रहाटावरचा अविचार 

प्रमोद रंगराव देशमुख
शनिवार, 28 जुलै 2018

परिणामांचा विचार न करता एखादी कृती केली, की फजिती होतेच, पण ते जिवावरही बेतू शकते. 

शेणाने सारवलेल्या अंगणाचा मंद सुगंध सकाळीच वाड्यावर पसरायचा. रात्री बैलाच्या गळ्यातील घुंगरांचा नाद ऐकतच झोपी जायचो. गड्याबरोबर काम करतानाच त्यांचे एक एक गावरान किस्से ऐकताना मनाला गुदगुल्या व्हायच्या. वाड्यातील आडावर रहाट चालवून रोज पाणी भरण्याचे काम टिल्लू गड्याचे होते. गडी दोन-चार वर्षांनी वयाने मोठा व दांडगट होता. मी त्याच्याबरोबर हौसेने रहाट ओढत असे. घागर भरण्याचे काम करीत असे. एकदा त्याने मला सांगितले, की आम्ही रहाटाचा दोर कमरेला बांधून आडात उतरतो व बुडालेली घागर वर काढतो. मलाही गंमत वाटली, मी म्हटले, आता सोडू का तुला? लगेच त्याने कमरेला दोर बांधला. 

सोडा म्हणाला. ""तुम्ही रहाट गच्च धरून ठेवा. मी आत जाताच हळूहळू सोडा.'' तो आत आडात उतरू लागला. त्याच्या वजनाने रहाटाची दोरी हळूहळू सुटू लागली. मी दोरीला गच्च धरून ठेवण्याचा प्रयत्न करू लागलो. पण, एवढा मोठा गडी मला कसा पेलवणार? जिवाच्या आकांताने मी रहाट उलटा फिरवत वर खेचण्याचा प्रयत्न करीत होतो. मला दरदरून घाम फुटला, मी वजनाने पुढे पुढे जाऊ लागो. पाय डळमळू लागले. माझ्या हातून रहाट सुटून टिल्लू धाड्‌द्‌÷िदशी आडात पडणार. त्याच वेळी मी उडून रहाटावर पडणार, नाहीतर वेडावाकडा आडात पडणार, असा बाका प्रसंग. 

इतक्‍यात शांता पाण्यासाठी आडावर आली होती. तिने माझी अवस्था पाहिली. काही कळण्याच्या आत मेहबण्णा म्हणून किंचाळली. सर्व मंडळी धावत आडावर आली. ते काय बोलत आहेत, करत आहेत, मला काहीच कळत नव्हते. सगळ्यांनी रहाट फिरवून टिल्लूला बाहेर काढले. मी मोकळा झालो, पण माझा श्‍वास कोंडला होता. हात जाग्यावर आहेत का नाही, कळत नव्हते. शरीराला कंप सुटलेला. थोड्या वेळाने मी भानावर आलो. सदरेवर जाऊन बसलो. कुणीच काही बोलत नव्हते. टिल्लू मात्र जसे काही घडलेच नाही, असे त्याचे काम करीत होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune edition muktpeeth Rahatavarcha Avichar

टॅग्स