व्यथा आणि कथा

शीला शारंगपाणी
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

मुलांसह मजा करण्याची इच्छा असतानाच अपघात होऊन सक्तीची विश्रांती घ्यावी लागते. शरीराबरोबर मनालाही जबरदस्त हादरा बसलेला असतो. पण त्यातून बाहेर पडल्यावर त्या व्यथेची कथा होते, ती ही अशी.

नेहमीप्रमाणे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारा पहिला फोन सुमीचाच आला. ""अगं, कर्माचं हॅपी न्यू इयर'' मी विव्हळतच उत्तरले. ""काय गं, काय झालं?'' सुमीचा प्रश्‍न. ""अगं, व्हायचंय काय, त्या बसने माझं कंबरडंच मोडून टाकलंन की.'' माझा रडवेला स्वर.

मुलांसह मजा करण्याची इच्छा असतानाच अपघात होऊन सक्तीची विश्रांती घ्यावी लागते. शरीराबरोबर मनालाही जबरदस्त हादरा बसलेला असतो. पण त्यातून बाहेर पडल्यावर त्या व्यथेची कथा होते, ती ही अशी.

नेहमीप्रमाणे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारा पहिला फोन सुमीचाच आला. ""अगं, कर्माचं हॅपी न्यू इयर'' मी विव्हळतच उत्तरले. ""काय गं, काय झालं?'' सुमीचा प्रश्‍न. ""अगं, व्हायचंय काय, त्या बसने माझं कंबरडंच मोडून टाकलंन की.'' माझा रडवेला स्वर.

"अगं, अमेरिकेहून आलेल्या मुलाला घेऊन आम्ही पहाटे साडेतीनला बसने निघालो सहारवरून. शेवटच्या सीटवर बसलो. जरा स्थिरस्थावर होतो न होतो तोच अत्यंत वेगात असलेली बस स्पीडब्रेकरवरून त्यानं अशी हाणली, की बसमधले प्रवासी हवेतच उडाले, पण हॅंडरेस्टमुळे बचावले; पण मी जी उडाले ती बसच्या छतावर आदळून खाली आपटले. क्षणभर मला काही उमगलंच नाही. पण मग जाणीव झाली, की माझ्या कमरेतून प्राणांतिक कळा येत आहेत. बरोबर माझा नवरा व डॉक्‍टर मुलगा नसता, तर त्या तीन तासांच्या प्रवासातच माझा अंत झाला असता गं,'' हुंदके देत मी तिला माझी व्यथा ऐकवली.

"शीलाची कंबर मोडली' ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. माझी विचारपूस करायला मैत्रिणी येऊ लागल्या. त्या सर्वांना माझ्या अपघाताची कथा सांगताना मी कंटाळत कशी नाही, असा माझ्या मुलांना प्रश्‍न पडला. एवढंच नाही, मी ती हकीगत सांगणं एन्जॉय करतेय, असा माझ्या मुलीला संशयही आला. इतक्‍यात, आमची कामवाली बाई हातात दहा-बारा मारी बिस्किटांचे पुडे, दोन-तीन किलो सफरचंद आणि तेवढेच चिकू घेऊन आली आणि ""बाई, आता याचं काय करू?'' असं विचारती झाली. आजाऱ्याला भेटायला जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही ही आपली पद्धत. दिवस चालले होते. वेदना मुळीच कमी होत नव्हत्या. एक्‍स-रे काढायला जायची शारीरिक परिस्थिती नव्हती. मुलांबरोबर एन्जॉय करायचे सारे मनसुबे धुळीला मिळाले होते. शरीराबरोबर मनही आक्रंदत होतं; पण रोज कोणी ना कोणी येत होतं त्यामुळे विरंगुळा होता. फुंकर मारली तर उडून जाईल अशा अंगकाठीची माझी मैत्रीण म्हणाली, ""शीला, मला एक कोडं उलगडत नाही. म्हणजे तू रागावू बिगावू नकोस हं, म्हणजे तू काही एवढी हलकीफुलकी नाहीस, मग एवढ्या उंच उडालीसच कशी?''

