मुक्तपीठ : शब्द जादूगार

सुषमा जौंजाळ 
बुधवार, 22 मे 2019

- शब्द जोजवतात भावनांना. शब्द सुखावतात अन्‌ दुखावतातही. ते जादूगार असतात. 

रखरखीत दुपार. निवडणुकीच्या कामाचे प्रशिक्षण होते. मूड थोडा वैतागलेलाच होता. प्रशिक्षण देणारी व्यक्ती उत्साहमूर्ती होती. "इलेक्‍शनला जाताना पिकनिकला जातोय असे समजायचे, तुम्हाला काहीच त्रास वाटणार नाही, उलट एन्जॉय कराल एक वेगळा दिवस,' या त्यांच्या शब्दांनी सर्वांचा मूड बदलला. वैताग गेला आणि आम्ही उत्साहाने माहिती घेऊ लागलो.

खरेच, शब्द हे जादूगार पटले बुवा. माझ्या मुलाला, सुजितला त्याच्या बाईंचा परीक्षेच्या आधी एक संदेश आला, Do well and fly with colourful colors. या शब्दांनी जादू केली आणि मुलाची मेहनत, सकारात्मक ऊर्जा वाढली. "तुझे डोळे किती बोलके आहेत, किती गोड हसतेस, तुझ्याशी पुन्हा लग्न करावे असे वाटते,' असे नवऱ्याने कौतुक केले की मन विशीतल्या तरुणीसारखे लाजते, मोहरते. शब्द समोरच्या व्यक्तीपर्यंत आपल्या भावना पोचवतात. शब्द सुखावतात, तसे कधी कधी दुखावतातही आणि मग त्यांची आठवण बनते.

काहींचे कडू शब्द मनाला लागतात. मनातल्या एका कोपऱ्यात घर करून राहतात. पण कुणीतरी म्हटलेय ना, वाईट आठवणींची चटणी करून लगेच संपवा आणि चांगल्या आठवणींचे लोणचे घाला आणि चवीने आयुष्य जगा. संगीत, त्यातील शब्द हे असेच जादू करतात. आपल्याला एका वेगळ्या जगात घेऊन जातात. नुकतेच आदेश बांदेकर "झिंग झिंग झिंगाट' या कार्यक्रमात म्हणाले, "संगीत हा एक ऋतू आहे, तो आपल्याला वेगवेगळ्या वयाचा अनुभव देतो.'

खरेच, "नाच रे मोरा' गाणे ऐकून मन लहानपणीच्या आठवणीत जाते तर "आता उठवू सारे रान...' ऐकले की मनात जोश निर्माण होतो. एखाद्या संकटाच्या क्षणी, जिंदगी हर कदम इक नयी जंग है, जीत जायेंगे हम, तू अगर संग है.... हे गाणे ऐकले की, संकटावर मात करण्याची ऊर्मी जागी होते, जिंकण्याचा आत्मविश्‍वास जागा होतो. शब्द कधी गोड असतात, कधी कडू असतात, कधी शब्दांना धार असते, तर कधी मोरपिसावरील मखमल असते. पण कसेही असले तरी ते जादूगार असतात, हे मात्र नक्की! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Muktapeeth Article