वळण भले!

सां. रा. वाठारकर
मंगळवार, 15 जानेवारी 2019

बेरोजगार तरुणाकडे समाज सहानुभूतीने पाहतो; पण अचानक थोड्या दिवसासाठी काम मिळाले तरी पाहणाऱ्यांचा दृष्टिकोन लगेच बदलतो.

बेरोजगार तरुणाकडे समाज सहानुभूतीने पाहतो; पण अचानक थोड्या दिवसासाठी काम मिळाले तरी पाहणाऱ्यांचा दृष्टिकोन लगेच बदलतो.

मी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेणे शक्‍य नव्हते. जाहिराती पाहत नोकरीसाठी अर्ज करीत असे; पण कुठे काही जमत नव्हते. गावातील लोक माझ्याकडे "शिकलेला एक बेरोजगार तरुण', या नजरेतून पाहत. असेच दिवस चालले होते. माझे वडील गावचे ब्रॅंच पोस्ट मास्तर. वडिलांना अचानक जमिनीचे काम निघाले व त्यांना पंधरा दिवस बाहेरगावी जायचे होते. त्याकाळी सुटीवर जायचे म्हणजे एक योग्य माणूस बदली देऊन जावे लागे. वडील मला म्हणाले, ""हे बघ, मी पंधरा दिवस नाही. तू पोस्ट मास्तर म्हणून माझे काम बघावे, असे मला वाटते.''
""पण बाबा मला या कामाची माहिती कुठे?''
""मी तुला सर्व शिकवतो.'' बाबांनी मला कामाची पूर्ण माहिती दिली. यामध्ये थैल्यांचे सील कसे तपासावे-लावावे, तसेच हिशेबाचे अर्ज भरणे व तद्‌अनुषंगिक इतर गोष्टी सांगितल्या. ते गावाला निघून गेले. माझ्या हाताखाली एक पोस्टमन असायचा. त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे तो एसटी स्टॅंडवरून मुख्य थैली घेऊन यायचा. अकरा वाजता पोस्ट सुरू व्हायचे. गावचे लोक स्वतःचे टपाल पाहण्यासाठी गर्दी करायचे. वडिलांच्या जागी मी काम करतोय पाहून आश्‍चर्यचकित व्हायचे. म्हणायचे, ""वा, छान झाले, तुला काम मिळाले.'' त्यांचा असा समज झाला, की मी कायमस्वरूपी काम करणार. माझे "स्टेट्‌स' वाढले! न बोलणारे, तुच्छ समजणारे सलगी करून चहाला बोलावू लागले. माझ्यातही आमूलाग्र बदल झाला. गावचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकाची घरची परिस्थिती, मग ती आर्थिक असो वा कौटुंबिक याची इत्यंभूत माहिती असायची. बघता बघता पंधरा दिवस संपले. बाबा कामावर रुजू झाले; पण पोस्टमास्तरचे मी काम केल्यामुळे माझा वाढलेला "स्टेट्‌स' व "उंची' कमी झाली नाही. या गोष्टीला चौपन्न वर्षे होऊन गेली. जीवनातले एक चांगले वळण पाहावयास मिळाले आणि आयुष्यालाच चांगले वळण लागले, हे भाग्य समजतो!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: s r watharkar write article in muktapeeth