ऍलोपॅथीला जाम शिव्या देणारी माझी दुसरी मैत्रीण होमिओपॅथीच्या गोळ्यांची बाटली घेऊन आली आणि म्हणाली, ""या गोळ्या चारप्रमाणे चार वेळा चारच दिवस घे. चार दिवसांत टुणकन उडी मारून धावायला नाही लागलीस तर माझं नाव बदल.'' दुसऱ्या सर्व पॅथींना झुगारून देऊन आयुर्वेद हीच खरी आरोग्याची गुरुकिल्ली असं मानणारी माझी एक मैत्रीण तेलाची बाटली घेऊन आली. ""शीला, तू कोणाचं काही ऐकू नकोस. हे तेल बघ. याचे पाच थेंब एका मातीच्या भांड्यात घेऊन ते गाईच्या ताज्या गोमूत्रात घोळवायचे आणि रोज सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर मणक्‍यांना मालिश करायचं. एक दिवस करून बघ; दुसरा सूर्योदय पाहणार नाहीस, म्हणजे वेदनामय गं.'' त्या दोघींची मग होमिओपॅथी की आयुर्वेद यावर चांगलीच जुंपली. तिसरी मैत्रीण पाठीच्या दुखण्याने कित्येक वर्षे हैराण. मानेला पट्टा, पाठीला पट्टा आणि हे कमी पडतात म्हणून काय तिच्या तोंडाचाही पट्टा चालूच असतो. "हे बघ तुला खूप एक्‍स-रे वगैरे काढायला लागतील. ते बावळटासारखे कचऱ्यात टाकू नको. त्याला चांगली किंमत येते, कारण त्यात चांदी असते आणि हल्ली चांदीचे भाव आकाशाला जाऊन भिडले आहेत हे तुला ठाऊक आहेच.' आतापर्यंत माझं कपाट अनेक प्रकारच्या गोळ्या, तेलं, ट्यूब, पट्टे, डिंकाचे व मेथीचे लाडू (कमरेसाठी पौष्टिक म्हणून) यांनी भरलं आहे.

शेवटी एकदाची ऑर्थोपिडिक डॉक्‍टरकडे जाऊन थडकले. त्यांच्या अनुभवी नजरेने मला काय झालं असेल ते बरोबर ओळखलं. "जिन्यावरून पडलात?' "नाही.' "मग बाथरूममध्ये घसरलात?' "नाही.' "मग नक्की स्पीडब्रेकरवरून जोरात गाडी नेण्याने तुम्ही खाली आदळलात.' मी आश्‍चर्यचकित. ""डॉक्‍टर तुम्ही कसं ओळखलंत?'' ""अहो, त्यात काय ओळखायचं. पुण्यात हे एवढं कॉमन आहे. कुणीही सांगेल.'' मी सुटकेचा निःश्‍वास सोडला. माणसाची काय वृत्ती असते पाहा. खूप लोकांना होणारा आजारच आपल्याला झाला आहे असं ऐकलं, की तो अर्धा बरा होतो.

मुलाचा अमेरिकेला जायचा दिवस उजाडला. आणि मग मात्र इतके दिवस कसाबसा थोपवून धरलेला भावनांना बांध फुटला. चेष्टा-मस्करी करून माझं मन रिझविणारा मुलगा डोळ्यांत तरळणारं पाणी कसंबसं थोपवीत म्हणत होता, ""आई, मी ठरवलंय आजारी पडायचं ते इंडियातच. इतके लाड, मित्र-मैत्रिणींचं एवढं प्रेम, हितचिंतकांचे एवढे फोन. अगदी डोक्‍यावर बसवतात पेशंटला. नाही तर अमेरिकेत...''
""अगदी बरोबर आहे. मला पहिल्यासारखं व्हायला किती काळ लागेल माहिती नाही; पण ज्यांनी मला अपनापन दाखवलं, प्रेमापोटी उपचार सांगितले त्यांची उतराई कशी होऊ?''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sheela sharangpani write article in muktapeeth