आनंदाच्या देशात...

प्रा. संजीव कदम-पाटील
मंगळवार, 19 मार्च 2019

भूतान हा निसर्गावर प्रेम करणारा आणि आनंदी राहणारा आपला शेजारी आहे. देश अगदी छोटा; पण तेथे नाही आनंदाला तोटा.

भूतान हा निसर्गावर प्रेम करणारा आणि आनंदी राहणारा आपला शेजारी आहे. देश अगदी छोटा; पण तेथे नाही आनंदाला तोटा.

भूतान हा देश जगात सर्वांत आनंदी देश म्हणून ओळखला जातो, याचे सर्व श्रेय तेथील समृद्ध अशा निसर्गाला जाते. येथे फिरताना दिसल्या नद्या दुथडी भरून वाहताना अन्‌ झरे खळखळताना. पाणी अगदी काचेसारखे, स्वच्छ, प्रदूषणमुक्त. नद्यांमध्ये मासेमारीसाठी अतिशय कडक कायदे. जनताही कायद्यांचे काटेकोरपणे पालन करताना आढळते. आपल्या एखाद्या कृतीमुळे दुसऱ्या माणसाला अपमान वाटू नये याचीही ते काळजी घेतात. त्यामुळे त्या आठ दिवसांतील प्रवासात कुठेही गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकला नाही. आम्ही अभ्यास दौऱ्यामध्ये भूतानची राजधानी थिम्फू, पुनाखा, फुन्त्सोलींग व पारो या शहरांना व शहरालगतच्या ग्रामीण भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन पर्यावरणपूरक शेती व्यवसाय पाहिला. आम्हाला रासायनिक खतांचे अगर औषधांचे दुकान आढळले नाही. सेंद्रिय शेतीचा पुरस्कर्ता असणाऱ्या या छोट्या देशाला मी मनोमन धन्यवाद दिले. पर्यावरणसंवर्धन, वृक्षसंगोपन व स्वच्छता यांबाबत येथील लोक खूपच संवेदनशील आहेत. येथील एक वैशिष्ट्य म्हणजे ते लोक निसर्गालाच आपली देवता मानतात. हे लोक एवढ्या समृद्ध निसर्गात असूनही राहत्या घराजवळ जेथे जेथे जागा उपलब्ध असेल तेथे छोट्या छोट्या बाटल्या-कुंड्यांमधूनही झाडेझुडपे लावतात, प्रेमाने जोपासतात.

भगवान गौतम बुद्धांची शिकवण अंगीकारताना, त्यांच्या विचारांचा, तत्त्वांचा वारसा तंतोतंत आचरताना दिसतात. निसर्ग हा त्यांच्या जीवनाचा मुख्य घटक असल्याने, एखादे झाड किंवा वृक्ष वाळून पूर्णपणे निष्पर्ण होत नाही तोवर त्यावर कुऱ्हाड चालवायची नाही, हा झाला कायद्याचा एक भाग; परंतु येथील लोकच निसर्गाचे संवर्धन कायद्याच्याही पुढे जाऊन करतात. म्हणूनच ही माणसेच खऱ्या अर्थाने निसर्गपुत्र मानावी लागतील. विकसनशील देशातील लोकांना कायदे करून अमूक चाकोरीतून जगावे, असे कायदेशीर बंधनानेच समजते अन्‌ विकसनशीलतेच्याही अगदी अलीकडे असणाऱ्या भूतानसारख्या देशातील लोकांमध्ये कायदा हा स्वाभाविक नैतिक जबाबदारी असते. यातूनच आपले आपल्या देशावरील असीम प्रेम पाझरत असते, हे शिकावे तर ते फक्त आणि फक्त भूतानी नागरिकांकडून!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prof sanjeev kadam patil write article in muktapeeth