कथा हरविलेल्या वहीची..!

सदानंद भणगे
शुक्रवार, 15 जून 2018

ऐन परीक्षेच्या काळात वर्गातील एका गुंड मुलाने वही पळवली. ना पुस्तक, ना वही अशी विचित्र अवस्था माझी झाली. त्यावेळी मित्र "ईश्‍वरा'सारखा धावून आला.

ऐन परीक्षेच्या काळात वर्गातील एका गुंड मुलाने वही पळवली. ना पुस्तक, ना वही अशी विचित्र अवस्था माझी झाली. त्यावेळी मित्र "ईश्‍वरा'सारखा धावून आला.

सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट. टेक्‍निकलसाठी माझी निवड झाली होती. थेअरीच्या विषयांची पुस्तके फारशी मिळत नव्हती. विषय समजायला पण जड होते. कोटस्थाने सर या विषयांचा क्‍लास घ्यायचे. सर त्याला सेंटर आणि क्‍लासची फीऐवजी सर्व्हिस चार्जेस म्हणायचे. माझी परिस्थितीत चांगली झाली तर तुमचे सर्व्हिस चार्जेस मी परत करीन असे सर सांगत. त्यांचे मुलांवर खूप प्रेम होते.
वार्षिक परीक्षा आठ-दहा दिवसांवर आलेली. तंत्रशास्त्राच्या वह्या वाचल्या की दुसरं काही वाचावं लागायचं नाही. मी वक्तशीरपणे सेंटरला जायचो. निळ्या, लाल पेनच्या साहाय्याने सुवाच्च अक्षरातली माझी वही सगळेजण पाहायचे. त्या विषयाचं पुस्तक अवघड भाषेत असल्याने आम्ही विकत घेतलं नव्हतं. सेंटर सुटलं की वह्या सायकलच्या कॅरिअरला लावून आठ-दहा मित्रांच्या घोळक्‍यात घरी यायचो. त्या दिवशी आम्ही निघालो. घरी पोचलो. सायकल वाड्याच्या ओट्यावर टेकवली. वही काढण्यासाठी कॅरिअरला हात घातला. पाहतो तो काय... वही गायब...पोटात धस्स झालं. परीक्षा आठ दिवसांवर आलेली, आता करायचं काय... घाम पुसला आणि ज्या मित्राबरोबर आलो त्याच्या घरी गेलो. त्याला विचारलं, माझी वही पाहिली का...तो नाही म्हणाला. सेंटरला जाऊन आलो. वही सापडली नाही. वर्गात कुणीच काही बोलेना. माझी परिस्थिती पाहून एक मित्र घाबरत-घाबरत म्हणाला, ""तुझी वही वर्गातल्या त्या गुंड विद्यार्थ्याने मारलीय.'' शाळा सुटल्यावर मी त्याच्या घराच्या शोधात निघालो. शाळेत तो यायचाच नाही. गल्लीबोळ शोधत त्याच्या घरी गेलो तेव्हा रात्र झाली होती. त्याला हाक मारली. बऱ्याच वेळाने तो बाहेर आला. त्याने मलाच दम भरला. "काय रे इथं कशाला आलास. तुझ्या वहीशी मला काय घेणंय... तुला कोणी माझं नाव सांगितलं सांग. तंगडंच तोडतो त्याचं...परत माझ्या घरी फिरकायचं नाही..' गयावया करून सांगितलं, मी तुला अभ्यासात मदत करतो...वही दाखवतो...पण तो ऐकायलाच तयार नव्हता. निराश होऊन घरी परतलो.

घरी आल्यावर काहीच सुचेना. सारखी वही, त्यातली अक्षरं दिसायला लागली. वही रस्त्यात पडणं शक्‍यच नव्हतं आणि तो गुंड मित्र सेंटरलाही रोज येत नव्हता. त्याने वही चोरली हे नक्की होतं...पण मी काहीच करू शकत नव्हतो. रडायची वेळ आली होती. कारण मला अशा वेळी कोणी त्याची वही देणं शक्‍यच नव्हतं. हातात पुस्तक, वही नसल्याने वर्षच वाया जाण्याची भीती. आजपर्यंत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जाणारा मी केवळ अभ्यासाला काही नसल्याने नापास होणार होतो. एखाद्या मित्राची वही तासाभरासाठी घेऊन झेरॉक्‍स कॉपीज करून घेता आल्या असत्या, ती पण त्यावेळी सोय नव्हती. घरी सांगता पण येईना. निष्काळजीपणा म्हणून बोलणीच खावी लागली असती. मनाचा हिय्या करून वर्गातला ईश्‍वर मेहेरला म्हटलं, ""दोस्ता तुझी यंत्रशास्त्राची वही दोन दिवसांसाठी देतोस का प्लीज. जमेल तेवढं लिहून काढतो.'' तो हसला, ""वेडा आहेस का? दोनशे पानं, आकृत्या कसं लिहिणार? माझा रडकुंडीला आलेला चेहरा पाहून तो म्हणाला, ""बरं देतो. पण दोनच दिवस. हरवलीस तर याद राख.'' मी अधाशासारखी वही घेतली. छातीशी धरून घरी आलो. नव्या वहीत पहिल्या पानापासून लिहायला सुरवात केली. दिवस-रात्र लिहिले. दुसऱ्या दिवशी शाळेला दांडी मारली. लिहून लिहून हात दुखायला लागले. हात सुजायला लागला. इलाज नव्हता...दोन दिवसांत संपूर्ण वही कशीबशी लिहून काढली. कुठे ती माझी सुवाच्च छान अक्षरातली वही आणि कुठे ही...जीवात जीव आला. ईश्‍वरला वही देत म्हटलं, ""मित्रा, तू ईश्‍वरासारखा धावून आलास. परीक्षेत सत्तर टक्के (तेव्हाचे!) मार्क मिळवून मी टेक्‍निकल विषयात पास झालो. नुकतेच आमच्या बॅचचे गेट टुगेदर झाले तेव्हा ईश्‍वर भेटला, त्याला ही घटना सांगितली. तो विसरून गेला होता. आमचा तो गुंड मित्र भेटला नाही...मी मात्र ही घटना कधीच विसरू शकत नाही!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sadanand bhange write article in muktapeeth