प्रियम

रजनी शशिकांत दोशी
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

जीवनातील साथीदार जातो, तेव्हा इतरांनी सांत्वन करूनही मनाची समजूत घातली जात नाही.

जीवनातील साथीदार जातो, तेव्हा इतरांनी सांत्वन करूनही मनाची समजूत घातली जात नाही.

अहो, ऐकलंत का? तुम्ही अंतराळात गेल्यावर डॉ. शेखर, वंदना, सुलभाबेन, शीलूताई आल्या होत्या. डॉ. शेखर काय म्हणाले, माहीत आहे? "भाभी, मी डॉक्‍टर आहे. मी असंख्य रुग्ण पाहिले आहेत. कित्येक मृत्यू पाहिले आहेत. रुग्णाच्या वेदना बघवत नाहीत. मृत्यूसाठी तळमळतात. नातेवाइकांना, घरच्यांना, आप्तांना वाटते की, सुटले तर बरे.' आणि ते काय म्हणाले, माहीत आहे? "भाईंच्या मरणासारखे मरण साधू-साध्वी मागतात.' खरेच, विनातळमळ, विनातडफड, आपण शांतपणे प्राण सोडलात. कुणालाही कळू नये इतक्‍या सहजतेने श्‍वास घेणे बंद केले. कुणाचीही सेवा घेतली नाही. तुमचे नेहमीचे म्हणणे यमधर्मांनीही ऐकले असावे. "काम करता करता मला मृत्यू यावा,' ही तुमची प्रार्थना ऐकली त्यांनी. या सहज मृत्यूसाठी तुमचा धर्म कामी आला का? आपल्या इमारतीत वरच्या मजल्यावर राहणारी जानू रामचंदानी सांत्वनासाठी आली होती. ती म्हणाली, ""अंटीजी, आप क्‍यूँ रो रहे हो? वो तो पवित्र आत्मा था। भगवान ने अपने गोद में लिया है उन्हें। वहॉं बहुत अच्छी तरह से सांभाल रहे हैं।'

अंत्यसंस्कारासाठी गोळीबार मैदानात खूप जण आले होते. शंभरहून अधिक सीए आले होते. आयुक्तांपासून सर्व कर्मचारी वर्ग आला होता. सिंहगड इन्स्टिट्यूटच्या प्रमुखांनी भाषण केले. आपल्या चिरंजीवांनी आठवणी जागवल्या. आपल्याला खांदा कुणी दिला? आपल्या पंचकन्यांनी! अलगद पालखी नेली आपली आणि मुखाने "अरिहंत अरिहंत'चा जयघोष. तुम्ही जोडलेली माणसे येत आहेत अजूनही. तुमच्याबद्दलचे उद्‌गार ऐकून थोरपणाची ग्वाही मिळत आहे. अनेकांनी समजावले आतापर्यंत. भगवतगीतेतील श्‍लोक ऐकवले. जीर्ण वस्त्र टाकून दिले आहे आणि नवे वस्त्र स्वीकारले असेल. जो जन्म मिळाला असेल, तोही सुंदरच असेल आपल्या पवित्र आत्म्यासाठी. शून्यातून स्वकर्तबगारीने मिळवलेले वैभव हात जोडून उभे आहे. फक्त तुमची उणीव भासते आहे. प्रत्येक जण सांत्वन करतो आहे, तरी काही केल्या मनाची समजूत पटत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajni doshi write article in muktapeeth