ऋणानुबंध

राजा मुद्‌गल
मंगळवार, 15 मे 2018

रक्ताचे नाते नसते, पण ओळखीतून बंध निर्माण होतात. हे बंध नातेसंबंधांतील नात्यांहूनही घट्ट असतात. एखाद्या अपरिचित ठिकाणी एकमेकांचा आधार होता होता तेच एकमेकांचे होऊन गेलेले असतात.

रक्ताचे नाते नसते, पण ओळखीतून बंध निर्माण होतात. हे बंध नातेसंबंधांतील नात्यांहूनही घट्ट असतात. एखाद्या अपरिचित ठिकाणी एकमेकांचा आधार होता होता तेच एकमेकांचे होऊन गेलेले असतात.

लग्नानंतर दीड वर्ष मी वज्रेश्‍वरी ते चर्चगेट असा प्रवास करीत नोकरी केली. दीड वर्षांनंतर अभयचा जन्म झाल्यावर मला घराची निकड भासू लागली. आम्ही वसईला राहावयास आलो. सुदैवाने आमचे दोन्ही शेजारी चांगले लाभले. ही दोन्ही कुटुंबे गुजराती होती. दिवाळीच्या सुटीमध्ये आम्ही सासुरवाडीला गेल्यावर समजले, की मावस मेहुणीची नणंद व यजमान हे दोघे डॉक्‍टर असून ते वसईला बदलून आले होते. आम्ही परत वसईला आल्यावर गावात खरेदीच्या निमित्ताने गेलो असता, समोरच दवाखाना दिसला. सहज चौकशी करावी म्हणून डॉक्‍टर कुलकर्णी यांच्या दवाखान्यात गेलो. डॉ. प्रभाकरराव समोरच बसले होते. त्यांना आमचा परिचय करून दिला. त्यांनी आत्यांना हाक मारली व आम्ही आलो हे सांगितले. नातेसंबंध सांगितल्यावर त्यांनाही खूपच आनंद झाला. त्यांनाही हे गाव नवीन असल्याने कोणी ओळखीचे भेटले म्हणून आनंद झाला. पहिल्याच दिवशी आम्ही त्यांच्याकडे जेवूनच घरी आलो.

त्यांना अर्चना नावाची मुलगी आहे. ती अभयच्या वयाचीच. त्यामुळे त्या दोघांची चांगलीच मैत्री झाली. अभयला तोवर बोलता येत नव्हते; पण डॉक्‍टरांची अर्चना घडाघडा बोलायची. ते पाहून आम्हाला अभयची काळजी वाटायला लागली. पण तिच्यामुळे अभय महिनाभरात चांगले बोलावयास शिकला. त्यानंतर आम्हा सर्वांची चांगलीच मैत्री झाली. आम्ही दर शनिवारी एकमेकांकडे जाऊ- येऊ लागलो. पण नंतर वाटावयास लागले, की त्यांना हे आवडत असले का? या शंकेने आम्ही महिनाभर त्यांच्याकडे जाणे बंद केले. शेवटी आमची वाट बघून ते दोघे पती-पत्नी दुपारच्या वेळेस आमच्या घरी आले आणि आम्ही का येत नाही? त्यांचे काही चुकले का? असे विचारू लागले. आम्हालाच लाज वाटली. आम्ही उगाचच गैरसमज करून घेतला असे वाटले. त्यानंतर मात्र आमची मैत्री वाढतच गेली. एवढेच नव्हे, तर मालूताईंच्या मावस मामेभावाशीही आमची मैत्री झाली. ती भावंडे वसईला आली की प्रथम आमच्याकडे यायची व मग वसईला जायची. आमचे घर वसई गाव व स्टेशन यामध्ये होते. मालूताईंचे व डॉ. प्रभाकररावांचे सर्व कुटुंबीय आमचेच होऊन गेले. डॉ. प्रभाकररावांमुळे आमच्या मोठमोठ्या लोकांशी ओळखी झाल्या. त्यांनी पहिली गाडी घेतली ती प्रथम आम्हाला दाखवावयास घेऊन आले. त्या गाडीतून आम्ही दर रविवारी दिवसभर फिरून यायचो. मुले मस्त खेळायची व आम्ही गप्पा करीत बसून राहायचो. त्यामुळे आमचे सुरवातीचे एकटेपण संपले.

अजयच्या जन्मावेळी मालूताईंनीच जयश्रीचे बाळंतपण केले. डॉ. प्रभाकररावांच्या आत्याबाई खूप वयस्क आणि कंबरेत पूर्ण वाकलेल्या. त्यांनी जयश्रीच्या बाळंतपणातल्या दहा दिवसांत आईच्या मायेने चांगलेचुंगले खाऊ घातले. अजयला लागोपाठ तीन वर्षे काविळ झाली. डॉ. मालूताई व डॉ. प्रभाकररावांनी त्याला बरे केले. या सर्व गोष्टी आठवल्या की आजसुद्धा डोळ्यांत पाणी येते. केवळ त्यांच्यामुळेच आम्ही आताचे दिवस पाहत आहोत. आता सध्या आम्ही पुण्यात व ते वसईला राहात असल्याने नियमित येणे-जाणे होत नाही. पण आठवण मात्र रोज येते. डॉ. प्रभाकरराव हे बालरोगतज्ज्ञ आहेत व बालरोगतज्ज्ञाला आवश्‍यक असलेला शांत स्वभाव त्यांच्या ठायी आहे. आमची मैत्री झाल्यापासून मला एकही दिवस असा आठवत नाही, की प्रभाकरराव खूप संतापलेले आहेत. माझ्या मुलांच्या बाबतीत तर हा अनुभव मला सतत येत राहिला आहे. पण त्यांच्या या स्वभावामुळे त्यांना अनेक लोकांनी खूप त्रास दिला आहे, फसवणूक केली आहे. पण त्यांच्यावर या गोष्टीचा काहीही परिणाम झाला नाही. त्यांच्या या शांत, अनौपचारिक व दिलखुलास स्वभावाने त्यांच्या शत्रूचाही विरस झाला. त्यांच्या या स्वभावामुळे ते सदैव आमच्या पाठीशी राहिले. आम्ही घर घ्यावयाचे ठरवले तेव्हा भावनिकच नाही, तर आर्थिक पाठबळही त्यांनीच पुरवले. त्यांच्यामुळेच आमच्या मुलांच्या दुखण्याखुपण्याची काळजी आम्हाला वाटली नाही. वसईला राहावयास यायच्या वेळी जो एकाकीपणा वाटायचा, तो पुढे केव्हाही जाणवला नाही. प्रत्येक कठीण प्रसंगी आणि आनंदाच्या प्रसंगीसुद्धा त्या उभयतांच्या आधारावर आम्ही सर्व पार पाडले. त्यांचे घर म्हणजे दुसरे घरच वाटे. त्यांचे कुटुंब आणि कुटुंबीय आम्हाला कधी परके वाटले नाहीत.

आमचे पुण्य म्हणूनच प्रभाकरराव व मालूताईंसारखी माणसे आम्हाला भेटली आणि आमचे आयुष्य समृद्ध केले. रक्ताचे नाते नव्हते. दूरच्या नात्याची ओळख वसईसारख्या त्या वेळी आम्हाला अनोळखी गावात पुरली आणि तीच पुढे आधार ठरली. याला ऋणानुबंधाशिवाय दुसरे नाव असूच शकत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raja mudgal write article in muktapeeth