नाती फुलांची...

Chafa Flower
Chafa Floweresakal

श्याम पेठकर (pethkar.shyamrao@gmail.com)

आईला नाटक, चित्रपटांचा भारी शौक. वडील मात्र घरातला भलामोठा रेडिओदेखील वाजू नये, असे प्रयत्न करायचे. गावात एकच थिएटर. त्यात कधीमधी बरे चित्रपट लागायचे. नाटक तर अचानक धनलाभ झाल्यासारखेच यायचे. नाटकाचा शो आहे म्हटल्यावर आईच्या उत्साहाला उधाण यायचे. आता तिने वडिलांनी सोबत यावे म्हणून आग्रह सोडून दिलेला. वडील सोबत जायचे नाही, मात्र त्यांना गावातले मानवाईक म्हणून मिळालेल्या पासेस मात्र न चुकता तिच्या हातावर ठेवायचे. नाटकाला जायचे म्हटले की आई त्या दिवशी कुठली साडी नेसायची, इथून तयारी करायची. अगदी आदल्या दिवशी गजरा आणून ठेवण्यापर्यंत तिची युद्धस्तरावर तयारी असायची. ती अशी सजून नाटकाला निघाली की वडील म्हणायचेदेखील, ‘‘तिथे लोक नाटक बघायला येणार आहेत.’’ नाटकाच्या आनंदावर वादाचे विरजण नको म्हणून आई त्यांचा हा टोमणा फिक्स डिपॉझिटसारखा राखून ठेवायची. (Sham Pethkar Article On Chafa Flower And Relationship bam92)

Summary

फुलांची नाती फुलांसारखी मोसमी आणि शाश्वत नसतात. एकदा जुळली, की फारतर वहीच्या पानांत आत्म्याच्या गाभाऱ्यात नंदादीपासारखी जळत राहतात...

ती अशीच नाटकाला निघाली होती. परसदारी असलेल्या तिनंच वाढविलेल्या बगिचात गुलाबाचं फूल तिनं हेरून ठेवलेलं असावं. निघताना मात्र ते नव्हतं. तिचा चडफडाट झाला. ‘‘फुलंही नशिबी नाही माझ्या...’’ असा चडफडाट करून ती निघाली. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा विषाद गुलबकावलीच्या पुस्तकात राक्षसाच्या तुरुंगात असलेल्या राजकन्येच्या चेहऱ्यावरच्या वेदनेसारखाच वाटला. वाड्याच्या पलिकडे बँकेच्या मागे असलेल्या मॅनेजरच्या बंगलीच्या आवारात अगदी शिस्तीनं गुलाब फुलविण्यात आले होते. कुंपणाच्या भिंतीवरून काही उनाड फुलं बाहेर डोकवायची. भिंतीच्या बाहेर बाभळीची करपलेली काटेरी झुडपं अगाऊ रक्षण करायची त्या गुलाबांचे. मनानं अचानक उसळी घेतली. अनवाणीच पळत सुटलो. वाटलं होतं त्यापेक्षा भिंत अधिकच उंचाड होती. मोतिया गुलाबाचे टपोरे फूलदेखील बुटक्या झाडाला लागलेले. कसाबसा भिंतीवर चढून ओणवा झाल्यावरही हात फुलापर्यंत पोहोचेना. बंगलीची दारे बंद होती; पण आतली हवा हलली तरीही धडधडून यायचं. मग पाय आत सोडला. पावलाचा अंगठा आणि मधल्या बोटाच्या चिमटीत पकडून फुलं सहज खुडता यायची, पण... आईच्या डोक्यात माळायचं फूल अन् पायानी खुडायचं? फुलाला पाय लावायचा?

‘‘हवंय का तुला ते फूल?’’ दचकलोच आपण. मॅनेजरच्या माझ्याच वयाच्या मुलीनं सहज ते फूल तोडून माझ्या हाती ठेवलं. ‘‘आईला हवंय... म्हणजे मला तिला द्यायचंय. वेणीत माळायचंय ना तिला...’’ असंच काहीसं बोलून चड्डी एका हाताने सावरीत पळालो. आई तिच्या मैत्रिणींसोबत रस्त्याने निघालेलीच. मी शिवनेरी जिंकलेल्या शिवबासारखा तिच्यासमोर फूल घेऊन उभा झालो. ती विस्मयाने बघत राहिली. शाळेचाच ड्रेस अंगात. वरची दोन बटनेही तुटलेली शर्टाची. भिंतीवर ओणवा झोपल्याने कपडे चुना अन् धुळीनं बरबटलेले. हनुवटीखाली थोडं खरचटलेलंदेखील. आई संतापलीच. हातातलं फूल घाईने घेऊन नकोशा कागदाचा कपटा तुच्छतेने बाजूला फेकावा तसे दुर्लक्ष करीत आई निघून गेली. पाठमोऱ्या तिच्या आकृतीत ती अगदी सावळ सावळ दिसत असतानादेखील मोतिया गुलाबाचं ते फूल अगदी स्पष्ट दिसत होतं...

