वाघेरा घाटातील व्याघ्रदर्शन!

रवींद्र मोरे
सोमवार, 4 जून 2018

वाघेरा घाटाबाबत ऐकून होतो, त्या घाटातून रात्रीच्या प्रवासाचा अनुभव नव्हता. अगदी नाइलाजास्तव प्रवास करताना समोर प्रत्यक्षात वाघाचे दर्शन झाल्यावर काहीच सुचले नाही.

नाशिक जिल्हा परिषदेत त्या दिवशी सायंकाळचे पाच वाजल्यावरही काम होण्याची कोणतीच चिन्हे दिसेना. आज आपल्याला इथेच आठ-नऊ वाजणार, कारण माझी जिल्हा बदलीची फाइल पाहणारे साहेब कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांना येण्यास उशीर होणार होता. त्यामुळे माझ्या काळजीत भर पडत होती. कारण, नाशिकवरून नव्वद किलोमीटरचा प्रवास पूर्ण जंगलातून करायचा होता. त्यात वाघेरा घाटातून रात्रीचा प्रवास धोक्‍याचाच. घाट जवळपास नऊ किलोमीटरचा.

वाघेरा घाटाबाबत ऐकून होतो, त्या घाटातून रात्रीच्या प्रवासाचा अनुभव नव्हता. अगदी नाइलाजास्तव प्रवास करताना समोर प्रत्यक्षात वाघाचे दर्शन झाल्यावर काहीच सुचले नाही.

नाशिक जिल्हा परिषदेत त्या दिवशी सायंकाळचे पाच वाजल्यावरही काम होण्याची कोणतीच चिन्हे दिसेना. आज आपल्याला इथेच आठ-नऊ वाजणार, कारण माझी जिल्हा बदलीची फाइल पाहणारे साहेब कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांना येण्यास उशीर होणार होता. त्यामुळे माझ्या काळजीत भर पडत होती. कारण, नाशिकवरून नव्वद किलोमीटरचा प्रवास पूर्ण जंगलातून करायचा होता. त्यात वाघेरा घाटातून रात्रीचा प्रवास धोक्‍याचाच. घाट जवळपास नऊ किलोमीटरचा.

घाटातून दिवसा जायचे तरी भीती वाटायची. उंच झाडांमुळे दिवसासुद्धा अंधार असतो. त्यात रात्री तर घाटात चिटपाखरूही आढळत नसे. त्यामुळे, रात्री घाटातून शक्‍यतो कोणी प्रवास करत नव्हते. एखादी चारचाकी फार तर जायची, परंतु दुचाकीचा प्रवास धोकादायकच होता. त्यात आम्हाला घाटातून जायला रात्रीचे अकरा-साडेअकरा वाजणार होते. मात्र, दुसरा पर्यायही नव्हता. 

नाशिकला मुक्काम करण्याएवढे पैसेही नव्हते. माझ्याबरोबर माझा मित्र संपत कोकणेही होता. रात्री आठ वाजेपर्यंत वाट पाहूनही साहेब येण्याची चिन्हे दिसेनात. थोडी चौकशी केल्यावर साहेब उद्या भेटतील, असं कळलं. म्हणजे आजचा दिवस वायाच गेला. किर्र रात्री घाटातून जाण्याच्या कल्पनेनंच अंगावर काटा आला. तरीही कमीत कमी हरसूलपर्यंत जाणं गरजेचं होते. तिथे आमची मुक्कामाची सोय होती. मग सकाळी उठून ओझरखेडला जाणं शक्‍य होतं. त्यामुळे हरसूलपर्यंत जाण्याचं आम्ही ठरवलं.

दिवसभरात साधा नाष्टासुद्धा केला नव्हता. भूक फार लागल्यामुळे आम्ही जेवण करून निघालो. आम्हाला रस्त्याला लागायला दहा वाजले. मित्रानं गाडी घेतली. एकमेकांशी काहीही न बोलता आमचा प्रवास सुरू झाला.

