सुरक्षित भारत

संगीता विनायक घैसास
बुधवार, 6 मार्च 2019

मध्यरात्रीनंतर अनोळखी शहरात उतरलो होतो. मनात भीतीची भिंत उभी. पण त्या भिंतीपार जायचा विश्‍वासही मिळाला.

मध्यरात्रीनंतर अनोळखी शहरात उतरलो होतो. मनात भीतीची भिंत उभी. पण त्या भिंतीपार जायचा विश्‍वासही मिळाला.

काही घटना माणूस आयुष्यभर विसरत नाही. त्या कायमच्या मनामध्ये राहतात. बरीच वर्षे झाली. मी आणि माझे पती आमच्या लग्नानंतर बंगलोरला फिरावयास गेलो होतो. तिथून आम्ही तीन दिवसांसाठी जवळच्या स्थळांना भेट द्यायला गेलो होतो. आमची सहल पूर्ण झाल्यावर परत बंगळूरला येताना मध्यरात्र उलटून गेलेली. शहर नवीन आणि भाषा समजत नव्हती. त्यामुळे आमची पंचाईत झाली. पण स्टॅण्डवर तरी कसे आणि किती वेळ थांबणार? तेथे आम्ही दोघांनीच थांबणे योग्य वाटत नव्हते म्हणून रिक्षा करून हॉटेलवर निघालो. थोडे अंतर गेल्यावर रिक्षा बंद पडली, रस्ता सुनसान होता. आता काय करायचे, असा मोठा प्रश्न पडला. रिक्षावाला उतरून बाहेर आला आणि सीटखाली कुठले तरी बटण होते, तिथे काहीतरी करायला लागला. भीती आणखीनच वाढली. पण त्याने खूप खटपट करून रिक्षा चालू केली आणि आम्हाला सुरक्षित हॉटेलवर सोडले. रिक्षावाल्याचे मनोमन आभार मानले. खात्री पटली, की माझा भारत सुरक्षित आहे व माणुसकीही शिल्लक आहे.

पुढे एकदा मी, माझे पती आणि आमची मुलगी असे तिघे दिल्लीला गेलो होतो. आग्र्याचा ताजमहाल बघून दिल्लीला येईपर्यंत मध्यरात्र उलटलेली. माझ्या मनावर खूप ताण आला. आपली तरुण मुलगी आपल्या सोबत आहे. शहर खूप मोठे आणि अनोळखी आहे. आता या बसने आपल्याला वाटेत कुठेतरी उतरवले तर कसे जाणार आपण हॉटेलवर? बस ड्राइव्हरने आम्हाला आमच्या हॉटेलपासून थोड्या अंतरावर सोडले. खूप घाबरत घाबरतच उतरलो. पर्याय नव्हता. मध्यरात्री त्या सुनसान रस्त्यावरून हॉटेलकडे चालायला लागलो. काही अंतरावरच खूप मोठी पोलिस फौज उभी दिसली. पोलिस पाहताच धीर आला. मग असे वाटलेच नाही की आपण मध्यरात्री रस्त्यावर आहोत. आम्ही अगदी आरामशीर चालत हॉटेलवर गेलो. परत एकदा प्रत्यय आला, की माझा भारत सुरक्षित आहे. मला माझ्या देशाचा अभिमान वाटला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sangita ghaisas write article in muktapeeth