आठवणीतले आवाज!

मोहन दिनकर गोखले 
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

आताही फेरीवाले अधूनमधून येतात म्हणा! पण पूर्वीच्या काळी हे फिरस्ते खास आरोळ्या देत आपण आल्याची वर्दी द्यायचे. 

त्या काळी पुण्याच्या पेठा खास होत्या. त्यांना एक रुपडे होते. नारायण पेठेत आम्ही राहत असू. त्या काळी रस्त्यावरून येणारे काही आवाज आजही मनात रुंजी घालतात. "कुणाच्या दारी... कुणाच्या मुखी हुबा ऱ्हा रे पांडुरंगा' असे म्हणत रात्री भिकारी यायचा. आवाजात कारुण्य असे, भक्ती असे. रात्रीच्या शांत समयी त्या आवाजातील कातरता काळोख भेदून पोचत असे.

"कोप-बशी भरणी'.... असा पुकारा करत बोहारीण यायची. जुने-जीर्ण कपडे घेऊन त्या बदल्यात कप-बशी, काचेची बरणी यांची देवाणघेवाण चालायची. "बार्टर सिस्टीम'च म्हणा की! या बोहारणीला नेहमीच कपडा फाटकाच दिसायचा. "वयनी यातनं तर शनवारवाडा दिसतोय की. जरा धडकं बगा ना,' असा शेरा तिच्याकडून यायचा. मग आईचे आणि तिचे संवाद सुरू व्हायचे. "नवीन कपडे कोण देणार आहे, माझा सौदा काही जमू देत नाही' वगैरे. 

"घोलवडचे चिऽऽकू .... साखरेच्या पाकासारखे गोड चिकू खाऽऽ.... चाऽऽर आण्यात दोन चिकू खा' म्हणत चिकूवाला यायचा. त्याचे प्रचलित राजकारणाबाबतचे शेरे-ताशेरे ऐकण्याजोगे असत. तो वृत्तपत्र वाचन करायचा. त्यामुळे त्यावर सुद्धा त्याचे भाष्य व्हायचेच. चिकूप्रमाणे हे भाष्यसुद्धा ऐकायला (कळले नाही तरी.... आताही काही फारसे कळत असे नाही) गोड वाटायचे! "वाटाणा... हरभरा... चवळी.... मूग.... मटकी मोडाचीऽय' असे अनुनासिक खणखणीत उच्चार....

त्याच्याकडून मटकी घेण्याऐवजी त्याची ती पुकारच ऐकत राहायची उत्सुकता असायची. त्या वेळचे भाजीवाले सुद्धा नेहमीचे. त्यांना गिऱ्हाइकांची आडनावे, कुठल्या वाड्यात राहतात ते पक्के माहीत असायचे. ते आडनावाचा पुकारा बरोबर त्या त्या वाड्यासमोर करायचे. पूर्वी ग्रहण सुटल्याबरोबर..."देऽ दान, सुऽटे गिराण' अशा आरोळ्या ऐकू यायच्या.

तेव्हा आम्ही लहान मुले जोंधळा-बाजरी त्यांना मापाने घालत असू. ग्रहण सुटल्याचे त्यांच्या आरोळीवरूनच कळायचे. त्या आधी घरातील फुटक्‍या काचेचे तुकडे धुराने काळे करून त्यातून सूर्यग्रहण पाहिल्याचे आजही स्मरते! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Muktapeeth Article