घाटाच्या तोंडाशी येण्यास अकरा वाजले असतील. मित्र म्हणाला, ‘‘आता तू गाडी चालव.’’ मी तर खूपच घाबरलो होतो. पण त्याला काही न बोलता ‘ठीक आहे’ म्हणतं गाडी घेतली. मला साहेबांचा संतापच आला होता. त्यांना जाणीव नसते कोण किती त्रासातून आपल्याकडं येत असतं. पण ती वेळ संताप करण्याची नव्हती. काळ्याकुट्ट अंधारात आमची एकच गाडी घाटातून चालली होती. मागे-पुढे काहीही दिसत नव्हते. स्मशानशांततेत रातकिड्यांची किरकिर ऐकू येत होती. कुठे तरी पाखरांनी खट्ट केलं तरी आमच्या काळजाचा ठेका चुकत होता. अशा गंभीर वातावरणात आम्ही घाट उतरत होतो. प्रत्येक क्षण एखाद्या युगासारखा वाटू लागला. 

वळणावर समोरून एखादी गाडी येत आहे, असं वाटायचं. पण तिथं पोचल्यावर ते आपल्याच गाडीच प्रतिबिंब असल्याचं समजायचं. देवाचा धावा करत निम्माअर्धा घाट कसाबसा पार केला. आता थोडंसं बरं वाटत होतं. तेवढ्यात अचानक मी गाडी थांबवली. हातपाय थरथर कापत होते. संपतला हाक मारण्याचंसुद्धा अवसान नव्हतं. समोर चमकणारे दोन डोळे दिसले. ते दृश्‍य स्पष्ट झाले आणि डोक्‍यावरचे केस भीतीने उभे कसे राहतात, हे पहिल्यांदाच कळले. तोंडातून शब्द पडले, ‘‘अबब! वाऽऽऽघ’’ आता मला आईचं दूध आठवू लागलं. मध्यरात्री अर्ध्या घाटात आपण आहोत. मागे-पुढे कोणी नाही. आता आपलं काय होणार हे काहीच समजतं नव्हतं. मी वाघ प्राणिसंग्रहालयातसुद्धा पाहिला नव्हता. त्यामुळं, डोळ्यांवर विश्‍वास बसत नव्हता. देवाचा धावा करत होतो. तेवढ्यात वाघानं आपली जागा बदलली आणि अगदी रुबाबदारपणे त्याने आम्हाला माफ केले, अशा आविर्भावात रस्ता ओलांडला. आपल्याच नादात आपल्याच मस्तीत  तो जंगलाचा राजा थाटात चालला होता. मी त्याच्या दिशेनं गाडीची लाइट वळवणार, तेवढ्यात संपत ओरडला, ‘‘तुला कळतं का नाही, इथून नीघ पहिल्यांदा.’’ आणि मीही गाडी फर्स्ट गिअरवर घेऊन सुसाट पळालो आणि ‘सुटलो’ एकदाचे म्हणून भगवंताचे आभार मानले. 

योगायोगाने पुन्हा घाटातून रात्री प्रवास करण्याचा योग आला नाही. कारण, त्यानंतर लवकरच माझी पुणे जिल्हा परिषदेला बदली झाली. २७ जानेवारी २००५ रोजी घाटातून पहिल्यांदा प्रवास करतानाच तो घाट पाहून माझी तारांबळ उडाली होती. त्यानंतर २७ जानेवारी २००९ ला शेवटचा प्रवास करताना घाटाच्या वरती आल्यावर पहिल्यांदा गाडी थांबवून घाटाच्या पाया पडलो आणि खूप प्रवास या घाटातून केला; पण कोणतंच संकट माझ्यावर ओढवलं नाही. त्या रात्री वाघाच्या तावडीतून तूच सोडवलं, असं म्हणून आभार मानले. वाघेरा घाटाची कायमची आठवण घेऊन आलो. अशा प्रकारे अपघातानं का होईना मला पहिल्यांदाच व्याघ्रदर्शन घडलं! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ravindra more article waghera vally tiger