माझ्या बॅगेत स्फोटके

सदाशिव लाळे
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

विमानाला उशीर होता. विमानतळावर मस्त भटकत होतो. एवढ्यात मला बोलावण्यात आले. माझ्या बॅगेत स्फोटके असल्याचा संशय तपासनिसांना आला होता. बॅग स्कॅन करताना आत काहीतरी संशयास्पद दिसले होते.

विमानाला उशीर होता. विमानतळावर मस्त भटकत होतो. एवढ्यात मला बोलावण्यात आले. माझ्या बॅगेत स्फोटके असल्याचा संशय तपासनिसांना आला होता. बॅग स्कॅन करताना आत काहीतरी संशयास्पद दिसले होते.

झाली आता पाच वर्षे. दरवर्षी माझी नात ईरा हिच्या वाढदिवसाला सिंगापूरला जात असतो. या वेळी माझ्याबरोबर माझा साडू प्रमोद बेके येणार होता. त्याला बोलता येत नाही; पण माणूस दिलखुलास. त्याचीही मुलगी सिंगापूरला होती. मुंबईतून रात्रीचे विमान होते. म्हणून दुपारी अडीच- तीनला निघायचे ठरले. पण सकाळी अकरालाच निरोप आला. विमानतळावर टर्मिनल दोनचे उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते असल्याने विमानतळावर गर्दी होईल.

निघालो घरातून, गाडी जेमतेम पन्नासच्या वेगाने चालली होती. विमानतळावर पोचायला साडेसात वाजले. नऊ वाजता रिपोर्टिंग होते. पासपोर्ट, व्हिसा दाखवून विमानतळावर प्रवेश केला. सवयीप्रमाणे नोटीस बोर्ड पाहिला. विमानाला रात्री दोन वाजेपर्यंत उशीर! विमान लेट आहे हे घरी कळवावयास हवे होते. मोबाईल लावला तर माझा फोन बंद पडलेला. पब्लिक फोन शोधला, कुठेच सापडेना. "एअर इंडिया'च्या एका मुलीने सुचवल्यानुसार व्यवस्थापकांच्या केबीनमधून फोन केला. एका जावयाचा फोन लागेना. दुसऱ्या जावयाने विमानाला उशीर झाल्याची नेटवरून आधीच माहिती घेतली होती. माझा मोबाईल बंद पडला आहे असे सांगितल्यावर तो म्हणाला, ""मोबाईल बंद करा आणि चालू करा.'' आपले एक अज्ञान उघड झाले.

जुन्या टर्मिनलवर खूप गर्दी होती. बसायला देखील जागा नव्हती. रात्रीचे दहा वाजले, चौकशी केली. चेकिंग सुरू झाले होते. चला, निदान सामान तरी जाईल. नातीच्या वाढदिवसामुळे वजन जरा जास्त होते. काही गोष्टी साडूच्या बॅगमध्ये टाकल्या होत्या. दोघांचे मिळून वजन एकाचवेळी करावयास सांगितले, तरीही वजन जास्त झाले. ""तुम्हाला अधिक पैसे भरावे लागतील,'' बेल्टवरच्या मुलीने सांगितले. तिला माझा "फ्रिक्वेंट फ्लायर नंबर' दिला. सर्व सामान गेले एकदाचे. केबीन बॅगसुद्धा जवळ ठेवली नाही.

प्रमोद पहिल्यांदाच परदेशी जात होता. रात्रीचे साडेअकराच वाजले होते. वेळ खूप होता. त्याच्याबरोबर विमानतळ पाहायला निघालो. फिरता फिरता एक उद्‌घोषणा कानावर आली. "सदाशिव लाळे ट्रॅव्हलिंग टू सिंगापूर बाय एअर इंडिया फ्लाइट नंबर सो अँड सो रिपोर्ट टू गेट नंबर सिक्‍स.' मला वाटले, आपल्या ऐकण्यात काहीतरी चूक झाली असेल. आम्ही तसेच पुढे निघालो. परत काही वेळाने तीच उद्‌घोषणा. मनात आले काहीतरी गडबड आहे. गेटवर गेलो. तिथे संजय नावाची व्यक्ती माझीच वाट पाहात थांबली होती. जाताच त्यांनी मला पासपोर्ट, बोर्डिंग पास मागितला व म्हणाला, ""चला माझ्याबरोबर.'' प्रमोदला गेटवरच थांबावयास सांगितले. चालता चालता संजयला विचारले, ""काय झाले?'' ""तुमच्या बॅगमध्ये काहीतरी सापडले आहे.'' ""काहीतरी म्हणजे काय?'' त्याने सांगितले, ""बॅगेमध्ये लिक्विड किंवा स्फोटके स्कॅन करताना दिसली असतील.'' मी आठवू लागलो, काय झाले असावे! मी बरोबर शीतपेय घेतले होते. मगाशी ते प्रमोदच्या बॅगेमध्ये टाकले होते आणि बॅगेला कुलूप लावले नव्हते. म्हणजे बॅगेमध्ये स्फोटके! संपूर्ण वातानुकूलित विमानतळावर मला दरदरून घाम फुटला. सिक्‍युरिटी केबिनमध्ये घेऊन गेला. आता माझ्या पुढे आणि मागे बंदूकधारी शिपाई. मला भयंकर भीती वाटत होती.

विमानतळावर आमची वरात सुरू. एका लिफ्टमधून मला पार खाली नेण्यात आले. तिथे विमानात सामान भरण्याची गडबड चालू होती. मला तिथल्या खोलीत नेण्यात आले. खोलीत समोर संगणक होता. माझी बॅग आणि संगणकाच्या पडद्यावर स्कॅन केलेल्या बॅगचे चित्र. तेथील अधिकाऱ्याने माझे नाव, पत्ता विचारला आणि बॅगमध्ये हे लांब दांडके काय आहे असे विचारले. बॅग उघडून दाखविण्यास सांगितले. मी बॅग उघडली. एवढ्या मानसिक दबावातही मला किंचित हसू आले. ""सर हे बर्थडे प्रोपर म्हणजे बर्थडे विश केल्यावर ओपन केले की यातून रंगीत कागदाचे बारीक बारीक तुकडे हवेत उडतात ते आहे.'' अधिकारी म्हणाले, ""याचा आवाज होतो का?'' "हो.' त्यांनी मला ते काढून टाकण्यास सांगितले. मी ते काढून टाकले. ""तुम्ही गेलात तर चालेल.'' मनावरचा ताण नाहीसा झाला. संजूबरोबर परत माघारी.

तोपर्यंत काहीतरी सापडल्याची बातमी संपूर्ण विमानतळावर पोचली होती. वाटेत बऱ्याच जणांनी विचारले, संजू क्‍या मिला, संजू क्‍या मिला? संजू बोलताही रहा, "कुछ भी नही यार, पार्टी आयटम था.' माझा पासपोर्ट, बोर्डिंग पास सारे परत मिळाले. या गोष्टी पूर्ण होत दीड तासाहून अधिक वेळ गेला. मनात प्रमोदची काळजी होती. एक बरे की तो एकाच ठिकाणी बसून होता. झालेला हा प्रकार मनमोकळेपणाने ऐकून घेणारेही कोणी जवळ नव्हते. कारण सर्व घटना प्रमोदला त्याच्या भाषेत मी सांगू शकत नव्हतो. धास्तावलेल्या मनाला शांतता मिळाल्याने विमानात शांत झोप लागली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sadashiv lale write article in muktapeeth