काळ आला होता, पण...(मुक्तपीठ)

रमेश पारसनीस
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

टॉन्सिलची शस्त्रक्रिया ही अगदीच बिनगुंतागुंतीची, साधी असते. पण मला त्याचा त्रास झाला. जिवावरच बेतले होते.

माझे वडील वैद्यकीय सेवेतून निवृत्त झाले होते. त्या काळी मला टॉन्सिलचा त्रास व्हायचा. कोल्हापूरच्या सरकारी दवाखान्यातील घसातज्ज्ञांशी प्राथमिक चर्चा करून टॉन्सिल काढण्याची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. ही शस्त्रक्रिया विनागुंतागुंतीची नियमितपणे होणारी साधी सोपी आहे. डॉ. एस. व्ही. गोगटे यांनी शस्त्रक्रिया केल्यानंतर मला एका वॉर्डात दाखल केले. माझे बाबा स्वतःच डॉक्‍टर असल्याने डॉ. गोगटेंच्या संमतीनेच त्याच दिवशी संध्याकाळी मला घरी सोडले.

मला साधारणपणे रात्री आठ वाजता झोप आली. परंतु रात्री अंदाजे एक वाजण्याच्या सुमारास मला एकदम अस्वस्थ वाटले. मी अचानक झोपेतून उभाच राहिलो व आईला हाक मारली. हे ऐकून माझ्या दोन्ही मोठ्या बहिणी जाग्या झाल्या व त्यांनी पटकन दिवा लावला. पण बाबा यायच्या वेळी मला एकदम मोठी रक्ताचीच उलटी झाली, सबंध गादी रक्तानेच माखली होती. सर्वजणच घाबरले. तेवढ्यात माझ्या बाबा परिस्थिती ओळखून एवढ्या रात्री एकटेच चालत डॉ. गोगटे यांच्याकडे गेले व घडलेले सर्व सांगितले. डॉ. गोगटें यानी मला परत दवाखान्यात आणायला सांगितले. 

बाबा आले व मला परत दवाखान्यात नेण्यासाठी तयारीला लागले, पण रात्रीच्या वेळी कोणतेच वाहन उपलब्ध नव्हते. माझ्या दोन्ही बहिणींनी आमचे शेजारी हरिश्‍चंद्र पुरंदरे यांना उठवले. त्यांच्याकडे गाडी होती. परंतु दुर्दैवाने त्यांची गाडी चालवणारेच परगावी गेले होते. मग आमच्या समोर राहणाऱ्या भाऊराव भिंगार्डे यांना उठवावे लागले. पण प्रसंग ओळखून त्यांनी लगेचच गाडी चालवायला होकार दिला व पहाटे अडीच वाजता मला परत सरकारी दवाखान्यात नेण्यात आले.

पुन्हा शस्त्रक्रिया करून सरकारी दवाखान्यात सहा दिवस राहूनच घरी आलो. या प्रसंगात माझ्या सर्व कुटुंबाला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे आभार आमच्या कुटुंबांने मानले होतेच. जणू तो माझा पुनर्जन्मच होता. पुढेही कित्येकदा या प्रसंगाची चर्चा होत राहिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Muktapeeth Article