सेकंड इनिंग

रजनी तडवळकर
शनिवार, 23 जून 2018

चूल-मूल करताना नोकरी सुटलीच; पण पुन्हा वेगळे काम करण्याची संधी मिळालीही. पुण्यात एका गरजूपायी सुरू झालेला व्यवसाय वाढत गेला आणि त्यात अनेक गोड गोष्टींनी पान भरत गेले.

चूल-मूल करताना नोकरी सुटलीच; पण पुन्हा वेगळे काम करण्याची संधी मिळालीही. पुण्यात एका गरजूपायी सुरू झालेला व्यवसाय वाढत गेला आणि त्यात अनेक गोड गोष्टींनी पान भरत गेले.

अकरावी मॅट्रिक झाल्यावर दीड-पावणेदोन वर्षे नोकरी केली अन्‌ लग्न होऊन मी मुंबईहून नागपूरला गेले. "चुली'मागोमाग वर्षांतच "मूल'ही वाट्याला आले आणि नोकरीचा विचार मागे पडला. दोन वर्षांनी नागपूरहून पुण्यात आलो. येथे एकत्र कुटुंब! घरात नऊ माणसे, सतत येणारे पाहुणे, सणवार! घरच्यांसाठी मी केलेल्या पाकातल्या पुऱ्या सर्वांनाच खूप आवडत, तितकेच आम्रखंडसुद्धा! मग सणवारी मला विचारणा व्हायला लागली व मीही प्रतिसाद द्यायला सुरवात केली. माझ्या पुतण्याला सांभाळायला एक रेखा नावाची मुलगी होती. तिला एकदा कळले की, पटवर्धन बागेतच एकाला जेवणाचा डबा हवा. तर, "आमच्या काकू करतील बहुतेक' असे ती सांगून आली. मी ते काम करावे यासाठी मागे लागली. मलाही ती संधी सोडवेना आणि या एकाच डब्यापासून "सेकंड इनिंग'ला सुरवात झाली. ती पुढे चांगलीच विस्तारली.
आमच्या बंगल्याच्या जवळच सिमल्याहून शिकायला पुण्यात आलेली एक मुलगी राहत होती. एक दिवस ती डबा घ्यायला आलीच नाही आणि निरोपसुद्धा नाही. आजारी आहे की काय या शंकेने, मी पतींना घेऊन तिच्या खोलीवर गेले. ती अभ्यास करत बसलेली. मी रागावून विचारले तर म्हणाली, 'आंटी, पापासे पैसे नही आए, आपके पैसे देने है.'' मग आम्ही दोघांनीही तिला समजावले आणि तिला घरी नेऊन जेवायला वाढले. पुढे जेव्हा तिला कळले की, माझे पती बॅंकेत आहेत व आम्ही दर तीन वर्षांनी सहलीला जात असतो, त्यावर लगेच तिने आमंत्रण दिले, 'अंकल, आंटी आप लोग सिमला आएंगे तो एक शाम हमारे फॅमिलीके साथ बिताओगे.'' काही वर्षांनी आम्ही सिमल्याला गेल्यावर तिला फोन करून सांगितले. लगेचच तिच्या वडिलांनी हॉटेलवर फोन करून आम्हाला आग्रहाने घरी बोलावले. घ्यायला गाडी आली तेव्हा आम्हाला कळले, की ते सिमल्याच्या महापालिकेत मुख्य नगरअभियंता होते. खूपच प्रेमाने, आत्मीयतेने गप्पा, जेवण झाले. सिमल्याच्या आसपास फिरण्यासाठी त्यांनी ड्रायव्हरसहित गाडी देऊ केली; पण आम्ही आधीच "बुक' केली होती.

काही काळ भाड्याने एका ठिकाणी राहत होतो. व्यवसाय पुढे न्यायचा असेल तर जाहिरात करायला हवी होती. परंतु त्याआधी घ मालकांची परवानगी हवी. घरमालकांना विचारल्यावर ते म्हणाले, 'अहो, करा की सुरवात, तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल,'' एवढ्यावरच न थांबता कुठे जाहिरात करायची हे पण सुचवले. खरेच, अशी प्रेमळ माणसे मिळायला नशीबच लागते. तेथेच एक मित्रांचे त्रिकूट यायला सुरवात झाली. पुढे बऱ्याच वर्षांनी यातल्या दोघांनी मेलबर्न व सिडनीला आमचे चांगलेच आतिथ्य केले.

हा एक व्यवसाय म्हणून जरी मी केला, तरीही अगदी जीव ओतून केला. माझ्याकडे जेवणाऱ्यांसाठी व घरातल्या कुटुंबीयांसाठी एकच स्वयंपाक असे. कधीकधी एक-दोघांना न आवडणारी भाजी केली असेल तर पर्यायी काही तरी असणारच. एखाद्या वेळी कुणी तरी स्वत:बरोबर एक दोन "गेस्ट' घेऊन येत. अशा वेळी आम्हा घरच्यांना पिठलं किंवा कशावर तरी भागवावे लागायचे. मग मुले म्हणणार, 'तुझी सख्खी मुले वाढलेली दिसताहेत आज!''

एका राष्ट्रीयीकृत बॅंकेत विभागीय व्यवस्थापक असलेले एक गृहस्थ माझ्याकडून डबा नेत असत. त्यांचे, नव्वदी ओलांडलेले वडील त्यांच्याकडेच असत. वडिलांना सोबत म्हणून त्यांनी एकाला आपल्याकडे ठेवून घेतले होते. एक दिवस ते सोबती सांगत आले, 'साहेबांची बहीण व मेव्हणे आले आहेत. डबा जरा वेगळा लागेल.'' नेमके साहेब दौऱ्यावर होते, त्यामुळे आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार कसा करावा याबाबत त्या सोबत्यांचा गोंधळ झाला असावा. मी त्यांना आश्वस्त केले व थोडा वेगळा स्वयंपाक करून डबा दिला. संध्याकाळी सोबती आले व म्हणाले, 'ते दोघे, तुम्हाला भेटायला आले आहेत.'' मी समोर गेले तर त्या बाई (साहेबांची बहीण) अक्षरश: गळ्यात पडल्या व म्हणाल्या, 'अहो, तुम्ही आईची आठवण करून दिलीत. जावई आल्यावर माझ्या आईने जे केले असते, अगदी तेच तुम्ही केलेत.''

माझ्या कामाची ही पावती काही कमी नाही. यांसारख्या अनेक कडू-गोड आठवणींनी माझी "सेकंड इनिंग' सजली आहे. कडू असतेच प्रत्येक ठिकाणी; पण गोडापुढे त्याचा विचार का करायचा? गोड खाल्ले की कडू चव आपोआप विसरली जाते, होय ना?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajani tadwalkar write article in muktapeeth