प्रेताचा अंगठा (मुक्तपीठ)

विजय कुलकर्णी 
सोमवार, 6 मे 2019

कधी कधी वेळच अशी येते की, कायदेशीर करावे की हितकारक करावे हा प्रश्‍न उभा राहतो. त्या क्षणी निर्णय घ्यायचा असतो. 

चाळीस वर्षांपूर्वी मी आदिवासी भागात बॅंकेत होतो. त्या डोंगराळ भागात शेतीचे क्षेत्र तुटपुंजे असल्याने व घरटी एक तरी मुंबईला नोकरी-धंद्यानिमित्त असे. गावी स्त्रिया, लहान मुले, म्हातारी माणसे व असलाच तर कुटुंबातील एखादा तरुण शेती पाहात असे. शाखेत निवृत्तिवेतनधारक खातेदारांचे प्रमाण जास्त होते.

एक खातेदार नेहमी सांगत, ""घरी लोक पेन्शनच्या दिवशी गोड बोलतात. एकदा पेन्शनची रक्कम त्यांच्या ताब्यात दिली, की महिनाभर विचारत नाहीत. खायलासुद्धा देत नाहीत.'' एकदा शेती करणारा त्यांचा मुलगा आला होता. तो सांगत होता, ""साहेब, वडील पेन्शनची रक्कम दारू पिण्यासाठीच खर्च करतात. घरी पैसे देतच नाहीत.'' कोण खरे, कोण खोटे, कळत नव्हते. एके दिवशी मुलगा आला व म्हणाला, ""साहेब, वडील खूप आजारी आहेत, त्यांना बैलगाडीत घालून आणले आहे. त्यांच्या खात्यातील पैसे काढावयाचे आहेत. त्यांना दवाखान्यात दाखविण्यासाठी पैसे हवे आहेत.'' 

मी एक पैसे काढण्याचा फॉर्म, स्टॅंपपॅड घेऊन बैलगाडीकडे गेलो. बैलगाडी सावलीसाठी शाकारलेली होती. आत अंथरुणावर बाबा पांघरूण घेऊन पहुडलेले दिसले. मी आत वाकून म्हणालो, ""बाबा उठा, किती पैसे काढायचे आहेत? मुलाजवळ पैसे देऊ का?'' परंतु, बाबांची काहीच हालचाल नव्हती. मी बाबांचा हात हातात घेतला. थंडगार पडला होता. मला शंका आली. मुलाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, ""साहेब, इकडे आणतानाच त्यांचे प्राण गेले. त्यांच्या मौतीलाही पैसे नाहीत.'' खात्यातील शिल्लक फार नव्हती.

ती रक्कम मिळविण्यासाठी त्या मुलाला बॅंकेच्या बऱ्याच कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागल्या असत्या, त्यासाठी बराच कालावधीही गेला असता. परिस्थितीचा विचार करून आताच पैसे मुलाला देऊन टाकावयाचे ठरविले. बाबांच्या प्रेताचा थंडगार पडलेला अंगठा हातात घेतला व स्टॅंपपॅडमध्ये रंगवून पैसे काढण्याच्या फॉर्मवर उमटविला.

बॅंकेत जाऊन पैसे काढण्याच्या फॉर्मच्या मागे मुलाची सही घेऊन त्याला रक्कम अदा केली. अजूनही ही घटना आठवली की त्या प्रेताच्या अंगठ्याचा थंडगार स्पर्श हाताला जाणवतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Muktapeeth Article