Chafa Flower
अहंमन्य मराठीजनांस राग कशाचा येतो?

शाळा गावाबाहेर तीन- साडेतीन किलोमीटर दूर गेली. शेतात. तीन-चार एकराचा परिसर. शाळेच्या मुख्य इमारतीच्या द्वारापर्यंत बोगनवेलीचा मोठ्ठा मांडव. त्या खालून जाताना गुलबकावलीतला राजकुमारच असल्याचे वाटायचे. उडी मारली की फुलांच्या ताटव्याला हात लागायचा. फुलांच्या या ताटव्याच्या पलिकडे काय असेल? काट्यांना अडकून काटसावरीचा कापूस लहरत असतो तसे आभाळही बोगनवेलींच्या मधून दिसत राहायचे. ‘‘मला दे ना खुडून ती फुलं.’’ पुढ्यात तीच उभी होती. बंगलीत मला गुलाबाचे फूल देणारी. आता तिला फुलांचे हळवे संदर्भ कळावेत इतकी ती वयात आलेली. तिच्या डोळ्यांतही मेहंदीचे हळवे रंग पसरलेले. मेहंदीभरल्या हातांचे सारेच संदर्भ कळतील असे नव्हे; पण, त्यातले गूढ जर्द गुलाबीपण हवेहवेसे वाटेल असे आपलेही वय. खुडून तिच्या हातात एक मोठी डहाळीच दिली. आपला खिसाही फुलांनी भरलेला.

‘‘गुदमरतील ना ती फुलं खिशात...’’ तिच्या अल्लडपणाला आता फुलांच्या सोशिक असोशीची किनार आलेली. ‘‘बोगनवेलींच्या फुलांना सुगंध नसतो.’’ ओंजळीतली फुलं हुंगताना मिटल्या डोळ्यांनीच ती माझ्याकडे न बघताच म्हणाली, ‘‘प्रत्येकच फुलाला आपला एक गंध असतो. बोगनवेलींच्या फुलांना हिरवट टवटवीत असा एक गंध असतो.’’ मुली मुजोरच असतात... असं म्हणून आपण समोर निघालो. ‘‘त्या दिवशी मग तुझ्या आईने मारलं नाही ना तुला रात्री?’’ मला मोतिया गुलाब आठवला.

‘‘नाहीच... नसेलच. त्या नाटकाहून परत येताना मीच त्यांना रस्त्यात उभे राहून सांगितले, तू फूल चोरलं नव्हतंस म्हणून.’’ हिला आई कळते; मुलाचे तिच्याबद्दलचे गहिवर कळतात अन् फुलंही कळतात... मग जाणवलं की तिचा देहच फुलांचा आहे. मनही. या पलिकडे काही कळत नव्हतं; कळण्याचं भानही नव्हतं. मात्र ती सोबत असली की बोगनवेलीच्या मांडवाखालून चालत असल्यासारखे वाटत राहायचे. तिच्याकडून आपल्याला आणखी एक फूल हवे आहे मोतिया गुलाबाचे... पण, आईसाठी नव्हे! तीदेखील रोज कसली कसली फुलं आणायची अन् जाता-येता देऊन जायची. तिच्या वहीत मात्र मी दिलेली बोगनवेलींची फुलं जपून ठेवलेली. ती म्हणाली होती, ‘‘आपलं नातं फुलांचं आहे.’’ फुलांची ही नाती फुलांसारखी मौसमी आणि शाश्वत नसतात. एकदा जुळली की फारतर वहीच्या पानांत आत्म्याच्या गाभाऱ्यात नंदादीपासारखी जळत राहतात, हे तेव्हा कळलं नाही. ते कळण्याचं ते वयही नव्हतं..!

Sham Pethkar Article On Chafa Flower And Relationship bam92

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com