'दंड'पुराण

सां. रा. वाठारकर
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

राजदंड उंचावला, की सर्वांनी संमतिदर्शक मान लववायची असा दण्डक आहे, न पालनाने दंड होऊ शकतो.

राजदंड उंचावला, की सर्वांनी संमतिदर्शक मान लववायची असा दण्डक आहे, न पालनाने दंड होऊ शकतो.

दंड लावला, दंड भरला व दंड केला असे नेहमीच ऐकतो. याचा अर्थही कळतो. पण "दंड' या शब्दाच्या मुळाशी जाण्याची गरज वाटत नाही. याची व्युत्पत्ती पाहू गेल्यास अर्थपूर्ण संदर्भ सापडतात. म्हणजे की, दंड म्हणजे काठी किंवा "कोपरापासून वरचा हाताचा भाग' असा अर्थ आहे. फार पूर्वी समाजात कोणी चोरी केली किंवा सामाजिक नियमाविरुद्ध वागल्याने त्याचा त्रास झाला अशा आरोपींना गुन्हा सिद्ध झाल्यानंतर पंचलोक सजा म्हणून काठीने किंवा हाताने फटके मारायचे. काही वेळा गुन्हेगार गुन्हा कबूल करेपर्यंत किंवा माफी मागेपर्यंत फटके देत असत. थोडक्‍यात सांगायचे तर त्या काळी "दंड देणे' हे धन वसुली बरोबर जोडले जात नसे. आता काळ बदलला तसा जमाना बदलला. आजकाल काठी हे उपशस्त्र मानले गेल्यामुळे पोलिसांच्या हाती अथवा संरक्षक काम करणाऱ्या चौकीदारापर्यंत प्रत्येकाकडे असते. एवढेच कशाला फौजदार, पोलिस आयुक्त यांच्याकडे छोटी का होईना छडी असतेच.

हे दंडपुराण एक उपकथा सांगितल्याशिवाय पूर्ण होणार नाही. एकदा धर्मराजाच्या दरबारात एक प्रश्‍न चर्चेला आला, की वृद्ध मातापित्यांना त्यांच्या उतारवयात आधार कोण देतो? यावर उपस्थित पंडित, अमात्य आपापल्या परीने उत्तर देऊ लागले. कोणी म्हणाले, मुले आधार देतात, कोणी सोने, चांदी, संपत्ती याला आधार मानले. काहींनी नातेवाईक सांभाळतात, असे मत मांडले. चर्चा सुरू असताना दरबारात उपस्थित असलेला एक म्हातारा जागेवरून उठला व काठी (दंड) टेकत टेकत राजासमोर आला. नमस्कार करून म्हणाला, ""महाराज, म्हातारपणी या दंडाचाच आधार असतो. असे म्हणत त्याने तो दंड उंच धरून साऱ्या सभागृहाला स्वतःभोवती फिरत फिरत उपस्थित सर्वांकडे पाहत त्याने तो दाखवला. उपस्थित सर्वांनी माना डोलावून कबुली दिली. कारण त्यातून दोन खास अर्थ अधोरेखित झाले. राजानेही संमतिदर्शक मान हलवली व समाजात काय दवंडी द्यायची, या विचारात गढून गेला. गोष्ट संपली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: s r watharkar write article in muktapeeth