किनारा तुला... (मुक्तपीठ)

नीला कदम 
सोमवार, 8 एप्रिल 2019

पाणी तुम्हाला खुणावत असते, बोलावत असते; मग ते धबधब्याचे असो की समुद्राचे! पाय सहजतः वळतात पाण्यापास.

निसर्गाची विविध रूपे पाहणे, मनसोक्त चविष्ट, आरोग्यपूर्ण खाणे आणि देखण्या, नेटक्‍या परिसरात राहणे हा एकत्रित अनुभव "कोस्टल कर्नाटक'च्या पर्यटनात आला. शिरशीजवळ असणाऱ्या रिसॉर्टमध्ये राहिलो. पुण्याहून हुबळी आणि पुढे दोन तासांचा प्रवास होता हा. मजेत झालेला. पोचलो मुक्कामी आणि खूष झालो. भवतालात गर्द हिरवाई, पक्ष्यांचे मधुर कुजन आणि टुमदार, टापटीप निवास असणाऱ्या रिसॉर्टमध्ये विसावल्यावर सारा शिणभार दूर झाला. तिथे मुक्काम आणि तिथून रोज एकेका वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणाला भेट.

मधुकेश्‍वर, दक्षिण काशी, जोग फॉल्स, उंचेली फॉल्स आणि येथील काळाकभिन्न कोळसा भासावे असे उंचच उंच भस्माचे डोंगर. भस्मासुराच्या पौराणिक कथेशी निगडित असणाऱ्या या ठिकाणी आहे भैरवनाथाचे जागृत देवस्थान. स्वयंभू पिंडीवर होणारा अव्याहत जलधारेचा अभिषेक. प्रदक्षिणा घालायची तर पूर्ण डोंगरालाच प्रदक्षिणा घालावी लागते. आठवले, गणपती पुळ्याला आपण घालतोच की त्या डोंगररूपी स्वयंभू गणपतीला प्रदक्षिणा. सारा परिसर हिरव्याकंच वनराजीने समृद्ध. 
जोग फॉल्स म्हणजे गिरसप्पाचा धबधबा किंवा उंचेलीचा धबधबा पाहताना "धबाबा आदळे तोय' असे म्हणावे अशा पांढऱ्या शुभ्र जलधारा नजर दुसरीकडे वळवू देत नाहीत.

शून्य प्रदूषण असलेला निसर्गाचा निखळ देखणा आविष्कार आहे तिथे. गोकर्ण महाबळेश्‍वर, मुरुडेश्‍वराचे दर्शन तर पावित्र्याने वेढलेले. समुद्रकाठी असणारे सुवर्णमयी मंदिर, शिवाची विशालकाय मूर्ती आणि अठरा मजली गोपूर सारेच भुरळ घालणारे. तिथलें वास्तव्य आपल्या आत्मशक्तीचा परिचय करून देणारे. परमेश्‍वराशी जवळीक साधणारे. सोमेश्‍वर बीच... वेगवेगळ्या रंगांचे, आकारांचे शिंपले, रंगीबेरंगी दगड काय वेचावे, नजरेने काय टिपावे अन्‌ पायांनी कुठे जावे... मन संभ्रमीत होते.

अलगदपणे लाटांवर पहुडावे. पश्‍चिमेकडे कलणारा सूर्य अचानकपणे क्षितिजाला भिडतो. सोनेरी आकाश अन्‌ सुवर्णमयी लाटा. पाण्यात जणू विरघळून लुप्त होणारा तो तेजोगोल. अनेक सूर्यास्त अनुभवले, पण सूर्यास्ताचे इतकें मनभावन रूप अनुभवायचे तर सोमेश्‍वर बीचला जायलाच हवे. 

Web Title: Pune Edition Muktapeeth Article