पुनर्जन्माची प्रचिती !

पुनर्जन्माची प्रचिती !

दैनंदिन कामाशी संबंधित असलेले विविध अनुभव जीवनाच्या पुढच्या टप्प्यावर हळूहळू विस्मरणात जातात. पण काही अनुभव असे असतात, की ते कधीच विसरता येत नाहीत. माझ्याही आयुष्यात असा एक प्रसंग घडला. मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परत आल्याचा तो थरारक प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही!

सरकारी सेवेत कार्यरत असताना निरनिराळ्या अनुभवांना सामोरे जावे लागते. दैनंदिन कामाशी संबंधित असलेले विविध अनुभव जीवनाच्या पुढच्या टप्प्यावर हळूहळू विस्मरणात जातात. पण काही अनुभव असे असतात, की ते कधीच विसरता येत नाहीत. माझ्याही आयुष्यात असा एक प्रसंग घडला. मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परत आल्याचा तो थरारक प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही!

शिक्षण संचालनालयामध्ये मी कार्यरत असताना 1997 मध्ये एके दिवशी मुंबईतील लोकआयुक्त कार्यालयात सेवानिवृत्तीप्रकरणी सुनावणी ठेवण्यात आलेली होती. शिक्षण खात्याचे वार्षिक स्नेहसंमेलन असल्यामुळे शिक्षण संचालक आणि सहसंचालक यांच्या वतीने त्या सुनावणीसाठी मला हजर राहणे क्रमप्राप्त झाले. त्यामुळे सकाळी लवकर स्टेशनवर पोचून "प्रगती एक्‍स्प्रेस‘ गाठून लोकआयुक्त यांच्या कार्यालयात ठीक वेळेवर पोचलो.

सेवानिवृत्तीप्रकरणी सखोल अभ्यास मी केला होता, त्यामुळे नियोजित सुनावणी व्यवस्थित पार पडली. त्या खुशीत छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे कधी पोचलो, ते कळलेच नाही. या धावपळीत दुपारचे भोजन घ्यायचे राहून गेले. स्टेशनवरच स्नॅक्‍स आणि कपभर चहा घेतला. टी.सी.कडून परतीचे तिकीट खरेदी केले. रेल्वे प्लॅटफॉर्मवर येताच मी रेल्वेमध्ये प्रवेश केला.

डब्यात शिरताच आश्‍चर्याचा धक्का बसला, कारण पूर्वीच्या वनविभागातील मित्र, जे त्या वेळेस मुंबई येथील सीआयडी कार्यालयात पुणे येथून ये-जा करीत असत, ते बसले होते. मोठ्या आनंदाने त्यांच्यामध्ये जाऊन सामील झालो. मग आमच्या गप्पांचा फड चांगलाच जमला! कितीतरी जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला. गप्पा मारता मारता शिवाजीनगर स्टेशन आले, तरी आमच्या गप्पा संपेनात! शेवटी माझे मित्र विलास राहतेकर व सुधीर दिडमिसे यांनी मोठ्याने सांगितले, की "एम.डी. चला, शिवाजीनगर आले!‘ तेव्हा घाईघाईतच फाईल आणि ब्रीफकेस घेऊन आम्ही दारापाशी येऊन थांबलो. शिवाजीनगरच्या प्लॅटफॉर्मवर रेल्वे येताना सुरवातीला थोडे वळण होते. त्या वेळेस माझा पाय अचानक घसरला. दोन्ही मित्रांना कळण्याच्या आत मी प्लॅटफॉर्म आणि रुळ यांच्यामध्ये पडलो. त्या गडबडीतही पाय रुळावर पडताच मी क्षणार्धात तो आखडून घेतला, अन्यथा एक पाय गमवावाच लागला असता. प्लॅटफॉर्म आणि रुळ यांच्यामधल्या जागेत मी आडवा झोपून राहिलो. जवळ जवळ सात ते आठ डबे जाईपर्यंत माझ्या अंगावर चाकांतून ठिणग्या उडत होत्या. त्या भीषण अनुभवाला सामोरे जात असताना माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकत होते. परंतु, गाडी थांबेपर्यंत मी काहीच करू शकत नव्हतो. हतबल होणे म्हणजे काय, हे पुरते अनुभवता आले.

रेल्वे थांबल्याबरोबर माझे मित्र अशोक देवस्थळी, विलास वांद्रे, रहातेकर आणि दिडमिसे पळत पळत आले. त्यांनी घाबरेघुबरे होऊन मला प्लॅटफॉर्मवरून विचारले, "एम.डी., तू व्यवस्थित आहेस ना? काही प्रॉब्लेम?‘ मी "ओके‘ असे म्हणताच क्षणाचाही विलंब न लावता त्या सर्वांनी मला हाताला धरून वर ओढले. त्यामुळे प्लॅटफॉर्मला माझी पाठ घासल्यामुळे पुरती सोलून निघाली. मित्रांनी मला एका बाकावर झोपवले. रेल्वे पुणे स्टेशनकडे रवाना होताना घड्याळ, चष्मा, ब्रीफकेस, कागदपत्रांची फाइल असे माझे सर्व सामान मित्रांनी गोळा करून माझ्याकडे सुपूर्त केले. घरी येताच शनिवार पेठेतील वैद्य साठे यांच्याकडे औषधोपचारासाठी गेलो. माझी सगळी कहाणी ऐकून ते भारावले. म्हणाले, ""कुलकर्णी, तुम्ही आजपर्यंत केलेल्या पुण्याईचे हे सार्थक आहे! देवाचे आभार माना, कारण तुमचा हा पुनर्जन्म आहे! त्यानंतर महिनाभर रात्रीच्या झोपेत सारखा रेल्वेचा आणि रुळांच्या आवाजाचा भास होऊन मी दचकून जागा होत असे. दैव बलवत्तर म्हणूनच मी त्या भयानक प्रसंगातून वाचू शकलो! नशिबाची दोरी बळकट नसती, तर..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com