मुक्तपीठ : नाही म्हणायला शिका!

डॉ. ज्योती गोडबोले 
सोमवार, 17 जून 2019

निमूट व योग्य तऱ्हेने काम करणाऱ्यावर आणखी कामे थोपली जातात. म्हणून मदत करा; पण स्वतःला गृहीत धरू देऊ नका. 

चार भावंडांतील वर्षा अतिशय भिडस्त! कोणीही उठावे आणि तिला कोणतेही काम सांगावे. बिचारी निमूटपणे ते करून टाकी. हळूहळू सगळीच कामे तिच्या अंगावर पडू लागली. त्यापायी तिचा स्वतःचा अभ्यास मागे पडे, क्‍लासही बुडे. हे लक्षात येऊनसुद्धा भिडस्तपणामुळे ती हे गृहीत धरणे टाळू शकत नाही. पूजाला स्वयंपाकाची मनापासून आवड आहे. नवीन नवीन पदार्थ ती 

उत्तम करते. सकाळीच बहिणीचा फोन आला, ""अगं पूजा, आज माझी भिशी आहे. तुझे साबुदाणे वडे मस्त होतात, प्लीज दे ना करून दुपारपर्यंत! हे येऊन घेऊन जातील. आम्ही आठ जणी आहोत बरं का!'' पूजा आज खरेतर नवऱ्याबरोबर बाहेर जाणार होती. बाहेरच जेवण, शॉपिंग असा बेत ठरला होता. ती भिडस्तपणे बहिणीला "नाही' म्हणून शकली नाही. बसली वडे तळत! नवरा संतापून तणतणत निघून गेला. कावेरी चटपटीत, कामसूही! हुशार जावांच्या लक्षात आले, की बाई अगदी भिडस्त आहेत. करतात मुकाट सगळे! झाले. जावांची मुले सांभाळण्यापासून चित्रपटाची तिकिटे काढण्यापर्यंत सर्व कामे करतच राहिली; निमूट! 

मंडळी, ही उदाहरणे असे सांगतात, की मदत जरूर करा; पण लोकांना आपल्याला गृहीत धरू देऊ नका. त्याचा तुम्हाला आणि घरच्या लोकांनाही त्रासच होतो. स्पष्टपणे नाही म्हणायला शिका. काम करणाऱ्या माणसाला लोक नेहमीच गृहीत धरतात, त्याचा विचारच करत नाहीत. मदत जरूर करावी; पण स्वतःला कधीही गृहीत धरले जाऊ देऊ नये.

मग ती चोवीस तास घरी असणारी गृहिणी का असेना! "आई तू घरीच तर असतेस, प्लीज इस्त्री करून ठेव ना,' म्हणणाऱ्या लेकीला स्पष्ट नाही म्हणा. एखादेवेळी ठीक आहे हो; पण चांगुलपणा मिळवायच्या नादात, तुम्ही स्वतःची अस्मिता गमावताय. मंडळी, वेळेवर नाही म्हणायला शिका. डेल कार्नेजीसाहेब सांगूनच गेलेत ना, "लर्न टू से नो, व्हेन यू वॉन्ट टू.' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Muktapeeth Article

टॅग्स