चिंचणीची आजी

शाल्मली शंतनू सरदेसाई
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

आजीच्या गोष्टी ऐकत मोठे झालो. आजी शंभरीत पोचली, तेव्हा तिच्या अनुभवाच्या गोष्टी ऐकत शहाणे होतो आहोत.

आजीच्या गोष्टी ऐकत मोठे झालो. आजी शंभरीत पोचली, तेव्हा तिच्या अनुभवाच्या गोष्टी ऐकत शहाणे होतो आहोत.

कापसासारखी खूप हळुवार, सरळसाधी, प्रेमळ अशी जिवाभावाची आजी प्रत्येकाच्या आयुष्यात असते. आपल्या बालपणी गोड गोड गोष्टी सांगणारी, गाणे गात व पाठ थोपटीत झोपवणारी, कुठे दुखले खुपले तर हळदीचा लेप लावणारी, कुणी आमच्यावर रागावले तर आमची बाजू घेऊन भांडणारी, परीक्षेत पास झाल्यावर कौतुक करीत रुपया हातावर ठेवणारी आजी! प्रत्येकाची आजी अशी असेलच अन्‌ तिच्यातील वेगळेपणही. चिंचणीची बाबीआजी (सुनंदा बाबरे) अशीच आभाळाएवढी माया करणारी. चिंचणीमध्ये असून आजीची भेट घेतली नाही असा एकही चिंचणकर सापडणार नाही. चिंचणकरांना आजीबद्दल जेवढी आपुलकी, तेवढीच आजीला सर्व चिंचणकरांबद्दल. प्रत्येकाशी तिची मायेची वीण जुळलेली. आजीमध्ये अनेक सुप्त गुण दडलेले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे तिच्या हाताला अप्रतिम चव. तिच्या हातची जिऱ्या-मिऱ्याची कढी, आंबट वरण-भात, वांग्याची भाजी, शेवग्याची आमटी, अनेक प्रकारच्या वड्या असे एक न्‌ अनेक चविष्ट पदार्थ.

उन्हाळी सुटीत चिंचणीला गेलो की तिच्या घराकडे पावले आपोआप वळतात. तिला भेटावयास गेले, की तिची वाक्‍ये ठरलेली, "थांब गं, बस गं, जाशील. आली आहेस तर थोड्या गप्पा मार. मला म्हातारीला तेवढाच विरंगुळा.' तेवढ्यातल्या तेवढ्यात तिच्या हातचा स्वादिष्ट पदार्थ तयार असायचाच. तिच्याशी गप्पा मारता मारता कसा वेळ निघून जातो याचे भानही राहत नाही. तिचा तो प्रेमळ सहवास अनुभवताना तेथून पाऊलच निघत नाही. वयाच्या ब्याण्णवाव्या वर्षी स्वतः हाताने विणलेले हातरुमाल तिने माझ्या लग्नात मला भेट दिले. ती लाख मोलाच्या भेटीची वीण अजूनही माझ्या मनात घट्ट विणली गेली आहे. अशी ही आमची क्षणाक्षणाला, कणाकणाला झिजत इतरांचे जीवन प्रकाशमय करणारी आजी. संस्कारांचा ऐवज आमच्या स्वाधीन करणारी आजी. चिंचणीची बाबीआजी आज शंभरी साजरी करतानाही गोजिरी दिसते. शंभर पावसाळे अंगावर झेललेली आणि तेवढेच उन्हाळे सहन केलेली आजी अनुभवाचे बोल ऐकवते ते आमच्यासाठी जीवनामृत असते. आजीच्या गोष्टी ऐकत मोठे झालो; आता शंभरीतील आजीच्या अनुभवाच्या गोष्टी ऐकत शहाणे होतो आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shalmali sirdesai write article in muktapeeth