हम्प्टा पास अन्‌ चंद्रताल

राजेंद्र मुठे
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

सह्याद्रीतील राकट गड- दुर्गावरील भ्रमंती असो, की निसर्गसौंदर्याची लयलूट असणाऱ्या हिमालयातील. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात असा "कष्टप्रद निवांतपणा' मनाला एक ताजेपणा देऊन जातो.

सह्याद्रीतील राकट गड- दुर्गावरील भ्रमंती असो, की निसर्गसौंदर्याची लयलूट असणाऱ्या हिमालयातील. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात असा "कष्टप्रद निवांतपणा' मनाला एक ताजेपणा देऊन जातो.

गेल्यावर्षी झालेल्या स्नायुबंधांच्या शस्त्रक्रियेनंतर हिमालयातील "ट्रेक' जमेल का, या शंकेची पाल मधूनच मनात चुकचुकायची, तरीही निश्‍चयाने "युवाशक्ती'मार्फत हम्प्टा पास व चंद्रतालचा ट्रेक करायचे ठरवलेच. बारा दिवसांच्या ट्रेकसाठी मनालीजवळील नग्गर येथे पोचलो. "ट्रेक इंडिया'च्या बेस कॅम्पवर दोन दिवसांच्या मुक्कामात छोटे ट्रेक्‍स, श्‍वासाचे व्यायाम, खेळ याद्वारे तेथील वातावरणाचा सराव करून घेण्यात आला. नग्गर येथे सरावाबरोबरच स्थानिक राजवाडा, तसेच रशियन चित्रकार निकोलाय रोरीच यांच्या आर्ट गॅलरीला भेट देऊन त्यांनी रंगविलेल्या हिमालयाची विविध रूपे मनात साठवून घेतली. तिसऱ्या दिवशी प्रत्यक्ष ट्रेकला सुरवात झाली. सफरचंद व ऑर्चिडच्या घनदाट जंगलातून एक तासाच्या जीप प्रवासानंतर आम्ही "सेतान' येथे पोचलो व सुरू झाला निसर्गाच्या सहवासातील अवर्णनीय आनंद देणारा प्रवास...!

सेतान येथून उचुंग बिहाडी, चिक्का हा सुमारे नऊ हजार फुटांवरील प्रवास हा देवदार, ओक, फर, चेस्टनटच्या सोबतीने सुरू होता. सोबत होते अवखळ वाहणारे झरे आणि सोबत चालणारे धुके. आजूबाजूला "बाहुबली' चित्रपटात दाखविल्याप्रमाणे उभ्या असणाऱ्या भव्य पर्वतरांगा आणि त्यावर विहरणारे गरुड व गिधाडे. गिधाड हा पक्षी आता महाराष्ट्रात तरी दुर्मीळ झाला आहे. साधारण दोन ते तीन तासांच्या वाटचालीनंतर एका सुंदर व भव्य धबधब्याजवळ वसलेल्या आमच्या कॅम्पवर पोचलो. तेथे पोचल्यावर गरमा-गरम "सूप' देऊन केलेल्या स्वागतामुळे वाटचालीचा थकवा कुठच्या कुठे पळून गेला. जवळच कोसळणाऱ्या जलप्रवाहाच्या संगीताच्या सोबतीने निद्रा कधी लागली तेच कळले नाही.

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे "भालू का डेरा'कडे पायपीट सुरू झाली. अत्यंत रम्य निसर्ग, मात्र अवघड रस्ता व भुरभूर पडणारा पाऊस यामुळे आमचा ट्रेक हा थोडा कष्टप्रदच होता. एके ठिकाणी नदीचे आव्हान समोर उभे होते. सकाळी दहाच्या आत ही नदी ओलांडणे, हे तेथील हवामान व पडणारा पाऊस विचारात घेता आवश्‍यक होते. नदीची रुंदी छोटी, मात्र अत्यंत ओढ असणारा प्रवाह पाहता स्थानिकांच्या मदतीने "दोराला धरून ओलांडलेली नदी' हा एक थरारक अनुभव होता. पाण्याच्या प्रवाहाबरोबरच उचलले जाणारे पाय प्रवाहात रोवणे हे थरारकच होते. साधारण चार-पाच तासांनी "भालू का डेरा' या अत्यंत निसर्गरम्य व चोहोबाजूंनी पहाडांनी घेरलेल्या बेस कॅम्पवर मुक्काम होता.

