शिष्य माझे गुरू  -

धनश्री अजित जोशी
Monday, 14 January 2019

केवळ शिक्षकच शिकवतो असे नाही, तर विद्यार्थ्यांकडूनही शिकत जातो. हे शिकणे समजून घेऊन झाले तर त्याचा आनंद आणखी वाढतो.

आजोबा शिक्षक, आई अन्‌ मोठी बहीण शिक्षिका. त्यामुळे शिक्षिकच होण्याची लहानपणापासूनची इच्छा. मी माझे शिकवणे आनंदाने अनुभवले. शिकवण्याबरोबरच खूप शिकत गेले. माझ्यासमोर बसलेले शिष्यगणच माझे गुरू होते. ""बाई, चिल, सगळे छान होणार आहे. नका काळजी करू. आपला नंबर नक्की येणार,'' असा धीर देऊन "चिल' राहण्याचा सल्ला मिळायचा. हे "चिल' राहणे मी त्यांच्याकडून शिकले.

एरवी एकही शब्द न बोलणाऱ्या विद्यार्थिनीने एकदा तोंडी परीक्षेच्या वेळी उत्तर देताना, "मी आईला नियमित मदत करते, अगदी पोळ्यांपासून सगळा स्वयंपाक करते,' असे म्हणून मला गुलाबजाम कसे करायचे, म्हणजे ते बिघडत नाहीत, हे आत्मविश्‍वासाने सांगितले. पुन्हा दुसऱ्या दिवशी, ""केले का गुलाबजाम?'' असे विचारले. तेव्हा मी, ""नाही गं'' असे सांगताना गृहपाठ न केलेली मी जणू तिची विद्यार्थिनीच होते. मला पाण्याची प्रचंड भीती वाटत असे. पण, ""बाई, काही होत नाही. आम्ही आहोत ना, या पाण्यात'' असे म्हणून मला हाताला धरून काळजीपूर्वक पाण्यात नेऊन माझी भीती घालवणाऱ्या माझ्या "गुरूं'मुळेच मी आज वॉटरपार्क एन्जॉय करू शकते. 

मोबाईल, ओ.एच.पी., संगणक यांचा वापर, गुगलवरून नाटकाचे संगीत शोधणे, हे मी त्यांच्याकडूनच शिकले. मेलवरून संपर्क साधून आम्ही आयुकात, सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना भेटायला गेलो होतो. त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांच्या धड्यातील शंकांचे त्यांच्याकडून करून घेतलेले निरसन, अच्युत गोडबोले यांच्याशी संपर्क साधून त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या शाळेत येऊन दहावीच्या विद्यार्थिनींशी साधलेला संवाद, अशा एक ना अनेक आठवणी.

"बाई एरवी कधी रागवत नाहीत, आज त्या रागवल्या आहेत. त्यांच्या घरी काहीतरी बिनसले असेल,' असा विचार करून मला समजून घेणाऱ्या विद्यार्थिनी मला माझ्या गुरू वाटतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Muktapeeth Article