मुक्तपीठ : कालाय तस्मै नमः

विनिता चिटणीस
सोमवार, 10 जून 2019

माणसाच्या सुखाच्या स्मृती काळ दरवळून सोडतो अन्‌ तोच काळ दुःखावर हळूच फुंकर घालण्याचेही काम करतो. 

कोणार्कचे सूर्यमंदिर पाहिले आणि मनात आले निसर्गाचे कालचक्र असेच आहे. दिवसामागून रात्र व रात्रीमागून दिवस हे चक्र असेच चालू आहे. ऋतू आपले कार्य करतच आहे. बालपण, तारुण्य व म्हातारपण हे नैसर्गिकरीत्या येतच राहणार. शालेय जीवनात शिकलेले गणितातील काळ, काम, वेग हे चक्रसुद्धा आपण सोडवत असतो. वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ हेसुद्धा सर्वांच्या जीवनाचा एक भाग होऊन बसलेले आहेत. "कालाय तस्मै नमः' ही म्हणसुद्धा यातूनच आलेली असावी.

"घडीने घडी काळ आयुष्य नेतो', असे समर्थ रामदासांनी म्हटले आहे. काळ कोणासाठी थांबत नाही, की कोणी त्याला थांबवू शकत नाही. म्हणून मिळालेल्या आयुष्याचा काळ हा चांगल्या कामासाठी सार्थकी लावावा हेच खरे. काळ हा वेगाने सरकत असतो. भूतकाळात घडलेल्या गोष्टी माणूस वर्तमानकाळत आठवू लागला तर त्याचा चालू काळसुद्धा हातून निघून जाईल. त्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळाचे नियोजन करणे अवघड होऊन जाईल. याचाच अर्थ काळाला ठराविक मर्यादा असतात. 
महाभारतात श्रीकृष्णाने सूर्याला थोपवून "हा सूर्य, हा जयद्रथ', असे म्हणत युद्ध चालू ठेवण्याचे अर्जुनाला आवाहन केले, हे आपल्याला माहीत आहे.

सत्पुरुष अखंडपणे कालचक्र आपल्या हातात ठेवत असतात. काही प्रसंगी आपण म्हणून जातो की "काळ आला होता, पण वेळ आली नव्हती'. म्हणजेच एखादी विचित्र घटना घडणार, असे दिसत असूनसुद्धा माणूस त्यातून त्या वेळेपुरता सही सलामत बाहेर येतो. काळ हे तान्हे मूल बनून येतो. खट्याळ खोडकर मूल, सळसळते तारुण्य, प्रौढ समंजस नागरिक, वार्धक्‍य अशा रूपात काळ भेटतो.

पृथ्वी व सजीव यांच्या उत्पत्तीपासून सर्व सृष्टीवर राज्य करणारा काळ हा अनभिषिक्त सम्राट आहे. आपण काळाच्या प्रवाहाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे निसर्गक्रमाकडे दुर्लक्ष केल्यासारखे होईल. मग "विनाशकाले विपरित बुद्धी' असे म्हणत या विनाशकालातून बाहेर पडण्याचे यत्न करावे लागतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Muktapeeth Article