बोला, अमृत बोला!

अविनाश भिडे
Friday, 6 December 2019

आपले बोलणे मधुर असावे. अगदी दुसऱ्याला त्याची चूक दाखवतानाही वाईट शब्दांचा वापर टाळायला हवा.

आपले बोलणे मधुर असावे. अगदी दुसऱ्याला त्याची चूक दाखवतानाही वाईट शब्दांचा वापर टाळायला हवा.

बऱ्याच दिवसांनी ऐकले, ‘बोला, अमृत बोला’. ज्योत्स्ना भोळे यांच्या आवाजात वेगळ्याच प्रकारचे माधुर्य होते. आता ते ऐकताना माझे डोळे भरून आले. मला माझ्या आईची फार आठवण आली. गाणे ऐकताना नकळत मी आईच्या फोटोसमोर उभा राहिलो. संपूर्ण गाणे आईच्या स्मृतीला ऐकवले जणू. हे गाणे आईचे अत्यंत आवडीचे होते. आईच्या वाणीतही कायम अमृत असे. जरा मोठा झाल्यावर मी तिला एकदा विचारले, की ‘शुभ समयाला बोल बोला, अमृत बोला’ असे का म्हटले आहे? आईने समजावून सांगितले होते, ‘‘अरे, परमेश्‍वराने जो काही समय दिला आहे, तो सारा शुभ समयच आहे. म्हणजेच सदैव अमृत बोला.’’ ते आईचे सांगणे अजूनही माझ्या मनावर कोरून राहिले आहे.

मी आईच्या फोटोसमोर उभा राहून तिला तिच्या आवडीचे गाणे ऐकविण्यात काही वेडेपणा तर करीत नाही ना, असे मला क्षणभर वाटून गेले. पण फोटोतही आईच्या चेहऱ्यावर असलेली प्रसन्नता पाहून माझ्या मनातले विचार पळून गेले आणि माझ्या डोळ्यात आलेले अश्रू मी तसेच वाहू दिले. तेवढ्यात मला आईचे शब्द पुन्हा आठवले, ‘अरे सार्थ अश्रू येणे यात काही चूक नाही. आयुष्यात अश्रू येण्याचे, वाईट वाटण्याचे अनेक प्रसंग वेळोवेळी येतील. पण, मनाने नेहमीच खंबीर राहणे आवश्‍यक आहे. कारण आपण योग्य शब्द वापरून दुसऱ्याचे दुःख कमी करण्याचे प्रयत्न करतो. त्यांना ते शब्द अमृताचेच वाटतात. त्याचबरोबर एक लक्षात ठेव, की अगदी कर्तव्यकठोर निर्णय घेताना जेव्हा आपल्याला दुसऱ्या कोणाला काही सांगण्याची गरज पडते. तेव्हासुद्धा अमृतासारखे बोल वापरून तीच समज देता येते. वाईट तऱ्हेच्या शब्दांचा आधार घेण्याची गरज पडत नसते.’

आईचे ते बोल माझ्याकरिता अगदी अमृताचे बोल होते. त्यानुसार वागण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न मी करत आहे. प्रसंगी राग येऊन तोल जातो, तेव्हा मला ऐकू येते, ‘बोला, अमृत बोला!’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saptarang mohan deshmukh write avinash bhide