भिंतीबाहेरची शाळा

open air school.j
open air school.j

भारतीय शिक्षणपद्धतीची मुळात सुरुवातच भिंतीबाहेरील शाळेने झाली. प्राचीन काळी गुरुकुल असायचे. त्यावेळी निसर्गाच्या सान्निध्यात राहून गुरूच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी शिक्षण घेत असत. भारतीय शिक्षण पद्धती खरेतर संपूर्ण जगाला दिशा देणारी अशी पद्धती होती. इतिहास चाळून पाहिला तर नालंदा, तक्षशिला सारखी विद्यापीठे भारतीय विद्यार्थ्यांसोबतच इतर देशातील विद्यार्थ्यांनाही ज्ञानदानाचे कार्य करीत होती. नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोर यांनीही हाच धागा पकडून शांतिनिकेतनची स्थापना केली होती. काळ बदलत गेला आणि चार भिंतीच्या पल्याड असलेले शिक्षण चार भिंतीत बंदिस्त झाले आणि भिंतीबाहेरची शाळा एक स्वप्न बनून राहिले. मुले आपल्याकडे जेव्हा ज्ञानार्जनासाठी येतात तेव्हा त्यांना ही बंदिस्त शाळा खरेच किती आवडत असेल याचा आपण कधी विचार केला आहे का ?? घरी उन्मुक्तपणे बागडणाऱ्या मुलांना शाळेत आल्यावर मात्र या बंदिस्त वातावरणात शिकायला भाग पाडले जाते.

काही उपक्रमशील शिक्षक बालकांची ही मनाची घालमेल ओळखून त्यांना भिंतीबाहेरची शाळा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतात. यातील काही शाळा बघण्याचा योग आला. शाळेच्या वर्गखोली बाहेर फुलवलेले उद्यान, लावलेली झाडे, मऊशार गवत आणि सोबतीला फळा. इयत्ता पहिल्या वर्गात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना याचे किती कुतूहल असते. याच वातावरणात आधी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात करून नंतर विद्यार्थी मानसिकरित्या तयार झाले की मग त्यांना वर्गखोलीत बसवण्याची पद्धत. खरेतर बाल मानसशास्त्राचा विचार करून आखलेली ही योजना नक्कीच विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावणारी अशी आहे. मान्य आहे आज जिथे दहा बाय दहा फुटांच्या खोलीला वर्गखोलीचे रूप देऊन चालणाऱ्या शाळांच्या काळात ही भिंतीबाहेरची शाळा उदयास येणे जरा कठीणच आहे. ग्रामीण भागात मात्र आजही बऱ्याचशा शाळांना मोठे आवार उपलब्ध आहेत अशा ठिकाणी या भिंतीबाहेरील शाळा विकसित होऊ शकतात. मात्र, तशी इच्छाशक्ती आणि बाग फुलवण्यासाठी आधी आमच्या शिक्षकांच्या नजरेत वसंत असणे आवश्यक आहे. केवळ शिक्षक नव्हे तर गावकरी मंडळींची जोवर साथ लाभत नाही तोवर हे शक्य नाही.

बऱ्याच ठिकाणी आजही शाळा लोकांना आपलीशी का वाटत नाही हा शोधाचा विषय आहे. मंदिराची निगा आणि सेवा करणारे गावकरी शाळेच्या बाबतीत जरा उदासीनच दिसतात. व्हॉटस् अॅपवर उन्हाळ्याच्या सुट्यांत लावलेली झाडे जगवण्यासाठी स्वतःच्या चारचाकी वाहनातून पाणी घेऊन जाणारे शिक्षकांचे फोटो पाहिले की त्यांना सॅल्यूट करावासा वाटतो. बऱ्याच ठिकाणी शाळा सुटल्यानंतर ते आवार हे अशा काही सार्वजनिक पद्धतीने वापरले जाते की त्याची निगा राखणे तर दूरच राहिले उलटपक्षी शाळेच्या वेळेत केलेल्या शिक्षकांच्या मेहनतीवर पाणी फिरवण्याचे प्रकार जास्त होतात. सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र, शाळेच्या बाबतीत हा विचार करायला कोणीही तयार नाहीत. त्यामुळे शाळेच्या आवारात गुरे ढोरे बांधणारे किंवा शाळेच्या भिंतीला लागूनच खताचा खड्डा तयार करणारे गावकरी पाहिले की वाईट वाटते. शिक्षणाच्या पद्धती बदलत गेल्यात. शिक्षणात नवनवीन प्रयोग होत गेलेत. विद्यार्थ्यांना शिकवणे ही शिक्षकांची भूमिका कालबाह्य झाली आणि विद्यार्थ्यांना शिकण्यास साहाय्य करणे अशी नवी भूमिका शिक्षकांची उदयास आली. या नव्या भूमिकेतून शिक्षण ही प्रक्रिया राबवत असताना विद्यार्थ्यांना वर्गखोलीबाहेरचे जर धडे द्यायचे असतील तर भिंतीबाहेरची शाळा ज्या-ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे त्याठिकाणी उदयास यायला हव्यात. मध्यंतरी परसबागसारखे उपक्रम शाळांमधून राबवण्याचे प्रयोग झाले. परंतु, त्यांचीही यशस्विता काही टक्क्याच्या पुढे जाऊ शकली नाही.

विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणात आपण निसर्गप्रेम शिकवतो. पण हे केवळ तोंडी आणि पुस्तकातील चित्रांच्या आधारे रुजणारे मूल्य नाही. त्यासाठी त्याला निसर्गाचे सांनिध्य उपलब्ध करून द्यावे लागेल. आपल्या घरी विविध कुंड्यामध्ये बाग फुलवणाऱ्या शिक्षकांना यासाठी परिश्रम घ्यावे लागतील आणि त्याला तेवढीच ग्रामस्थांची साथ लागेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेने शिकू द्यायचे आहे, त्यांच्या तयारीनुसार आणि अवगत करण्याच्या क्षमतेनुसार त्यांच्या परीक्षा घ्यायच्या आहेत इतकी मुभा आणि लवचिकता आज शिक्षणप्रणालीने बहाल केली आहे. टाईमटेबल नको, विषयांची तासवार विभागणी नको, आवडीनुसार विषयांची निवड असा फॉरमॅट असलेली हॅपी शाळा चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात आहे. अशा आनंददायी शाळा बोटावर मोजण्याइतपत आहेत ही खरी खंत आहे. केवळ १० ते ५ असा विचार करणारी शिक्षक मंडळी इतर गोष्टींना भानगडी समजून स्वतःमागे कुठलेही काम लावून घेत नाही. काहीही नावीन्यपूर्ण करायचा मुद्दा आला की ग्रामस्थांचे सहकार्य लाभत नाही अशी शिक्षकांची अरड असते. पण ही परिस्थिती सदा सर्वकाळ नसते. कारण त्याच गावात काही शिक्षकांनी त्यांच्या परिश्रमाने गावकऱ्यांची मने जिंकून बागा फुलवलेल्या असतात. दरवर्षी वृक्षारोपणाची शासकीय उद्दिष्ट्ये पूर्ण झाल्याचे अहवाल शाळांकडून जातात. मात्र, दरवर्षी त्याच खड्डयात नवीन रोप किंवा झाड लावण्याचा पंचवार्षिक कार्यक्रम अविरत चालू असतो.

रोपट्याची वाढ आणि मुलांचा विकास यांचा धागा खरेतर समान आहे. मुक्त वातवरणात झाड असो वा मूल त्यांची वाढ आणि विकास निकोप होते अन्यथा त्यांचा बोन्साय होतो. शिक्षणप्रणालीने बहाल केलेल्या लवचिकतेचा कुशलतेने वापर करायचा असेल तर जिथे जिथे शक्य आहे तिथे भिंतीबाहेरील शाळा अस्तित्वात येणे काळाची गरज आहे. केवळ लघुविश्रांती आणि दीर्घविश्रांती मध्ये बंदिस्त वर्गखोलीबाहेर येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मानसिकतेचा विचार करून नावीन्यपूर्ण वातावरण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. आज अभ्यासाच्या पारंपरिक ओझ्याखाली गुदमरत असलेल्या विद्यार्थ्यांना मोकळा श्वास देण्याची नितांत गरज आहे अन्यथा त्यांचा बोन्साय झाल्याशिवाय राहणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com