मुले हरवली

शालिनी कृष्णराव बोराडे
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

शाळेची सहल गोव्यात गेली होती. पहिल्यांदा नादुरुस्त गाडीतील शिक्षक मागेच राहिले. तर नंतर परतीच्या मार्गावरच मुले हरवली. संपर्काची साधनेही नव्हती. अजून त्या आठवणीनेही काळजात धस्स होते.

शाळेची सहल गोव्यात गेली होती. पहिल्यांदा नादुरुस्त गाडीतील शिक्षक मागेच राहिले. तर नंतर परतीच्या मार्गावरच मुले हरवली. संपर्काची साधनेही नव्हती. अजून त्या आठवणीनेही काळजात धस्स होते.

दापोडीतील स्वामी विवेकानंद व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षिका होते. एकदा शाळेची सहल गोव्याला गेली होती. सहलीसाठी दोन मोठ्या गाड्या, शंभर विद्यार्थी, आठ शिक्षक, दोन सेवक असे निघालो. सकाळच्या प्रसन्न वातावरणात, छोट्यांच्या उत्साहाने वातावरण अगदी आनंदी होते. गाणी, नाच, विनोद, खाऊ खाणे, उड्या मारणे या सर्व गोष्टींमुळे मुले खूष होती. गाड्या एका मागे एक जात होत्या. सकाळी अकरानंतर गाड्यांमधले अंतर वाढू लागले. एक गाडी बऱ्याच अंतरावर पुढे गेली व दुसरी खूपच मागे राहिली.

दुपारचे बारा वाजून गेले होते. पुढची गाडी गाठण्यासाठी मागच्या गाडीच्या ड्रायव्हरने प्रयत्न केला. एवढ्यात त्या गाडीचा कोणता तरी पार्ट तुटत असल्याचा आवाज आला. गाडीतून वेगळा व काहीसा चमत्कारिक आवाज येताच ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. मोठ्या झाडाच्या आधाराने पटकन उभी केली. गाडीतून सर्वांना खाली उतरविले. नेमके काय झाले याचा ड्रायव्हरने अंदाज घेतला आणि तो तिथून जाणाऱ्या एका गाडीतून शेजारच्या गावी मेकॅनिक आणायला गेला. आता आम्हाला मोकळा वेळ होता. जवळच्या रिकाम्या शेतात झाडाखाली सावलीत बसून सर्वांनी डबे खाल्ले. ऊस, भुईमुगाच्या शेंगांचा आस्वाद घेतला. तोवर जवळच्या गावातून मेकॅनिक आणून ड्रायव्हरने गाडी दुरुस्त करून घेतली. आमच्या सहलीच्या पुढच्या प्रवासाला सुरवात झाली. रात्री आठच्या सुमारास आम्ही कोल्हापूरमधील विश्रांतीस्थळी पोचलो. आम्ही तेथे पोचेस्तोवर पुढे गेलेल्या शिक्षकांना काळजी लागून राहिली होती. आम्हाला उशीर का होतो, हे त्यांना कळत नव्हते. आम्हाला पाहताच त्यांना हायसे वाटले. मग सर्वांनी जेवण करून विश्रांती घेतली.

दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही गाड्या बरोबर राहतील याची दक्षता घेण्याचे ठरवले. रंकाळा तलाव पाहिला, अंबामातेचे दर्शन घेतले आणि गाड्या गोव्याच्या दिशेने धावू लागल्या. आमची गाडी दुरुस्तीनंतरही त्रास देतच होती. ती पूर्ण क्षमतेने धावू शकत नव्हतीच. पण मुले खूष होती. रस्त्यातील दिसतील ती प्रेक्षणीय स्थळे पाहात पुढे चाललो होतो. विद्यार्थी सहलीचा आनंद हसत, खेळत घेत होते. रात्री उशिरा गोव्यात मुक्कामाला पोचलो.

तिसऱ्या व चौथ्या दिवशी गोव्यातील समुद्र किनारे, वेगवेगळी मंदिरे, अनेक प्रेक्षणिय स्थळे पाहिली. समुद्र किनाऱ्यावर मुलांनी धम्माल केली. खाण्याची, खरेदीची मज्जा केली. बोटीचा प्रवास केला. पोहण्याची, वाळूचा किल्ला बनविण्याची मज्जा केली. पाचव्या दिवशी परतीच्या प्रवासास सुरवात झाली. संध्याकाळी पाच ते सहाच्या सुमारास लांजा घाटाच्या पायथ्याला पोचलो असता पुन्हा त्याच गाडीच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. मुलांना खाली उतरविले. काळोख वेगाने पसरू लागलेला. मुले घाबरू लागली. दुसऱ्या गाडीत दाटीवाटीत सर्व मुलांना बसवून काही शिक्षकांसह ती गाडी पुढे रत्नागिरीला रवाना केली.

पुन्हा गाडी दुरुस्त केली. इंजिनमध्ये पाणी भरले. ड्रायव्हरने सांगितले की, तुम्ही पाठीमागे जावून गाडीला धक्का मारा व पटकन गाडी सुरू होताच बसा, सर्वांनी धक्का मारताच गाडी सुरू झाली. ड्रायव्हरने मागे न पाहताच गाडी पुढे घेतली. धक्का मारणारे शिक्षक मागेच राहिले. काळा कुट्ट अंधार, हिंस्र श्‍वापदांचा, रातकिड्यांचा कर्कश आवाज, सर्वजण घाबरून येणाऱ्या गाड्यांना हात करू लागले. हातात दगड घेतल्याने इतरांना ते दरोडेखोर, चोर, लुटारू असे वाटू लागल्याने कोणीही गाडी थांबवत नव्हते. शेवटी एका पोलिस इन्स्पेक्‍टरची गाडी थांबली. त्यांना गाडीत बसविले, त्या शिक्षकांनी त्यांना आपली हकीकत सांगितली. त्यांनी त्यांना लांजा गावातील शाळेत सोडले. रात्री त्या सर्वांनी लांज्यातील शाळेत मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी रत्नागिरीकडे निघाले.

गाडी रात्रीच रत्नागिरीला पोचली आणि काही शिक्षक रस्त्यातच राहिल्याचे लक्षात आले. त्यांना शोधायला निघणार तोवर ते पोचले. दुपारी सर्वांनी रत्नागिरीच्या हॉटेलमध्ये जेवण घेतले. प्रवासाला सुरवात होताच दोन गाड्यांतील अंतर वाढले. दुसरी गाडी वरंधा घाटाच्या पायथ्याला बंद पडली. अंधार वाढला. गावकऱ्यांच्या मदतीने राहण्याची खाण्याची सोय करून ते तेथेच थांबले. एकच गाडी रात्री बारा वाजता शाळेत पोचली. पालकांनी गाडी पाहताच आनंदाने आपल्या पाल्यांना घरी नेले. मात्र काही पाल्य न दिसल्याने गोंधळाला सुरवात झाली. काही पालक आपल्या चार चाकी गाड्यांतून मुलांच्या शोधार्थ निघाले. सकाळी वरंधा घाटापाशी मुले नाष्टा करताना दिसली. सर्वांचा जीव भांड्यात पडला. आजच्यासारखी मोबाईल फोनची सुविधा नसल्याने त्या वेळी या प्रसंगांना सामोरे जावे लागले, पण त्याचबरोबर माणुसकीचे दर्शन घडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shalini borade write article in muktapeeth