आई आठवताना... (मुक्तपीठ)

सुनीता जितकर-सुडके
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

आईला भेटवस्तूंपेक्षा खरी अपेक्षा असते ती मुलांच्या प्रेमाची, त्यांच्या सहवासाची अन्‌ मायेच्या दोन शब्दांची. 

यंदाची दिवाळी आईविना सुनीसुनी गेली. आईशिवायची ही पहिलीच दिवाळी. दिव्यांच्या लखलखाटात आणि प्रकाशातही आईच्या जाण्याचे दुःख मनात सलत होते. तिच्या प्रेमळ आठवणींनी डोळे कधी पाझरू लागले ते समजलेही नाही. घरातील मोठी सून म्हणून पारंपरिक मूल्ये जपत सर्व जबाबदाऱ्या तिने निभावल्या. तिचा त्याग, सोशिकपणा आणि कष्टावरच घराचा डोलारा उभा होता. तिने आमच्या यशावर कौतुकाची फुले उधळली, तसेच अपयशात आधारही दिला. आईच्या अनंत आठवणी, मनाच्या कप्प्यात साठवल्यात. 

काही सुखद, उबदार, तर काही दुःखाची किनार लाभलेल्या. आयुष्याच्या उतरणीवर साफल्याच्या समाधानाने भरलेले तिचे तृप्त मन मला पाहायचे होते. पण, तसे झाले नाही. संसाराच्या रहाटगाडग्यात आईने स्वतःच्या आवडीनिवडी कधी जोपासल्या नाहीत. त्यामुळेच, तिच्या इच्छा-आकांक्षा मला पूर्ण करायच्या होत्या. तिला सहलींना न्यायचे होते, खूप फिरवायचे होते. तिचे आवडते कार्यक्रम, नाटक, चित्रपट दाखवायचे होते. हॉटेल, मॉलमध्येही हिंडवायचे होते. तिच्यासाठी खूप खरेदीही करायची होती. पण, व्यग्र जीवनशैली, दैनंदिन व्याप, अडीअडचणी यामुळे तिच्यासाठी करायच्या या गोष्टी राहून गेल्या. 

तिला आमचा सहवास हवा होता. आम्ही तिच्यासाठी वेळ काढायला पाहिजे होता. आयुष्यातले काही क्षण तिच्यासाठी राखून ठेवायला पाहिजे होते. तिची व्यथा, वेदना, दुःख मी जाणायला हवे होते. मी आणि भाऊ "मदर्स डे'ला तिच्यासाठी भेटवस्तू आणायचो; पण या महागड्या भेटवस्तूपेक्षा तिच्याजवळ बसून प्रेमाच्या चार गोष्टी आम्ही बोललो असतो, तर हीच तिच्यासाठी अनमोल भेट ठरली असती, असे आता जाणवते.

आईचे असणे आमच्यासाठी सर्व काही होते. ते आमच्या आयुष्यातील आनंदपर्वच होते. खरे तर, आईचे ऋण कधीही न फिटणारे. म्हणूनच ती जिवंत असेपर्यंत तिला मान द्यावा, प्रेम द्यावे, तिची काळजी घ्यावी. तिच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहावे, यासारखे दुसरे सुख नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Muktapeeth Article