शिक्षणाचा ध्यास जया

प्रा. रमेश पंडित
मंगळवार, 3 एप्रिल 2018

मॅट्रिकनंतर पुढे काय शिकायचे असते हेच माहीत नव्हते; पण दिशा मिळाली आणि पुण्यात आल्यावर गरिबांच्या मुलांना दिशा देण्याचे कार्य ते करीत राहिले. शिक्षणाचा ध्यास आणि सामाजिक कनवळा एवढेच त्यांच्यापाशी आहे.

मॅट्रिकनंतर पुढे काय शिकायचे असते हेच माहीत नव्हते; पण दिशा मिळाली आणि पुण्यात आल्यावर गरिबांच्या मुलांना दिशा देण्याचे कार्य ते करीत राहिले. शिक्षणाचा ध्यास आणि सामाजिक कनवळा एवढेच त्यांच्यापाशी आहे.

मराठवाड्यातल्या एका खेडेगावातील तो मुलगा. मॅट्रिकनंतर शिक्षक व्हायचे एवढेच त्याच्या गावात माहीत होते. महाविद्यालयाच्या क्‍लार्कने वाणिज्य शाखेला नाव नोंदवले आणि तो मुलगा तिकडे गेला. ती वाट त्याला माहितीची नव्हती; पण त्या वाटेवरून धीर धरून जिद्दीने तो चालत राहिला आणि त्याच वाटेवरच्या प्रत्येक मुक्कामावर स्वतःचे नाव कोरत गेला. मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांचा आजवरचा सारा प्रवास अभिमानास्पद व प्रेरणादायी आहे.

प्राचार्य जाधव सरांना "युनिव्हर्सिटी ऑफ साउथ अमेरिके'ची मानद डी. लिट. प्राप्त झाली, हे केवळ निमित्त ठरले. त्यांनी शिक्षणाचा ध्यास ज्या पद्धतीने घेतला आणि पुढचा सारा प्रवास केला ते आठवत गेले. सर मूळचे लातूरजवळच्या एका छोट्याशा खेडेगावातील. तेथूनच मॅट्रिक झाले. त्यांना त्या वेळच्या माहितीनुसार शिक्षक व्हायचे होते, पण डी.एड. शिक्षणासाठी वय कमी पडले. एक वर्ष घरात बसण्यापेक्षा पुढे शिकावे म्हणून ते महाविद्यालयात गेले. त्यांचे गुण पाहून महाविद्यालयाच्या क्‍लार्कने त्यांना विज्ञान शाखेला प्रवेश घ्यायला सांगितला. खिशात फक्त वीस रुपये होते. प्रवेशशुल्क तुलनेने खूप होते. म्हणून त्या क्‍लार्कने त्यांना अर्ज बदलून वाणिज्य शाखेत पाठवले. त्या वेळचे "करिअर गायडन्स' हे असे होते.

पहिल्या वर्षी विद्यापीठात पहिले आल्यामुळे पुढच्या दोन वर्षांच्या शिक्षणशुल्कात सवलत मिळाली म्हणून बी. कॉम. झाले. मराठवाडा विद्यापीठात वाणिज्य शाखेत पहिले आले. पुण्यात आले. नोकरी करता करता एम. कॉम झाले. प्राथमिक शाळेत शिक्षक होणार असे सांगणारा खेड्यातला मुलगा लातूरच्या दयानंद कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्राध्यापक झाला. दोन वर्षांनी पुन्हा पुण्यात आले. हडपसरच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात अध्यापन सुरू केले. त्याच वेळी मराठवाडा मित्रमंडळ संस्थेच्या वसतिगृहाची जबाबदारी स्वीकारली. 1986 मध्ये संस्थेने डेक्कन परिसरात वाणिज्य महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा प्राचार्य म्हणून जबाबदारी सरांनी स्वीकारली. छोट्याशा जागेत असलेली सरांची केबिन, अगदी मोजका प्राध्यापक आणि सेवकवर्ग, सगळी कामे करण्याची सगळ्यांची असलेली तयारी आणि सुरवातीला किमान गुणवत्तेचे असलेले 189 विद्यार्थी या साऱ्यासह सुरू झालेले एम.एम.सी.सी. आजही आठवते आहे.

डेक्कन परिसरात आजूबाजूला असलेल्या नामांकित महाविद्यालयांच्या शेजारी हे नवे महाविद्यालय विकसित करायचे होते. ही आव्हानवजा जोखीम जाधव सरांनी पत्करली. जाधव सर या महाविद्यालयाचे एकवीस वर्षे प्राचार्य होते. महाविद्यालयात विविध शैक्षणिक उपक्रम घडवले. त्यामुळे अल्पावधीत या महाविद्यालयाची नोंद घेतली जाऊ लागली. महाविद्यालयाचा विकास होत असतानाच सरांनी विद्यापीठातील महत्त्वाच्या पदांवरही काम केले. स्वतःच्या महत्त्वाकांक्षा न जोपासता, संस्थेच्या हिताला कायम महत्त्व देत राहिले. मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे वसतिगृह प्रमुख, संस्थेचे कोशाध्यक्ष, सचिव आणि आता कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ही पदे सांभाळताना विविध विद्या शाखांच्या आठ महाविद्यालयांची उभारणी केली. खरे तर संस्थेच्या पाठिंब्यावर दुसरा एखादा "शिक्षणसम्राट' होऊ शकला असता; पण सरांनी "शिक्षणमहर्षी' होणे पसंत केले.

विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सरांनी मोलाचे योगदान दिले आहे. सकाळ इंडिया सोशल फाउंडेशनचे कार्यकारी सदस्य, पुणे विद्यार्थी सहायक समितीचे विश्वस्त यांसह आणखी काही संस्थांसाठी ते कार्यरत आहेत. सिंधूताई सपकाळ यांच्या "ममता बाल सदन'मधील दोनशे विद्यार्थ्यांना सलग बारा वर्षे दिवाळीत "मामाच्या गावाची सफर' घडवली. डॉ. अपर्णा देशमुख यांच्या "आभाळमाया' या वृद्धाश्रमाला आणि विजय फळणीकर यांच्या "आपलं घर'ला नित्य मदत पुरवली जाते. सामाजिक उपक्रमांना मानवी चेहरा देण्याचे, मानवी शाश्वत मूल्ये जोपासण्याचे महत्त्वाचे काम सरांनी केले आहे. वसतिगृहात राहिलेल्या आणि राहत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांची गरज लक्षात घेऊन मदत केली जाते.

शिक्षणानेच सारे घडवता येते, हे सरांचे सांगणे असते. त्यासाठी गरीब, होतकरू विद्यार्थी, विशेषतः विद्यार्थिनी शिकली आणि तिची यशोगाथा सरांना समजली, की समाधानाचे हसू त्यांच्या चेहऱ्यावर उमटते. त्यांच्यापाशी शिक्षणाचा ध्यास, सामाजिक कनवळा आणि जिद्द, संयम आणि ऋजुता, दूरदृष्टी आणि काम करवून घेण्याची क्षमता, हे सारे आहे. मधुर वाणीने सर्वांना आपलेसे करत संस्थेला मोठे करण्याचा घेतलेला वसा त्यांनी जोपासला आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणा देत राहते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prof ramesh pandit write article in muktapeeth