मस्त चाललंय !

अनघा ठोंबरे
सोमवार, 7 जानेवारी 2019

राम-लक्ष्मणासारखे असणारे भाऊ एकमेकांचे वैरी झाले. पण मुलांनी या भांडणात सामील व्हायचे नाकारले आणि दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र आले.

आम्ही पाच सख्खी आणि तीन चुलत भावंडे. लहानपणापासून एक मस्त टीम. वडील आणि काकाही राम-लक्ष्मण. दोघांचा एकत्र व्यवसाय. सतत आम्ही एकमेकांकडे असू. आई आणि काकू तर सख्ख्या बहिणींपेक्षा जास्त एकमेकींना जीव लावणाऱ्या. दोघींची घरे एकमेकींचे माहेरच. पण एकदिवस या सगळ्याला दृष्टच लागली. व्यवसायात मंदी आली. कर्ज झाले. कुठे तरी बिनसले. वडील आणि काकांचे कडाक्‍याचे भांडण झाले. त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केले.

सर्व संबंध तोडून टाकले. स्पर्धा, दोषारोप सुरू झाले. येणे- जाणेच काय, बोलणेही बंद झाले. काकू आणि आई... बिचाऱ्या मैत्रिणी दुरावल्या. कर्त्या पुरुषांच्या भांडणामुळे संपूर्ण कुटुंबातच जणू निष्कारण शत्रुत्व निर्माण झाले. आम्ही भावंडे सर्व बरोबरीची. ते वय मैत्रीत रमणारे. पण एकदमच हे धक्कादायक पर्व सुरू झाले. सगळा आनंद, मजाच निघून गेली. भेटीगाठी थांबल्या. अगदी ओळख दाखवणेही नाही. दोन भावांतली तेढ वाढतच गेली. कालपर्यंत एकमेकांबद्दल आदर, प्रेम, कौतुकाने बोलणारे ते कट्टर दुष्मन झाले. 

चार-सहा महिने कसेबसे गेले. मोठ्यांनी भांडायचे तर भांडावे, पण आम्ही का असे दूर राहायच? उत्तर मिळत नव्हते. मोठ्यांसमोर काय बोलणार? विषय काढायचीही हिंमत नव्हती. शेवटी एके दिवशी आम्ही भावंडे ठरवून सारसबागेत भेटलो. आम्ही ठरवले, की आपली मैत्री कायम ठेवायची. मोठे त्यांचा व्यवसाय, वाद बघून घेतील. काही दिवस आम्ही बाहेरच भेटत राहिलो. मग चक्क एकमेकांच्या वडिलांसमोर उभे राहिलो आणि तुमच्यामुळे आम्ही शत्रू होणार नाही असे सर्वांनी एकमुखाने सांगितले. आम्ही पूर्वीप्रमाणे धमाल सुरू केली.

आमचे पाहून आई-काकूही पुढे सरसावल्या. त्या म्हणाल्या, आम्हीही भेटत राहू. जणू मध्यंतरीच्या काळात काही घडलेच नव्हते, अशा पद्धतीने आम्ही मस्त "एन्जॉय' करू लागलो. वडील व काका एकटे पडले. अखेर एक दिवस दोघे फोनवर परस्परांशी बोलले, मुलांनीच आपल्याला धडा शिकवलाय, आता आपण सर्व विसरून परत एकत्र येऊ या. दोघांचे व्यवसाय वेगळे झाले, पण त्या दोघांमधले भांडण संपले. आता पूर्वीसारखेच आमचे मस्त चाललेय! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article of Muktapeeth