थोडीशी जागा

प्रा. नीला विजय कदम
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

गाडीतील आपल्या शेजारची थोडीशी जागा देण्यासाठी अंतःकरणात जागा होऊ दे!

गाडीतील आपल्या शेजारची थोडीशी जागा देण्यासाठी अंतःकरणात जागा होऊ दे!

कारगिलचे युद्ध संपले होते. प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या जवानांना, अधिकाऱ्यांना आता ओढ लागली होती घराची. सुटी मिळाल्यानंतर मिळेल त्या वाहनाने देशभरातील सैनिक घराकडे निघाले. त्यातीलच सहा जण झेलम एक्‍स्प्रेसने नियमानुसार तिकीट काढून प्रवास करीत होते. आयत्यावेळी रजा मंजूर झाल्याने त्यांच्याकडे आरक्षण नव्हते. त्यांनी रात्र जागून कुठेतरी अवघडत बसत-उठत काढली. अतिशय थकलेले, पण चेहऱ्यावर विजयश्रीचा आनंद अन्‌ कमालीचा अभिमान असणाऱ्या गणवेशधारी जवानातील एकाने पाय पसरून बसलेल्या एका व्यक्तीला विनंती केली, की थोडी बसायला जागा द्याल का? एकाएकी तोफेच्या गोळ्यांप्रमाणे तोंडातून शब्दांची सरबत्ती सुरू झाली. "आम्ही रिझर्व्हेशन केलंय. तुम्हाला इथे मुळीच बसता येणार नाही. बुकिंग करायला काय झालं होतं?' इत्यादी. ""आपण थोडे सरकून बसू या,'' कुणीतरी मोकळ्या स्वरात उद्‌गारले. "सैन्यात आहेत ना, मग उभे राहायची सवय असेलच की!' म्हणत पुन्हा नकारात्मक शब्दांची खैरात. जवानांची पावले पुन्हा टॉयलेटजवळच्या पॅसेजमध्ये. शेजारच्या कंपार्टमेंटमधील लोकांच्या कानावर हे शाब्दिक युद्ध पडलेच होते. तिथले दोघे उठले, म्हणाले, ""आओ भाईजान, आओ! इधर हमारे साथ बैठो। हमे बहोत अच्छा लगेगा।'' त्यांना अक्षरशः हाताला धरून बोलावले. भराभर सर्वांनी पसारा आवरला. त्या सहा जणांना आपलेसे करून घेतले.

एका कंपार्टमेंटमध्ये शास्त्रीय संगीताच्या सुरांमध्ये चिप्स खात पुस्तक वाचणारी सुखासिनता पहुडली होती; तर दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये दाटीवाटीने बसलेली आपुलकी लकाकत्या, विस्फारलेल्या नेत्रांनी शौर्याच्या कथा जाणून घेण्यास सरसावली होती. स्वतःच्या अहंकारी संकुचित वृत्तीला कुरवाळणारे कंपार्टमेंट ऐसपैस पसरलेली होती आणि ज्यांनी अविश्रांत धडपडीतून सीमा रक्षणाची धुरा पेलली, हा देश भारतवासीयांसाठी "रिझर्व्ह' ठेवला त्या जवानांकडे ट्रेनचे आरक्षण नसल्याने त्यांना विसाव्यासाठी फूटभर जागा मिळू शकत नव्हती.

सैनिकांना थोडीशी जागा देण्याइतकी त्यांच्या अंतःकरणात जागा होऊ दे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prof neela kadam write article in muktapeeth