आशा आणि किरण 

माधुरी शेजवळ
शुक्रवार, 27 जुलै 2018

माणसाने नेहमी आशावादी असले पाहिजे, पण आशावादाला प्रयत्नांचीही जोड हवी. 

एम. एड. होण्याची इच्छा अधूनमधून खुणावत असे. मुलांच्या जन्मानंतर मी एम. एड.चा अर्ज भरला. एम. एड.चे वर्ग सुटीच्या दिवशी असल्याने मुलीला घेऊन जात असे. वर्षाच्या शेवटी परीक्षेचे वेळी सुट्या असल्याने परीक्षेसाठी छान अभ्यास झाला. परंतु परीक्षा सुरू असतानाच मामेसासरे गेले. त्यामुळे घरात सतत पाहुणे. दोन पेपरांच्या अगोदर अभ्यासासाठी वेळ मिळाला नाही; परिणामी, माझा एम. एड.चा स्टॅथॅस्टिक्‍स हा विषय राहिला.

दुसऱ्या वर्षी दिवसभर काम आणि रात्रीचा अभ्यास जागून केल्याने परीक्षेच्या वेळी फॉर्म्युले आठवले नाहीत. तिसऱ्या वर्षी नेमका परीक्षेच्या वेळीच मुलीला ताप होता. त्यामुळे मी दोन-तीन दिवस जागीच होते. आता मी एम. एड. होण्याची आशा सोडून दिली होती. परंतु माझ्या मैत्रिणीने, आशाने, आशेचा किरण जागवला. ती म्हणाली, ""शोभा, तू प्रयत्न करीत राहा. यश मिळेलच.'' 

मी पुन्हा सकारात्मक विचार केला. आशाचे ऐकून आता मी निश्‍चय केला होता. विषय सोडवायचाच. मी दोन दिवस अभ्यासासाठी सुटी काढली. मुलांना पेपरच्या दिवशी व आदल्या दिवशी जेवणाचे डबे लावले. अभ्यास चांगला केला. पेपर पण छान लिहिला. पण पंधरा गुणांचा प्रश्‍न बाकी राहिलाच. म्हणजे 85 गुणांपैकीच पेपर लिहिला. वाटले, पुन्हा विषय राहिला. पण जेव्हा मला निकाल कळला तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

मला पन्नास गुण मिळाले होते. मी स्टॅथॅस्टिक्‍समध्ये उत्तीर्ण झाले होते. मी एम. एड. पूर्ण केले होते. सर्वांत पहिला फोन मी माझी मैत्रीण आशा हिला केला. तिलासुद्धा कोण आनंद झाला होता ! ती म्हणाली, ""बघ शोभा, तुझ्या कष्टाचे चीज झाले.'' मला वाटले, हे जे मला यश मिळाले यात आशाचा नक्कीच मोठा वाटा आहे. तिच्यामुळेच तर मी हरवलेली जिद्द मिळवू शकले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Muktpeeth Hopes and Ray