दिशा अंधारल्या जरी

किशोर कवठे kavathekishor@gmail.com भ्र – ९४२०८६९७६८
Thursday, 15 October 2020

रेल्‍वेब्रीजवर बराच वेळ बसलो . आवागमन करणा-या सुपरफास्‍ट गाड्यांतील माणसांना उगाच हात वर अभिवादन करू लागलो. रेल्‍वेच्‍या आजूबाजूला कडूनिंबाची महाकाय झाडं. सायंकाळी पक्ष्‍यांचा गलका रोजचाच... सूर्य मावळतीला आला की, पाखरांची शाळा तिथेच भरायची. त्‍यांच्‍या आवाजांनी गाव जिवंत व्‍हायचं. एकदा निसर्गाची ऊर्जा अंगात भरून घेतली की, पावलं आपसूकच परतीच्‍या प्रवासाला लागायची.

दुपारचं उन्‍ह अधि‍कच तापायला लागलं होतं. रस्‍त्‍यांवरील वर्दळ कमी झाली होती. एक चिमणी उगाच चिवचिवाट करून दुपारचा एकांतवास भंग करीत होती. लांबपर्यंत रस्‍ता सामसूम झाला होता. अधेमधे मुलांच्‍या खेळण्‍याचा आवाज येत होता. घरातील चार भिंतीत श्‍वास कोंडत चालला होता. म्‍हणून, माझी पावलं रेल्‍वेस्‍टेशनच्‍या दिशेने, प्रवासी गाड्या बघण्याकरिता बाहेर पडली. तेव्‍हा, अचानक माझी भेट बजरंगशी घडली. शाळेच्‍या दोन मुलांना तो दवाखान्‍यात घेऊन आला होता. मी त्‍याच्‍याशी संक्षिप्‍त संवाद साधून, पुढच्‍या भटकंतीकडे वळलो.

रेल्‍वेब्रीजवर बराच वेळ बसलो . आवागमन करणा-या सुपरफास्‍ट गाड्यांतील माणसांना उगाच हात वर अभिवादन करू लागलो. रेल्‍वेच्‍या आजूबाजूला कडूनिंबाची महाकाय झाडं. सायंकाळी पक्ष्‍यांचा गलका रोजचाच... सूर्य मावळतीला आला की, पाखरांची शाळा तिथेच भरायची. त्‍यांच्‍या आवाजांनी गाव जिवंत व्‍हायचं. एकदा निसर्गाची ऊर्जा अंगात भरून घेतली की, पावलं आपसूकच परतीच्‍या प्रवासाला लागायची.

दिवसभरातील आठवांचा गुंता सैल करताना, रात्रीच्या काळोखात सतत बजरंग आणि त्‍याची शाळा डोळ्यांसमोर पिंगा घालत होती. बजरंग जेनेकर अनुदानित आदिवासी आश्रमशाळा, सिंधी येथील शिक्षक. शेतीत राबत उद्ध्वस्त झालेल्या अनेक पिढ्यांचा तो एक वारसदार. बजरंगमधील सामाजिक जाणिवेची दखल घेऊन एका संस्‍थेने त्याला शिक्षक म्‍हणून रुजू करून घेतले. ज्‍यांना जगाच्‍या दूषीत व्‍यवहाराचे गणित कळत नाही, अशांना खाजगी आश्रमशाळा चालवणे खूप कठीण जात असते.

शाळेपासून दिड-दोनशे किमी अंतरावरील आदिवासी मुलं आणायची, त्‍यांचे पोटच्‍या लेकरांप्रमाणे पालनपोषण करायचे. हे आश्रमशाळेच्या शिक्षकांनी घेतलेले व्रतच. बजरंगने बराच काळ विनावेतनाशिवाय घालवला. शाळा सोडून पुन्‍हा शेतीची कास धरावी असा विचार त्‍याच्या मनात अनेकदा डोकावला. पण, आदिमांच्या मुलांचे आयुष्य घडवतो आहे, म्हणून त्याच्यातील स्वहिताचा विचार गळून पडला. शाळेला अनुदान प्राप्त झाले तेव्‍हा, संस्‍थेने संपूर्ण जबाबदारी त्‍याच्‍या खांद्यावर टाकली.

काही काळाच्या अंतराने, पटसंख्‍येचा निकष पूर्ण न होऊ शकल्यामुळे शासनाने अनुदान देणे थांबवले. पगार नसल्याने मुलांच्‍या संगोपनाचा प्रश्‍न उपस्थित झाला. शाळेतील इतरही शिक्षक सर्वसामान्‍य शेतकरी कुटुंबातून आलेले. शेवटी त्‍याने आपल्‍या पत्‍नीचे सोने गहाण ठेवून मुलांच्या मुखी घास भरविला.

एक प्रसंग आठवतो, संध्‍याकाळच्‍या भाजीला तेल नाही असा निरोप स्‍वयंपाक्याने त्याला कळवला. तेव्‍हा त्‍याने आपल्‍या घरी नुकताच आणलेला किराणा शाळेच्या स्वयंपाकगृहात आणून टाकला. खरं तर घरच्या माऊलीची काय अवस्था झाली असेल? त्या सर्व भावना अव्यक्तच... मध्यंतरी शिक्षक समायोजनाची झळ त्यालाही सोसावी लागली. परिस्थितीने त्‍याला लढण्‍याचे सामर्थ्‍य दिले. मुलांत मिसळून त्‍यांच्‍या भावविश्‍वात रममाण होणे त्याला फार आवडते. आता तर वसतिगृहाचे अनुदान न घेता त्यांच्या शाळेतील शिक्षक एक महिन्‍याचा पगार शाळेला देतात आणि संस्‍था चालवितात.

शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी बजरंग संघटनात्मक काम करतो. कर्मचा-यांची चूल पेटली पाहिजे, म्हणून शासकीय यंत्रणेविरुद्ध सन्मार्गाने आंदोलन उभे करतो. इतरांच्या मदतीला सतत धावून जात असल्याने ‘बजरंगी भाईजान’ अशी त्याची नवी ओळख निर्माण झाली आहे.

भविष्‍यातील सामाजिक वाटचाल समकालातील बालकांच्‍या भावविश्‍वावर अवलंबून असते. शिक्षणापासून वंचित असणा-या बालकांचा शोध घेऊन शिक्षणाच्‍या मूळ प्रवाहात आणणे तसे अत्‍यंत जिकरीचे काम. आपल्या देशाची प्रचंड लोकसंख्‍या विकासाला मारक ठरत आहे. तरी पण काही माणसांनी घेतलेला वसा सर्वांना प्रेरणा देणारा आहे. प्रसेनजित गायकवाड असेच एका ध्‍येयवेड्या कवी मनाच्‍या शिक्षकाचे काम वाखाणण्‍याजोगे आहे. ते सध्या जि. प. प्राथ. शाळा, सिल्‍लेवार ता. सावनेर जि. नागपूर येथे कार्यरत आहेत. ख-या अर्थाने ते सामाजिक शिक्षक आहेत.

बालकांचे जग जाणून घेण्‍यासाठी शिक्षक आणि पालकांच्‍या शिबीरांचे आयोजन करतात. मध्‍यंतरी ‘रचना’ नावाचे बाल मासिकही त्यांनी सुरू केले होते. साहित्‍याच्‍या प्रांतात त्‍यांचे नाव अत्‍यंत आदराने घेतले जाते. समाजातील वंचित घटकांसाठी त्‍यांच्‍या अंतरंगातील दरवाजे सताड उघडे असतात. भाषाशास्त्राचे सखोल ज्ञान, चिंतनशील विचार, करुणाशील स्वभाव ही आणखी काही वैशिष्ट्ये त्यांची सांगता येतील.

बालकामगार, रस्त्यांवरील मुले, वेश्यांची मुले, ऊसतोड कामगार, वीटभटटी मजूर, दगडखाण मजूर, ‍मुस्लिम वस्त्यांतली मुलं, भटक्याविमुक्तांची मुलं अशा शेकडो शाळाबाहय मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम प्रसेनजित गायकवाड सातत्याने करीत असतात. समाजाच्या संवेदनांवर साहित्याच्या माध्यमातून भाष्य व्यक्त करणारे अनेक प्रतिभावंत बघितले, पण प्रत्यक्ष संवेदना जपणारा आणि जगणारा साहित्यिक सापडणे कठीणच. ख-या अर्थाने ते ‘बालरक्षक’ आहेत.

प्रसेनजितरावांच्या कामाची दखल घेऊन माजी शिक्षण सचिव नंदकुमार यांनी ‘बालरक्षक’ अभियानाला सुरुवात केली. आजवर त्यांनी ११० मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. शिक्षणासोबतच त्यांचे सामाजिक कार्यही प्रेरणा देणारे आहे. जाती अंताच्या लढाईतील ते सुधारणावादी लेखक म्हणून जबाबदारी पार पाडतात.

जिथे रुसले अक्षर
तिथे घडावी कहाणी
शब्दे आकाश पेलून
लिहू काळजाची गाणी.
देह झिजवला ज्यांनी
त्यांचा लाभावा सुगंध
आपुल्याही देहामधी
असा संचारावा छंद.
दिशा अंधारल्या जरी
मावळेल काळरात
याच आशेच्या निर्धारे
जपू मनी सांजवात.

प्रत्येकाच्या आयुष्याला आकार द्यायला काळाच्या थांब्यावर बजरंग आणि प्रसेनजित सारखी माणसं अजूनही ‍आहेत. म्हणून, बालकांच्या मनातील आनंद फुलपाखरांसारखा सर्वत्र विहार करतो आहे. शाळेच्या भिंती शाबूत राहिल्या पाहिजे, पटांगण मुलांच्या सहवासाने गंधीत झाले पाहिजे, यासाठी किती शिक्षक धडपडतात?... हा प्रश्न तसा चिंतनाचाच. कर्तव्य म्हणून बजावत असलेल्या जबाबदारीला माणूसकीचे अनेक प्रवाह येऊन मिसळतात.

सागरासारखी नम्रतेची उंची गाठली की, विस्तीर्ण पसरलेले आभाळही अशांना सलाम करते. समाजाचा शिक्षकांकडे बघण्‍याचा दृष्‍टीकोन सध्‍यातरी बदलत चालला आहे. मध्‍यमवर्गीय कुटुंबातून संघर्षाचा पाढा घोकत वर आलेले शिक्षक समकालाचे चित्र अधिक आशावादी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही शिक्षक प्रसिद्धी माध्‍यमांच्‍या दूर राहून वर्तमानातील अंधकार दूर सारण्‍यात धन्यता मानतात. अशा कर्तव्यशील शिक्षकांनी साने गुरुजी, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार स्वकृतितून जिवंत ठेवले आहेत. अभावाचा अंधकार मिटवताना त्‍यांच्यातील सच्‍चा माणूस अधिक तेजोमय होत गेला. दिशांत अंधार पसरला तरी, अशी माणसे ज्ञानाचा प्रकाश सृजन कळ्यांपर्यंत घेऊन जातात. म्हणूनच, काळ आणि माणसं बदलण्याची भीती समाजाच्या मनातून केव्हाच गळून पडलेली असते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salute to social worker