मेलबर्नच्या मावशी (मुक्तपीठ)

पल्लवी कुलकर्णी-अत्रे
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

मेलबर्नच्या मावशी येथील मराठी माणसांचा आधार आहेत. प्रत्येक कामातील त्यांची मनःपूर्वकता, स्वागतशील वृत्ती सर्वांना आपलेसे करणारी आहे.

मेलबर्नमधील सीफर्ड परिसरात मस्तपैकी चापूनचोपून नेसलेली पाचवारी साडी, कपाळावर टिकली, मानेवर छानसा अंबाडा आणि चेहऱ्यावर प्रसन्न हसू अशी एक भारतींय स्त्री गेली साधारण तीस वर्षे अनेकांचा दृष्टीस कधी ना कधी पडली असेल. शुभदा गोखले इथल्या मराठी माणसांच्या "मावशी'च. अतिशय प्रेमळ, अगत्यशील, आल्या-गेल्या पाहुण्यांचे आपुलकीने हसून स्वागत करणाऱ्या मावशी कुणालाही पटकन आपलेसे करतात. तीस वर्षांपूर्वी परदेशाच्या कल्पनाही अमेरिका, इंग्लंड अथवा युरोपातील एखादा देश इतक्‍या मर्यादित! अशा काळात ऑस्ट्रेलियासारख्या अनोळखी देशात नवऱ्याबरोबर दोन लहानग्या मुलांसोबत मावशी आल्या.

परकी भाषा, जगाचा फारसा अनुभव नाही, लहान वय, आप्तेष्टांपासून दूर, आर्थिक स्थैर्य नाही अशी अनेक आव्हाने. पण त्यांच्याशी चार हात करायची मनापासूनची तयारी आणि जोडीला भक्कम प्रयत्न, यामुळे मावशी इथे रुळल्या. त्यांनी अनेक छोटे मोठे उद्योग केले. अगदी लोणची, मुरांबे करून विकण्यापासून ते फळांच्या फॅक्‍टरीमध्ये काम करण्यापर्यंत! सरकारी परीक्षा उत्तीर्ण करून त्या मेलबर्नमधील कर विभागात रुजू झाल्या. 

कर विभागातील मुलाखतीची त्यांची आठवण फारच मजेशीर आहे. त्या सांगतात, "मी नेहेमीप्रमाणे साडी नेसूनच गेले होते. मुलाखत घेण्यासाठी तीन लोकांचे पॅनेल होते. प्रथम काही प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्यापैकी एकाने विचारले, "आम्ही जर तुला नोकरी दिली तर तू अशी साडी नेसूनच रोज ऑफिसला येणार का?' त्यावर मावशींनी क्षणभर विचार केला आणि उत्तर दिले, "सध्या भारताच्या पंतप्रधान आहेत इंदिरा गांधी. त्या जर साडी नेसून देशाचा कारभार नीट सांभाळू शकत असतील, तर मी रोज साडी नेसून टॅक्‍सेशन ऑफिसमध्ये कामाला का नाही येऊ शकत?'

या उत्तराने अवाक झालेल्या मुलाखतकारांनी मावशींना इंग्रजी भाषेवर फारसे प्रभुत्व नसताना आणि अकाउंटिंग क्षेत्राची केवळ तोंडओळख असताना तत्काळ कायमस्वरूपी नोकरी देऊ केली. सेवानिवृत्तीनंतरही तरुणांना लाजवणाऱ्या उत्साहाने वावरणाऱ्या मावशी त्यांच्या कविता, लेख समाजमाध्यमांवरही देत असतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article Muktapeeth Article