेला साडी दाखवून, ती नेसवून दाखवण्यापर्यंत महिलांचेच राज होते. आम्ही खरेदी करून बाहेर पडल्यावर काही वेळातच ते दुकान बंद झाले, तर जवळपास पन्नास-साठ कर्मचारी महिलांचा एक मोठा जथ्था दुकानातून बाहेर पडला.

केरळमधील पालक्कड जिल्ह्यातील सायलंट व्हॅली या अभयारण्यात गेलो होते. सकाळी आठ वाजताच्या रिपोर्टिंगच्या वेळी पाच-सहा महाविद्यालयीन मुलींचे दोन गट स्वतंत्रपणे अभयारण्याच्या सफरीला आलेले दिसले. फॉरेस्ट विभागाच्या स्वतंत्र जीपमधून गाइड व ड्रायव्हरसह ते ग्रुप आपापले फिरायला गेले, तेव्हा जाणवली त्यांची स्वायत्तता! मानवी वस्ती नसलेल्या त्या जंगलात आपली गाडी खालीच ठेवून वर जंगलात तीस-चाळीस किलोमीटर जावे लागले. फॉरेस्टच्या गाडीतून. तिथे गेल्यावरही जाणवली महिला वन कर्मचाऱ्यांची, महिला सुरक्षारक्षकांची, महिला सफाई कामगारांची मोठी संख्या. निबिड जंगलात पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबरीने या महिला वन विभागात सक्रिय होत्या. या सहलीत मला जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे महिला स्वच्छतागृहांची नेमकी उपलब्धता. त्या अभयारण्यात आमच्या रिपोर्टिंग जागेपासून ते अगदी डोंगरमाथ्यावर, भर जंगलातही स्वच्छ अशा महिला स्वच्छतागृहांची सोय होती. साड्यांच्या दुकानात, हॉटेल्समध्ये महिला स्वच्छतागृहे मला दिसली. अगदीच एखाद-दुसरा अपवाद सोडला तर ती सर्व स्वच्छ होती हे विशेष!
स्त्रियांबाबत आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे फुलांचे वेड. अगदी व्यग्र असणारी, उच्च स्थान भूषवणारी नोकरदार महिला असो किंवा अशिक्षित सफाई कर्मचारी असा, तिच्या केसात गजरा किंवा एखादे टपोरे फूल माळलेले असतेच. मोगरा, अबोली ही तर नेहमीचीच फुले; पण याशिवाय अनेक रंगीबेरंगी, वासाची, बिनवासाची फुले या स्त्रिया हमखास केसात माळतात. केसात फुले नसणारी महिला जवळपास नाहीच. त्या महिलांचे रसिक मन मला यातून प्रकर्षाने जाणवले.

कोईमतूरजवळील एका प्रसिद्ध योग आश्रमाला आम्ही भेट दिली. तिथे तर वयस्कर, अपंग व्यक्तींना सौर रिक्षातून आश्रम परिसर फिरवण्याचे कामही सर्व महिलाच करत होत्या. आश्रमाची माहिती पर्यटकांना सांगणे, उत्सुक पर्यटकांना योग आणि नाडीशुद्धीचे "प्रेझेंटेशन' दाखवून त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करून घेणे या सर्व कार्यात अगदी शाळकरी मुलींपासून ते मध्यमवयीन महिलांपर्यंत सहभागी होत्या.

एक गोष्ट मात्र जाणवली, की या दोन्ही राज्यांमध्ये या महिला पाश्‍चात्त्य वेशभूषा आणि केशभूषेचे अंधानुकरण करत नाहीत. जीन्स, स्कर्ट, फ्रॉक, टी-शर्ट घालणाऱ्या, बॉबकट किंवा कमी केस ठेवलेल्या महिला मला फारच अपवादाने दिसल्या. अशिक्षित, सुशिक्षित, श्रीमंत, गरीब अशा सर्व महिला साडी अथवा पंजाबी ड्रेसमध्येच होत्या. काळ्याभोर केसात-वेणीत गजरा आणि नाकात चमकणारी चमकी अशाच वेशात होत्या.

एकंदरीतच काय, केरळ आणि तमिळनाडू या दोन्ही राज्यांत जाणवलेले "महिलाराज' हे असे होते. स्त्रियांची अनेक क्षेत्रांतील लक्षणीय संख्या, मुक्त वावर, त्यांच्या गरजांचा, प्रश्‍नांचा समाजाने केलेला विचार, त्यांचे रसिक कलासक्त मन या सर्व गोष्टी एक स्त्री म्हणून मला सुखावणाऱ्या वाटल्या!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prof mukta garsole-kulkarni write article in muktapeeth