जो दुसऱ्यांसी हसे...

अ. रा. जोशी
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

दुसऱ्याच्या अज्ञानाला हसणे सोपे असते; पण आपणही सर्वज्ञ नसतो याचे भान ठेवायला हवे.

दुसऱ्याच्या अज्ञानाला हसणे सोपे असते; पण आपणही सर्वज्ञ नसतो याचे भान ठेवायला हवे.

सत्तर वर्षांपूर्वीची गोष्ट. मी दिवाळीला मावशीच्या गावी वरसईला गेलो होतो. मुंबईला परतताना आमच्याबरोबर पंढरी हा बारा वर्षांचा मुलगा होता. त्याने गावी कधी विजेचे दिवे पाहिले नव्हते. विजेच्या दिव्यांचे त्याला अप्रूप वाटले. पहिल्याच दिवशी रात्री झोपायला जाताना त्याला आम्ही आतल्या खोलीतील दिवा मालवायला सांगितले. पाच मिनिटे झाली तरी दिवा मालवला गेला नाही म्हणून मी आत जाऊन पाहिले, तर पंढरी उंच स्टुलावर चढून बल्बवर फुंकर मारत होता. त्यानंतर अनेक दिवस त्याची मी थट्टा करीत असे. एकदा मामा रागावले. म्हणाले, 'एखाद्याची सतत थट्टा करणे, हा असंस्कृतपणा आहे. तू विजेच्या दिव्याच्या लहानपणापासून संपर्कात आहेस म्हणून तुला विजेचा दिवा लावायचे आणि घालवायचे ज्ञान आहे; पण म्हणून तू स्वतःला सर्वज्ञ समजू नकोस. तुझे एखाद्या गोष्टीविषयीचे अज्ञान कधीतरी उघड होईल.''
नंतर पंधरा वर्षे लोटली. मी मामींच्या गावी रत्नागिरीला गेलो होतो. मामींच्या आई रंगूताई आजारी पडल्या. मी त्यांच्यासाठी चार दिवस डॉक्‍टरांकडून औषध आणली. पाचव्या दिवशी आजी म्हणाल्या, 'आज औषध आणू नकोस; पण सात बाराचा उतारा घेऊन ये.'' मी डॉक्‍टरांकडे गेलो व त्यांना म्हटले, 'आज तुम्ही औषधे देऊ नका. त्याऐवजी उतारा द्या.'' डॉक्‍टर म्हणाले, 'कसला उतारा?'' मी म्हटले, 'सात बाराचा उतारा. आजीनेच सांगितलय.'' आता डॉक्‍टर हसले. म्हणाले, "सात बाराचा उतारा म्हणजे आपल्या जमिनीची माहिती देणारे कागदपत्र आणि ती डॉक्‍टरांकडे नाहीत, तर ती तलाठ्याकडे मिळतात.'' मामांनी काही वर्षांपूर्वी अज्ञानाविषयी दिलेल्या इशाऱ्याची मला आठवण झाली. आज माझे सात बाराच्या उताऱ्याविषयीचे अज्ञान उघड झाले होते. स्वतःला सुशिक्षित समजणारा व डॉक्‍टरांकडे सात बाराचा उतारा मागणारा मी बल्बवर फुंकर मारणाऱ्या अशिक्षित पंढरीला कधी काळी हसलो होतो, याची मला आज लाज वाटली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a r joshi write article in muktapeeth