साखर खाल्लेला माणूस

निशा करंदीकर
गुरुवार, 31 जानेवारी 2019

साखर खाल्लेला माणूस दिसला की त्याला उपदेश करण्याची सवय काहींना असते. त्यांच्याविरुद्ध ठरावच करायला हवेत. 

मधुमेहाच्या रुग्णांना कायम उपेक्षा व टिकाच सहन करावी लागते. गेली वीस वर्षे या मधुमेहापायी मी इतके उपदेश आणि सल्ले ऐकले आहेत की वाटते, आपण मधुमेहींची एक संघटना करून काही ठराव करावेतच. पहिला ठराव, ज्यांना मधुमेह नाही त्यांनी आम्हाला अजिबात उपदेशाचे डोस पाजू नयेत किंवा फुकटचाही सल्ला देऊ नये. उदा. एक शेजारणीबाई म्हणाली, "नाहीतरी तुमच्यात ना सगळ्याच भाज्यांमध्ये गूळ, साखर घालतात, म्हणून तुम्हा लोकांना हा त्रास जरा जास्तच आहे.' दुसरा म्हणाला, "आमच्या गावाकडे एक अमुक अमुक वैद्य आहेत त्यांचे औषध घ्या, वर्षभरात खडखडीत बऱ्या व्हाल.' "रोज सकाळी कारल्याचा रस पीत जा,' तिसरीचा सल्ला.

"संत डायबेटिस' जात, धर्म, स्त्री-पुरुष भेदाभेद मानत नाहीत. मात्र मधुमेहाचा सत्संग लाभला, की साखरवाले आणि बिनसाखरवाले असा भेदाभेद सुरू होतो. म्हणून दुसरा ठराव, नातेवाइकांनी आमच्याबद्दल कार्याप्रसंगी सहृदयता बाळगावी. लग्न-समारंभ प्रसंगी आम्ही ताटात काय वाढून घेतो यावर बारीक लक्ष ठेवू नये. उलटपक्षी, जेवणास उशीर झाला तर तुझी "शुगर डाउन' होईल असे कधीतरी म्हणावे. साधा सर्दी, खोकला झाला तरी शुगर कधी चेक केली, असे मर्मभेदक प्रश्‍न विचारू नयेत. माझी एक मैत्रीण सतत ऍसिडिटीचे रडगाणे गाते, तरीही खमंग चमचमीत, स्ट्रीट फूड खात असते. पण आजपर्यंत तिला एकदाही कोणी उपदेश केलेला ऐकला नाही. 

मी अत्यंत नशिबवान आहे. कारण आजपर्यंत माझ्या राहत्या घराच्या आजुबाजूला सरकारी क्वाटर्समुळे मोठमोठे ग्राउंड, छान बाग, चालण्यासाठी ट्रॅक असल्यामुळे मी वीस वर्षे "एकला चलो रे' करत आहे. वर्षानुवर्षे मधुमेही जीवनशैलीमुळे इतका आत्मसंयम आला आहे, की सणासुदीला, घरच्यांच्या वाढदिवसाला भरपूर गोडधोड करते आणि सर्वांना पोटभर वाढते. "इदं न मम' म्हणतच मी अलिप्त राहते. मात्र माझ्या दोन्ही मुली मला घरात "मधुमक्षी', "बेबीशुगर' अशा गोड नावाने हाक मारतात, तेव्हा सुखद वाटते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Muktapeeth Article