आभाराचा भार

राहुल अप्पासाहेब कोरडे
शनिवार, 8 डिसेंबर 2018

परीक्षेला निघालो आणि बस चुकली. पुरेसे पैसे जवळ नव्हते; पण एका रिक्षावाल्या काकांनी मला परीक्षेला नेऊन वेळेत सोडले.

परीक्षेला निघालो आणि बस चुकली. पुरेसे पैसे जवळ नव्हते; पण एका रिक्षावाल्या काकांनी मला परीक्षेला नेऊन वेळेत सोडले.

मी द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगला होतो. माझा पेपर सकाळी दहा वाजता होता. त्या हिशेबाने मी माझ्या गोखलेनगरमधल्या "विद्यार्थी सहायक समिती' वसतिगृहातून विद्यापीठ बसथांब्यावर आलो. तेथून मला "बालेवाडी मनपा' अशी बस मिळायची; पण नेमकी त्याच दिवशी माझी बस दोन मिनिटांनी चुकली व दुसरी बसही येईना. पावणेदहा झाले होते. बस काही येत नाही म्हणून मी दिसेल त्या वाहनाला हात करत होतो व कॉलेजला सोडा, पेपर आहे दहाला असे म्हणत होतो. पण कोणीही तयार होईना. शेवटी एक रिक्षावाले काका आले, मी त्यांना माझी हकिकत सांगितली. पण माझ्याजवळ फक्त पन्नास रुपये होते. रिक्षावाल्या काकांना मी तेही सांगितले. ते काका म्हणाले, ""आधी रिक्षात बस. मी तुला पेपरला सोडतो.'' साधारण विद्यापीठ बसथांबा ते माझे कॉलेज यांतील अंतर लक्षात घेतले तर मीटरप्रमाणे रिक्षाचे भाडे दीडशे रुपयांहून अधिक झाले असते; पण काकांनी मला अगदी पन्नास रुपयांत माझ्या कॉलेजवर आणून सोडले, मला काही सुचतच नव्हते. मी हातातच ठेवलेले पैसे त्यांच्या हातावर ठेवले व परीक्षेसाठी पळतच गेलो. त्या घाईगडबडीत त्यांचे मी साधे आभारपण मानले नाहीत. म्हणजे त्या वेळी ते लक्षातही आले नाही. पेपर संपल्यावर त्याची जाणीव झाली. आजही कोणतीही परीक्षा असली तरी मला त्या काकांची आठवण येते व त्यांना मनात सतत धन्यवाद म्हणत असतो. पेपर झाल्यावर मित्राकडून पैसे घेऊन हॉस्टेलला परत आलो. त्या रिक्षावाल्या काकांचे त्या वेळी मी घाई-गडबडीत साधे आभारही मानले नाहीत, याचा भार अजूनही वाहतो आहे. या निमित्ताने मी त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rahul korde write article in muktapeeth