काळ्या इंजिनचे सौंदर्य....!

रमेश सोनतळे
मंगळवार, 19 जून 2018

वाफेच्या इंजिनची मजाच काही और होती. त्या इंजिनचा डौल आजही कायम आहे. झुक-झुक आगीनगाडीच्या गाण्यावर ताल धरत एक पिढी मोठी झाली...!

वाफेच्या इंजिनची मजाच काही और होती. त्या इंजिनचा डौल आजही कायम आहे. झुक-झुक आगीनगाडीच्या गाण्यावर ताल धरत एक पिढी मोठी झाली...!

नुकतेच एका सांस्कृतिक कार्यक्रमात एका कलाकाराने निरनिराळ्या आवाजांची नक्कल करून दाखवली. रूळ बदलताना रेल्वेचा होणारा आवाज अगदी हुबेहूब काढला. त्याच वेळी मी 40-50 वर्षे मागे गेलो. मी रेल्वेच्या इंजिनच्या सान्निध्यात 25 वर्षे कार्यरत होतो. संपूर्ण रेल्वे प्रशासन भारतात इटारसी, भुसावळ, बीना, सोलापूर आदी नऊ प्रमुख विभाग होते. मी सोलापूर विभागात होतो. मुंबई ते पुणे रेल्वे इलेक्‍ट्रिकल इंजिनने गाड्या येत असत. पुण्यापासून पुढे सोलापूर, वाडीपर्यंत वाफेचे इंजिन सर्व गाड्या घेऊन जात असत. दौंडला जंक्‍शनला मोठे वर्कशॉप होते. तेथे वाफेच्या इंजिनांची देखभाल होत. मी विद्युत विभागात असल्याने इंजिनाचे हेडलाइट व कॅबलाइटची जबाबदारी आमच्यावर असे. त्या वेळी "एक्‍स्प्रेस' गाड्यांना भाव जास्त असे. त्यामुळे सायंकाळी येणाऱ्या मद्रास मेल वगैरे महत्त्वाच्या गाड्यांची इंजिन आमच्या वर्कशॉपमध्ये तयार ठेवत असू. त्या वाफेच्या इंजिनचा रुबाब न्यारा होता. ते अजस्र धूड वाफा काढीत निघाले की प्रवासी खूष होत. इंजिनचा तो आवाज म्हणजे आम्हा कर्मचारी वर्गाचे स्पंदन असे. ऐटीत शिटी वाजवत वर्कशॉपममधून निघालेले इंजिन जणू आम्हाला बाय्‌ बाय्‌ करत. आम्ही त्याचे काळी राणी असे नामकरण केले होते.

एका जनरल मॅनेजरने या इंजिनचे कौतुक करून सर्व विभागांतील वाफेच्या इंजिनची सौंदर्य स्पर्धा घ्यावी असे ठरले. या नवीन कल्पनेला मोठा प्रतिसाद मिळाला व वर्षातून एकदा मोठ्या वर्कशॉपमध्ये या स्पर्धा होऊ लागल्या. प्रत्येक विभागातून एकेक इंजिनची निवड होऊन त्या काळ्या राणीला नटवणे-सजवणे वगैरे प्रकार सुरू झाले. या स्पर्धेला नाव काय द्यावे? या प्रश्‍नावर रेल्वे अधिकारी वर्गाने "ब्लॅक ब्यूटी कॉंटेस्ट' असे नामकरण मंजूर केले. ही स्पर्धा 15 ते 20 वर्षे अखंडितपणे सुरू होती. त्या वेळी इंजिनला पाहण्यासाठी सारा गाव लोटत. वर्कशॉपमधील पितळ व तांब्याचा उपयोग या इंजिनला सजवण्या, नटवण्यात होत. निरनिराळे रंगीत दिवे इंजिन पाहून लोकांच्या डोळ्यांचे पारण फिटत.

स्पर्धेच्या दिवशी सर्व नऊ इंजिन मोठ्या वर्कशॉपमध्ये जमा होत. अगदी लग्नसोहळा असावा असे वातावरण असे. निरनिराळ्या फुलांचे हार-तुरे, गाणी यामुळे खूपच मजा येत असे. उपस्थित नागरिक, कर्मचारी वर्गाचे तोंड मिठाईने गोड केले जात असे. बॅंडबाजा वाजवून विजयी इंजिनांचे स्वागत होत असे. अतिशय आनंदी वातावरण असायचे. कालांतराने डिझेल व विद्युत इंजिन आल्याने "या' इंजिनची वाफच काढली असे वाटले. या इंजिनाचे योगदान लक्षात घेता ते इतिहासजमा झाले म्हणून अजूनही वाईट वाटते.

लहानपणी आगीनगाडीचा खेळ आठवतो. चाळीतले, गल्लीतले, शेजारचे मुले एकत्र येऊन झुक-झुक गाडीचा खेळ सुरू असे. एक जण इंजिन तर इतर एकमेकांची शर्ट धरून लांबलचक गाडी बनवीत. शेवटचा मुलगा हातात एका काठीला हिरवा-लाल कापडाचा झेंडा हलवीत असे. इंजिनने फक्त कुकूकुकूकूऽऽऽ असा आवाज काढायचा व गाडी सुरू होत असे. खूप गम्मत असे.

मी भाग्यवान म्हणून वाफेच्या इंजिनचा सहवास मला नोकरीत असताना आला. त्या इंजिनचा आवाज, शिटी व वाफेचा लयीमध्ये होणारे संगीत, मन सुखावणारे होते. आज ही इंजिने मुख्य रेल्वे स्थानकावर शोभेची अविस्मरणीय शिल्प म्हणून दिमाखात उभी आहेत व आजूबाजूचा परिसराचा प्रेक्षणीय अनुभव पर्यटकांना देत आहे. आज झपाट्याने बदलत आहे. भारत प्रगतिपथावर आहे. बुलेट ट्रेनचे स्वप्न पूर्ण होत आहे; पण वाफेच्या इंजिनने ओढलेली रेल्वेगाडी झुकझुक आवाज करीत प्रवासीवर्ग, लहान मुले यांना आल्हाददायक आनंद देत असे. इतिहासजमा झालेल्या या वाफेच्या इंजिनला शतशः प्रणाम!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramesh sontale write article in muktapeeth