'ती'चे हस्तनैपुण्य

सीना गरसोळे
बुधवार, 12 डिसेंबर 2018

स्त्रियांची कर्तबगारी, हस्तकौशल्य सगळेच जाणतात. तिचे कौतुक नजरेत हवे. शब्दांत हवे.

स्त्रियांची कर्तबगारी, हस्तकौशल्य सगळेच जाणतात. तिचे कौतुक नजरेत हवे. शब्दांत हवे.

तिच्या हाताला किती छान चव आहे, प्रत्येक पदार्थ उत्कृष्ट. पदार्थ खाल्ला की तृप्त होतं. समाधान मिळते प्रत्येकाला. तिच्या हाताला किती छान वळण आहे, अक्षर कसे मोत्याच्या दाण्यांसारखे. तसेच चित्रकलाही तिची सफाईदार आहे. तिच्या हाताची कलाकुसर, भरतकाम, विणकाम अगदी फोटो काढण्यासारखे. आता हेच तिचे हात वेगवेगळ्या व्यवसायात गुंतले आहेत. ती स्कूटर, मोपेड, बाईकसारखी टू-व्हिलर तर चालवतेच; पण रेल्वे, मेट्रोसारखी वाहनेही जबाबदारीने चालवून-पेलवून दाखविते. घरच्या गाडीपासून शाळेच्या बसही तसेच रिक्षाही, वाहतुकीचे सर्व नियम पाळून चालविते. एवढेच नव्हे, तर विमान तसेच शिडाच्या बोटीही, सर्व तांत्रिक माहिती घेऊन सर्व सामर्थ्यानिशी चालविते. तिच्या या हाताने आभाळ पेलवताना प्रत्येक स्त्रियांचा अभिमान जागृत होतो आणि आदराने मान उंचावते. घरातली सर्व जबाबदारी उत्कृष्टपणे पेलूनही ती छोटे-मोठे व्यवसाय, छोटेसे दुकान चालविण्यापासून मोठ्या-मोठ्या यंत्रविभागाची कुशलतेने हाताळणी करते. बाहेरच्या ऑर्डर्स मिळवण्यापासून तिचे हात, भराभर पॅकिंग करून वेळच्यावेळी योग्य ठिकाणी ती पोचवण्याची वेळ पाळते.

तिचे हात सर्व खेळांमध्ये वाकबगार आहेत. क्रिकेटची उत्कृष्ट टीम व्यवस्थित हाताळून जिंकण्याची इच्छा बाळगून विजिगिषुवतीने करंडक, पदके पटकावते. वैयक्तिक किंवा दुहेरीत टेबलटेनिस, बॅडमिंटनसारखे खेळ खेळताना तिच्या हाताचे कसब दाखवते. सोन्या-चांदीसारख्या नाजूक वस्तू हाताळताना तिचे हात, मेणाहून मऊ होऊन, आपल्याला ते दागिने दाखवितात. बॅंकांची, हिशेबाची कोणतीही चूक न चुकता, कॉम्प्युटरवर बघून पटापट त्याच हातांनी करते, वेळ न लावता, ज्येष्ठ नागरिकांनाही मदतीचा हात पुढे करते. तिच्या ह्या अनेक कौशल्यपूर्ण, कसबामुळेच तिने पंतप्रधानपद, संरक्षणमंत्री, परराष्ट्र व्यवहारपद, तिन्ही दलांमधील पदे भूषविली आहेत. तिने हातावर कधी तुरी दिली नाही, तर हाथ की सफाई केली नाही, तसेच हातावर हात चोळत बसली नाही, नृत्यकलेतले हातांचे भाव दाखविले; पण कोणावर हात उगारला नाही, अनेक स्त्रियांचे हात मिळवून संघटन केले आणि प्रगतीचा मार्ग दाखविला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seena garsole write article in muktapeeth