तिसऱ्या दिवशी प्रत्यक्ष सुरू झाला हम्प्टा पासचा ट्रेक. सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत होता. आजूबाजूला प्रचंड धुके. थंडीचे साम्राज्य. या ट्रेकमध्ये रस्ता अस्तित्वातच नव्हता. नुसते दगड दरडींमधून पहाड व ग्लेशियर्स ओलांडणे भाग होते. पावसामुळे आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याच्या दर्शनाला मुकलो. या मार्गाचा शोध स्थानिक मेंढपाळांनी गवताच्या शोधार्थ भटकताना लावला आहे. तरंगते ग्लेशियर्स व परिसरातील सहा हजार मीटर उंचीची हिमालयीन शिखरे हे हम्प्टा पासचे वैशिष्ट्य. येथून समोर इंद्रसेन व देवतिब्बा ही शिखरे दिसतात. एका बाजूला बर्फ, तर दुसऱ्या बाजूला रखरखीत कोरडे वाळवंट हे हम्प्टा पासचे आणखी एक वैशिष्ट्य. हा आठ- दहा तासांचा ट्रेक शारीरिक क्षमतेची कसोटी पाहतो. पण, त्या कसोटीला उतरून "शील गारू' या बेस कॅम्पवर मुक्काम ठोकला. "शील गारू' म्हणजे "अत्यंत थंड रस्ता'. गेल्या चार दिवसांनंतर प्रथमच स्वच्छ ऊन अनुभवले.

शील गारू ते छतरू हा रस्ता उताराचाच होता. या प्रवासातही एक नदी ओलांडण्याचे दिव्य पार पाडावे लागले. संपूर्ण ट्रेकमध्ये रानफुलांनी केलेली साथ, चांदीच्या वर्खाने चमचमणारे अभ्रकाचे दगड ट्रेकचा थकवा घालविण्यास मदत करणारे होते. छतरूमधील बेस कॅम्पच्या जवळून चंद्रा नदी तुफानी वेगाने वाहत होती. चंद्रा व भागा या दोन बहिणी लहानपणी यात्रेत हरविल्या. पुढे अनेक वर्षांनी नदीरूपाने पुन्हा एकत्र आल्या व त्यांची झाली "चंद्रभागा'! ही दंतकथा. पुढे ती चिनाबला मिळते. चंद्रतालकडे जीपने केलेला प्रवास हा प्रत्यक्ष ट्रेकपेक्षा अवघड होता. कारण रस्त्याचे अस्तित्वच कुठे दिसून येत नव्हते. फक्त दगडगोट्यांचा, खोल दरीच्या बाजूने जाणारा रस्ता हाडे खिळखिळी करत होता. रस्त्यात बाटल येथे दोजें बोध व त्यांची पत्नी या चाचा- चाचींना भेटण्याचा योग आला. त्यांनी गेल्या वर्षी थंडीमुळे बर्फात अडकलेल्या 106 पर्यटकांचे प्राण वाचवून त्यांना आठ दिवस आपल्या ढाब्यात सांभाळले होते. याबद्दल हिमाचल प्रदेश सरकारने त्यांना पुरस्कार देऊन सत्कारही केला होता. "चंद्रताल' हे स्पिती जिल्ह्यातील चंद्राच्या आकाराचे पवित्र तळे आहे. या निळ्याशार तळ्यात आजूबाजूच्या पर्वतरांगांचे पडणारे प्रतिबिंब नजर खिळवून ठेवते. भारतातील अतिउंचीवरील दोन तलावांपैकी हा एक तलाव आहे. स्थानिक नागरिक या तळ्याची परिक्रमा करून पताका बांधून आपले नवस फेडतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajendra muthe write article in muktapeeth