आपल्यातील वानप्रस्थी

muktapeeth
muktapeeth

अत्याधुनिक सोयीसुविधा हव्यात, असे म्हणणारे अनेक जण भेटतात. पण "गरज नाही' म्हणत साधनसुविधा नाकारत जाणीवपूर्वक साधे जीवन अंगीकारणारे किती जण असतात?

"एक-दोन दिवसांत आपण तळेगावला जाऊन येऊ. "चेंबूरच्या मामा'चा फोन आला आहे, त्याला भेटून येऊ,'' घरी आल्या आल्या "होम मिनिस्टर'च्या कानावर घातले. नेहमीप्रमाणे वेळ ठरवून आम्ही मामाकडे गेलो.

"चेंबूरचा मामा' म्हणजे प्रभाकर गोखले, वय वर्षे 76. चेंबूरच्या आरसीएफ कॉलनीत छानशा बंगल्यात राहायचा म्हणून तो "चेंबूरचा मामा'. त्याचा तळेगावला एक फ्लॅट आहे. म्हणजे त्याने मुद्दाम येथे घेतलेला. "सेकंड होम' म्हणा हवे तर! मुंबईच्या प्रचंड गर्दीपासून दूर. वस्तीतून उठून रानात झोपडी बांधावी, तसा हा मामा मुंबईच्या गर्दीतून अधूनमधून तळेगावला येऊन राहणारा. तळेगावकर झालेला. निवांतपणा देणारे हे घर होते. तिथेच आम्ही चाललो होतो. मला समजायला लागल्यापासून वास्तुविशारद असलेला मामा बीएआरसीमध्ये मोठ्या हुद्द्यावर होता. नंतर स्वतःचा व्यवसाय उत्तम केला. मग तो व्यवसायही थोडा थोडा कमी करून पाच वर्षांपूर्वी बंदच केला. एक आखीव अशी कारकीर्द घडवली व निश्‍चयपूर्वक थांबला. असे सगळे डोळ्यांसमोरून जात असतानाच आम्ही तळेगावला पोचलो.

घरात गेल्यावर लक्षात आला तो साधेपणा आणि टापटीप रचना. समोरच गणपतीची भव्य मूर्ती आणि मूर्तीसमोर पानाफुलांची सुरेख आरास. चेंबूरला असो, तळेगावला किंवा पुण्यात, रोज सकाळी फिरून येताना वेगवेगळी रानफुले आणि पाने गोळा करून आणतो. मनाला पूर्ण समाधान मिळेल अशी सजावट करतो. मग त्याचे छायाचित्र काढून व्हॉट्‌सऍपवर मित्रमंडळींना पाठवतो. मामाचा गणपती आणि त्या पुढील सजावटीचे रोज सकाळी व्हॉट्‌सऍपवर दर्शन घेऊन दिवस सुरू करणाऱ्या आप्तस्वकीयांचा दिवस चांगलाच जात असणार!

त्याचा स्वयंपाकही झटपट होतो. चार-पाच धान्ये आणि त्यात थोडी भाजी चिरून घालायची, मीठ घालून उकडायचे की झाला सकाळचा स्वयंपाक. रव्याची खीर आणि लागले तर एखादे फळ म्हणजे रात्रीच्या पोटोबाची सोय झाली. आहार मोजकाच. पण खूप ऊर्जा देणारा. रोज आपण लिहून काढलेली गीता वाचायची. होय, म्हणजे तीच श्रीकृष्णाने सांगितलेली, तीच आपल्या हस्ताक्षरात लिहिलेली, अर्थासकट, तर मिळणारे समाधान आगळेच! प्रत्येक वाचनात काही तरी नवे आकळल्याचेही लक्षात येते. आधीच्या वाचनात एखादे अर्थवलय ध्यानात आलेले नसते, ते आले की मग त्यावर अधिक विचारमंथन सुरू. चिंतन सुरू. मग कळले, श्री गजानन महाराजांच्या पोथीसारखी बरीच पुस्तके मामाने आपल्या सुरेख हस्ताक्षरात लिहून काढली आहेत. त्यामुळे वाचनाबरोबरच रोज बराच वेळ लिखाणात जातो. वाचनाची आवड आहेच; पण आपण वाचलेले चांगले असेल ते दुसऱ्यालाही कळावे ही तळमळ आहे. मग ती धार्मिक पुस्तके असतील किंवा चांगल्या इंग्रजी पुस्तकांचा मराठीत अनुवाद असेल किंवा स्वतःला सुचलेल्या किंवा अनुभवाला आलेल्या गोष्टी असतील त्याचे ध्वनिमुद्रण करून ठेवले आहे त्याने. आजी भेटली की, तिला ऐकवायला. आजी म्हणजे मामाची आई. वय वर्षे 96! तिच्याकडून बरेचसे गुण तिच्या तीनही मुलांमध्ये उतरलेत. आजी भेटली की, तिला प्रत्यक्ष ऐकवायचे. त्यामुळे आजीला मिळणारा आनंद, प्रत्यक्ष पाहून मिळणारे समाधान हे अवर्णनीय असते आणि अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींतून रोज समाधान आपण मिळवले, तर प्रत्येक क्षण-तास-दिवस आणि सगळे आयुष्यच आनंदात न्हाऊन निघते, हे मामाचे तत्त्वज्ञान.
या सगळ्यांबरोबर सकाळ-संध्याकाळ पुरेसा व्यायाम आणि फिरणे प्रकृती उत्तम राखते. "दोन-तीन महिन्यांनी दोन-तीन आठवडे असा इकडे आलो की राहिलेले सगळे दिवस तेवढेच छान जातात,' असे मामा सांगतो. इथे येऊन जगण्याची नवी ऊर्जा भरून घ्यायची आणि मुंबईत जायचे. पुन्हा इथे यायचे.

गप्पा मारता मारता त्यानेच चहा केला. स्वयंपाकघरात फ्रीज, मिक्‍सर नाही. घरात टीव्ही नाही हे लक्षात आले. विचारले तर म्हणाला, ""लागतच नाही, मग कशाला आणायचे?' हा प्रश्‍न म्हणजेच त्याचे उत्तर होते. व्यवसायाने आर्किटेक्‍ट-इंटिरिअर डेकोरेटर असलेला मामा उत्कृष्ट स्वयंपाक करतो आणि तरीही फक्त उकडलेल्या भाज्या खाण्याचा आग्रह धरतो. गाडीने आता कुठे जायचे नाही आणि प्रतिष्ठेसाठी गाडी कोणाला दाखवण्याची गरजही नाही म्हणून गाडीही मामाने विकून टाकली.
मोठ्या मुलाचा अमेरिकेत व्यवसाय, मुलगी आणि मामी दोघीही उच्च विद्याविभूषित. मामीला समाजकार्याची आवड. सगळी सुखसमृद्धी असूनही तळेगावात असे व्रतस्थ होऊन काही दिवस राहिल्यामुळे बाकीचे दिवस चांगले जाण्याचे मामाचे तत्त्वज्ञान खूपच रुचले. कधी जनात, कधी वनात असे त्याचे आयुष्य आहे. येथेच मला वानप्रस्थाश्रम ही संकल्पना किती योग्य आहे हेही पटले. अर्थातच आपल्यातील एक "वानप्रस्थी' पाहिल्यावर!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com