पझेसिव्ह (मुक्तपीठ)

मनाली मुळ्ये
सोमवार, 10 डिसेंबर 2018

आमच्या समोरच गाडीवरून ते पडले. त्यांच्या मुलाला मी जवळ घेतले आणि माझ्या मुलीत मालकी हक्काची जाणीव जागी झाली. 

"पझेसिव्ह आहेस तू...' म्हणणे किती सोप्पे आहे, अगदी रोजच्या वागण्या-बोलण्यातला शब्द. हे पझेसिव्ह म्हणजे नेमके काय? आपल्या मालकीची वस्तू, व्यक्ती, छंद यातील काहीही असो, पण आज माझ्या चिमुकलीने यावर विचार करायला लावला. प्रसंग अगदी छोटाच...जबलपूर-पुणे परतीचा प्रवास...रात्री साधारण नऊची वेळ. निर्मनुष्य रस्ता आणि घाट संपणारी दिशा. कोणी अनोळखी भरधाव मोटारसायकल चालवत होता. बरोबर दोन लहान मुले आणि बायको. कसा चालवतोय गाडी मुलाबाळांना घेऊन, असे बोलतच होतो तोच त्यांची गाडी हातातून निसटलेली. सगळेच पडलेले.

मोठ्या मुलाचा डोळा वाचलेला, पण डोळ्याच्या आजूबाजूला फक्त रक्त. त्याची बायको भेदरलेली. दारू पिऊन गाडी चालवणारा तो आणि त्यांचा छोटा मुलगा अगदी दोन-तीन वर्षांचा असावा. तो अजाण घाबरलेला जीव जोरदार टाहो फोडत होता. आई समोर असूनही त्याला आईचेच वेध लागलेले. तेजससोबत मीसुद्धा गाडीतून खाली उतरले आणि त्या छोट्या जिवाला जवळ घेऊन शांत करत गेले.

क्षणभरासाठी त्या चिमुकल्या हातांनी मला धरले आणि हळूहळू परिस्थिती शांत झाली. तेजसने एक टेम्पो थांबवला तसे अनेक मदतीचे हात एकत्र आले आणि त्या कुटुंबाला सुखरूप बसवून दिले. त्यांना वेळीच मदत मिळाली आणि तो मुलगा शांत झाला याचे वेगळेच समाधान घेऊन आम्ही गाडीत बसलो, पण या सगळ्यात ऋत्वी गाडीतच होती आणि माझ्याभोवती घडलेले एक एक दृश्‍य तिने अचूक टिपलेले, आता मात्र तिच्या प्रश्‍नपत्रिकेतून माझी सुटका नव्हती हे कळलेच. 

तू त्या बाळाला का घेतलेस? त्याला हात का लावलास? त्याने तुला का पकडले? तू का गेलीस? त्याने तुला माझ्यासारखे का पकडले? डोळ्यातले पाणी सावरत तिचे तेच तेच प्रश्‍न सुरू झाले. प्रश्‍न तेच होते फक्त माझे एकही उत्तर तिला मान्य नव्हते. पुढचा कितीतरी वेळ अगदी पापण्यांनी विसावा घेईपर्यंत ती मला हेच विचारत होती. आणि मी मात्र निरुत्तर होत गेले. मला बिलगून ऋत्वी झोपी गेली खरी, पण माझ्या डोळ्यासमोर सगळेच चित्र रेखाटले जात होते.

त्या लहान मुलाचे आई समोर असून आईसाठी रडणे, आमचे घर जवळच आहे, माझ्या मुलाला दवाखान्यात घेऊन जावे लागेल म्हणत आपल्या दारूड्या नवऱ्याशी भांडणे, त्या बेजबाबदार चालकाने कुटुंबाची काळजी न करता गाडी चालविणे, माझ्या चिमुकलीने आईवरचा हक्क सांगणे. कुठे आईचे रक्ताळलेल्या लेकरासाठी तुटणारे काळीज होते आणि कुठे एका चिमुकलीचे आईसोबत आईसाठीच केलेले गोड भांडण होते. पझेसिव्ह म्हणजे नेमके हेच का? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article in Muktapeeth