मुलगी निघाली...

सदानंद झिलबा परब
शनिवार, 9 मार्च 2019

एकीकडे आजीची ओढ होती. पहिलीतील मुलगी गाडीत बसून एकटीच पुण्याहून कोकणात मालवणला जायला निघाली. पण...

एकीकडे आजीची ओढ होती. पहिलीतील मुलगी गाडीत बसून एकटीच पुण्याहून कोकणात मालवणला जायला निघाली. पण...

सैनिकी सेवेत असताना तीन वर्षांसाठी पुण्यात बदली होऊन आलो होतो. पाच-सहा महिन्यांनंतर "फॅमिली क्वार्टर' मिळाले. मग आमचे बिऱ्हाड पुण्यात मुलांसोबत हजर झाले. मला तीन अपत्ये. एक मुलगा, दोन मुली. मोठी मुलगी पहिलीत शिकत होती. तिला आजीचा फार लळा. तिला नेहमीच आजीची आठवण येत असे. "आपण आजीकडे घरी जाऊया' अशी तिची सतत भुणभूण असे. एक दिवस कामावरून घरी आलो तर सौभाग्यवतीची तक्रार "अहो! तुमचे कन्यारत्न हट्ट करतेय! आज जेवलीही नाही.' जवळ बोलावले, समजावले तरी ढिम्म-आताच्या आत्ता हाच हेका कायम. बायकोला म्हणालो, ""तिला सांग, एकटी जावे लागेल. मला रजा मिळणार नाही.'' पण ती बधली नाही. "होय, मी एकटीच जाईन', म्हणाली. मग काय ताबडतोब सगळी बांधाबांध झाली. पिशवीत कपडे भरले. वाटेत खाण्यासाठी दिले, आईच्या पाया पडली, भावंडांना टाटा म्हणून पिशवी सायकलला अडकवून आम्ही महात्मा गांधी बसस्थानकावर आलो.

बसमध्ये बसलो. कंडक्‍टर भाऊ आले. त्यांना मी हळूच डोळा मारून सांगितले, "ही माझी मुलगी, तिला आजीकडे जायचेय. मला रजा नाही. मला मालवणचे एक तिकीट द्या आणि तिला तिथे उतरवा. तिची आजी तिला घ्यायला येईल.' पैसे दिले. कंडक्‍टरने पण तिकीट म्हणून मधला पेपर फाडून दिला. म्हणाला, ""काळजी नको. गाडी सुरू होईल आता. तुम्ही खाली उतरा.'' मी तिला जवळ घेऊन पत्र पाठविण्याविषयी सूचना दिल्या आणि खाली उतरलो. बसचे इंजिन सुरू झाले. ड्रायव्हरने गाडी थोडी हलवली. कंडक्‍टरने घंटा वाजवल्याबरोबर गाडी हालली. आणि ""अहो बाबा!'' असा टाहो मोठ्याने ऐकला. बस थांबली, मुलगी खूप वेगात पळत आली व पायाला मिठी मारून मुसमुसून रडू लागली. काही क्षण भारावलेले गेले. मग विचारले, "अगं, तुला आजीकडे जायचे होते ना?' थरथरत म्हणाली, "नको, माझ्या आईकडे घेऊन चला.' आजही मी माझ्या नातीला तिच्या आईची ही गोष्ट सांगतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sadanand parab write article in muktapeeth