मातीचे शहर (मुक्तपीठ)

विनिता चिटणीस 
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

प्रवासाची आवड असेल, तर ठरवून हटके रस्ते धुंडाळायचे. खूप वेगळे पाहण्याचा प्रवासयोग घडतो. 

कॅलिफोर्नियामधील सॅनटा मोनिका ते शिकागो हा पहिला हायवे (रुट 66) सुमारे चार हजार मैलांचा व अनेक राज्यांतून जाणारा आहे. या हमरस्त्यावरचे एक शहर अल्बकर्की येथे इंग्लिशमधील अनेक गाणी चित्रित झालेली आहेत. किंगस्‌मॅन शहरात जुनी शंभर वर्षांपूर्वीची घरे, हॉटेल्स, सायकलची दुकाने, तसेच त्या काळातील पेट्रोलपंप अजूनही जसेच्या तसे उत्तम कार्यरत ठेवलेले आहेत. अल्बकर्की शहराची पायी सहल सकाळी करता येते. तेथील बांधकाम सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या इटालियन आर्किटेक्‍टचे आहे. उत्तम रस्ते व नियोजन मध्यवर्ती भागात पाहावयास मिळते. जुन्या अल्बकर्कीमधील सुमारे ऐंशी वर्षांपूर्वींची घरे, मॅक्‍सिकन पद्धतीचे राहणीमान व संस्कृती यासाठी ते प्रसिद्ध आहे.

दीडशे वर्षांपूर्वीचे जुने चर्च येथे पाहावयास मिळाले. जागोजागी जुने संगीत वाजवले जात होते. तेथून जवळच असलेले "सिबोला' नॅशनल पार्क पाहावयास गेलो. समुद्रसपाटीपासून सुमारे दहा हजार फुटांवर असलेले हे उद्यान अप्रतिम आहे. एवढ्या उंचीवर माउंटन ट्रामची सोय आहे. येथे वर चढण्यासाठी केलेला डांबरी रस्ता हासुद्धा रस्तेबांधणीचा उत्तम नमुना ठरू शकतो. निसर्ग व नैसर्गिक गोष्टी जपण्यासाठी येथे केलेली धडपड खरोखर पाहण्यासारखी आहे. खडकांचे रस्ते, सुळके, तुटलेले डोंगर या गोष्टी कॅमेऱ्यामध्ये साठवणे हे आपोआपच होते. 

येथूनच पुढे "सॅंटा फे' व "टॅओज' ही दोन्ही शहरे टुमदार आहेत. टॅओज येथे जुनी परंपरा व राहणीमान जपलेले गाव व तेथील "नेटिव्ह इंडियन' पाहायला मिळाले. येथे जवळच "रीओगोद्रे' नावाची नदी वाहते. सुमारे तीनशे फूट खोल अशी नदी ग्रॅंड कॅनियनची आठवण करून देते. पुढे सौरऊर्जेचा वापर करणारी घरे आणि त्यातील सुविधा नजरेस पडतात. वाळवंटातही आपण काहीतरी करू शकतो या गोष्टीची प्रचिती येते. न्यू मेक्‍सिकोची राजधानी असलेले "सॅंटा फे' हे "मातीचे शहर' म्हणून जगामध्ये प्रसिद्ध आहे. जरा हटके पाहण्याचा हा प्रवासयोग घडला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Muktapith Article